ETV Bharat / state

तिहेरी हत्याकांड प्रकरण; पीडितांच्या भेटीला 'पालकमंत्री' आले धाऊन, दिली. . . . .

author img

By

Published : May 16, 2020, 4:08 PM IST

Dhanu
पीडितांचे सांत्वन करताना पालकमंत्री धनंजय मुंडे

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तिहेरी हत्याकांडातील पीडित पवार कुटुंबीयांची आज भेट घेऊन सांत्वन केले. या प्रकरणातील दोषारोपपत्र ५० दिवसांच्या आत दाखल करावे, अशा सूचना धनंजय मुंडेंनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

बीड - जमिनीच्या वादातून घडलेल्या तिहेरी हत्याकांडातील पीडित पवार कुटुंबीयांची आज पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवले जावे, यासाठी आपण प्रयत्न करणार असून विशेष सरकारी वकिलाची नेमणूक केली जाईल, असे मुंडे म्हणाले. तसेच या प्रकरणातील दोषारोपपत्र ५० दिवसांच्या आत दाखल करावे, अशा सूचना धनंजय मुंडेंनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Dhanu
पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देताना पालकमंत्री

यावेळी आमदार संजय दौड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, बहुजन मुक्ती मोर्चाचे बाबुराव पोटभरे, मानवी हक्क अभियानचे मिलींद आव्हाड, अजय मुंडे, शिवाजी शिरसाट, दत्ता पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधीक्षक राहुल धस, समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी आदी उपस्थित होते.

पीडितांनी फोडला टाहो

धनंजय मुंडे पवार कुटुंबाच्या पालावर जाताच पवार कुटुंबीयांनी 'धनु भाऊ, आता तुम्हीच आमचे माय-बाप आहात, आम्हाला न्याय द्या...' असे म्हणत टाहो फोडला. अंबेजोगाई येथे पालावर राहणाऱ्या पवार कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी मुंडे यांनी किमान तीन महिने पुरेल इतके अन्नधान्य पवार कुटुंबीयांना देण्याबाबत तहसीलदारांना आदेशीत केले आहे. तसेच विभागामार्फत घरकूल योजनेतून घरासाठी निधी व जागा उपलब्ध करून देण्यात येईल असेही मुंडे म्हणाले.

सामाजिक न्याय विभागामार्फत हत्या झालेल्या तीनही व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख १२ हजार रुपये आर्थिक मदत तात्काळ देण्यात आली आहे. तसेच योजनेनुसार उर्वरित ४ लाख १२ हजार रुपये रक्कम दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर देण्यात येईल, असे मुंडे म्हणाले. हे प्रकरण जमिनीच्या वादातून झाल्याचा संशय असल्याने पवार कुटुंबाने आपल्याला आणखी धोका होऊ नये, म्हणून इतरत्र जमीन मिळवून देण्याबाबत मुंडे यांना विनंती केली. मुंडे यांनी पवार कुटुंबीयांना इतरत्र जमीन मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

बुधवारी मध्यरात्री घडले होते 'हत्याकांड'

केज तालुक्यातील मांगवडगाव येथे बुधवारी मध्यरात्री शेतीच्या वादातून तिघांचा खून केल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी गावातीलच निंबाळकर कुटुंबातील बारा व्यक्तींना पोलिसांनी अटक केली. त्यांना २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. हत्याकांडापूर्वी पीडित व्यक्तींना पळून जाता येऊ नये, म्हणून त्यांच्या दुचाकी जाळून टाकण्यात आल्या होत्या. हल्लेखोरांनी ट्रॅक्टरने येत पाठलाग करून तिघांवर कुऱ्हाडीने हल्ला केला.

यात बाबू शंकर पवार, प्रकाश बाबू पवार, संजय बाबू पवार या तिघांवर हल्ला करुन खून करण्यात आला. या हल्ल्यात आणखी एक जण जखमी असून त्यावर उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.