ETV Bharat / state

परळी : कापूस वेचणीला मिळेनात मजूर.. शेतकऱ्यांची सोयाबीन लागवडीला पसंती

author img

By

Published : Jun 27, 2021, 10:02 PM IST

परळी तालुक्यात शेतकऱ्यांची सोयाबीनला पसंती
परळी तालुक्यात शेतकऱ्यांची सोयाबीनला पसंती

मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मुग, तुर या धानाची पेरणी केली आहे. तर, काही शेतकऱ्यांची आणखीही पेरणी सुरू आहे. तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ६८ हजार हेक्टर क्षेत्रफळ आहे. त्यामध्ये ६७ ते ७० टक्के पेरणी पुर्ण झाल्याची माहिती, कृषी पर्यवेक्षक चंद्रकांत थोन्टे यांनी दिली.

परळी - तालुक्यात यंदा मान्सूनपूर्व आणि नंतरही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. मृग नक्षत्रात चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मुग, तुर या धानाची पेरणी केली आहे. तर, काही शेतकऱ्यांची आणखीही पेरणी सुरू आहे. तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ६८ हजार हेक्टर असून या क्षेत्रफळाच्या ६७ ते ७० टक्के पेरणी पुर्ण झाली आहे. पुढील ८ दिवसांत संपूर्ण पेरणी अपेक्षित आहे, असा अंदाज कृषी पर्यवेक्षक चंद्रकांत थोन्टे यांनी व्यक्त केला आहे.

'गेल्यावर्षी २६ हजार हेक्टरवर झाली होती सोयाबीनची पेरणी'

तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ७८ हजार हेक्टर आहे. यातील लागवडीयोग्य क्षेत्रफळ ६८ हजार हेक्टर आहे. खरीपाची पेरणी साधारणपणे ५८ हजार हेक्टर ते ६० हजार हेक्टरवर आहे. यामध्ये अंदाजे ८ हजार ४०० हेक्टरवर ऊसाची लागवड आहे. तर, यंदा सोयाबीन पीकास जास्त भाव मिळाल्याने, शेतकरी सोयाबीनची पेरणीकडेही मोठ्या प्रमाणावर वळले आहेत. गेल्यावर्षी सोयाबीन २६ हजार हेक्टरवर पेरण्यात आले होते. तर, यंदा ३२ हजार हेक्टरपर्यंत सोयाबीनची पेरणी होण्याची शक्यता आहे. कारण कापूस पीकासाठी लागवड, खत घालणे, तण काढणे, कापूस वेचणी यासाठी मजूरांची संख्या जास्त लागते. तसेच, यासाठी खर्चही मोठा लागतो. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचा ओढा यंदा सोयाबीन पिकाच्या लागवडीकडे जास आहे.

कापूस वेचणीला मजूर मिळत नाहीत त्यामुळे शेतकरी सोयाबीनला पसंती देत आहेत. तसेच, परळी तालुक्यातील एकंदरीत पेरणीबाबतची काय स्थिती आहे याबाबत माहिती देताना कृषी पर्यवेक्षक चंद्रकांत थोन्टे

'तुरीची लागवड सुमारे ५ हजार हेक्टरवर होण्याची शक्यता'

२०२० मध्ये कापूस पीकाची लागवड १९ हजार हेक्टरवर झाली होती. ती यावर्षी फक्त ९ ते १० हजार हेक्टरच होण्याची शक्यता आहे. तुर या पीकाची पेरणी साधारणपणे ५ हजार हेक्टर होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी तुरीची ४ हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती. दरम्यान, कृषी विभागाच्या वतीने अगोदरच सोयाबीन पीकाकडे कल वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. यामुळे कृषी विभागाने पूर्ण तयारी केली होती. शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने सोयाबीनची लागवड करता यावी यासाठी कृषी विभागाने तालुक्यातील १०७ गावांपैकी ९० ते ९५ गावात प्रत्यक्ष जावून घरचे बियाणे वापरावे यासंबंधी जागृती केली आहे. तसेच, उगवण शक्ती तपासणे जैविक व रासायनिक बीज प्रक्रियेचे महत्त्व वाढवणे, पीकाची वाढ योग्य पध्दतीने कशी होईल यासाठी प्रात्यक्षिके दाखवणे असे उपक्रम करण्यात आले.

'रुंद सरी व वरंबा पध्दतीचा वापर करुन सोयाबीन पेरणी करा'

एकदा प्रक्रिया करून पेरणी केल्यास आलेले पीक घरचे-घरी बीयाणे म्हणून शेतकऱ्यांना तीन वर्षे वापरता येते. त्याची उगवण क्षमता चांगली राहते. तसेच, सोयाबीन बीयाणांची पेरणीही शास्त्रीय पध्दतीने करता येते. यामध्ये रुंद सरी व वरंबा पध्दतीचा वापर करुन सोयाबीन पेरणी यंत्राचा वापर करुन, पेरणी करावी याबद्दल जनजागृती केली. ज्यांच्याकडे हे यंत्र उपलब्ध नाही त्या शेतकऱ्यांनी पाच ते सहा काकऱ्यांवर एक काकरी रिकामी ठेवून लागवड करावी. असे केल्याने पाऊस जास्त पडल्यास बीयाणे, त्यानंतर आलेले पीक खराब होत नाही. याबदलही कृषी विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली. यंदा सोयाबीनचे क्षेत्र वाढले व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या तंत्राचा वापर केला आहे. जवळपास ६८ ते ७० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. तर तालुक्यातील दादाहरी वडगाव, धर्मापुरी सर्कलच्या काही भागात येत्या आठ दिवसांत पेरणी पूर्ण होण्याची शक्यता आहे, असे मत थोन्टे यांनी व्यक्त केले आहे.

'पेरणीपूर्वी व पेरणीनंतर काय करावे याबद्दल जनजागृती'

तालुका कृषी अधिकारी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तालुक्यातील ९० ते ९५ गावात जाऊन पेरणी कशी करावी यासाठी शेती शाळेच्या माध्यमातून प्रयत्न केले. पेरणीपूर्वी व पेरणीनंतर काय करावे व कसे करावे यासंदर्भात जनजागृती केली. तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड झाली आहे. पेरणीनंतर पिकावर होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही ही जनजागृती करत आहोत. यामध्ये सोयाबीनवर 'स्पोडक्टेरा'चा प्रभाव वाढू नये म्हणून किडींची ओळख करणे, यासंदर्भात योग्य व्यवस्थापन करणे, त्यासाठी लिंबूळी अर्कचा वापर करणे, कामगंध सापळ्यांचा वापर करणे, याबद्दल जनजागृती करत आहोत, अशी माहिती कृषी पर्यवेक्षक चंद्रकांत थोंटे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.