गंगापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा थर्माकोलवर बसून शाळेचा प्रवास

author img

By

Published : Sep 17, 2022, 8:24 PM IST

Etv Bharat

मराठवाड्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना गंगापूर तालुक्यातील पुनर्वसन झालेल्या अनेक गावातील वसाहतींमध्ये जाण्यासाठी लोकांना जुन्याच साधनसामुग्रीचा आणि तराफ्याचा वापर करावा लागत आहे. भिवधानोरा येथील शाळेत जाण्यासाठी लहान मुलांना थर्माकोलच्या तराफ्यावर बसून जीव धोक्यात घालून शाळेत ये-जा करावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे परिस्थीची माहिती असूनही याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

औरंगाबाद (गंगापूर) - गंगापूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठी असलेला भिवधानोरा शिवारातील काही भाग शिवना नदीच्या पलिकडे आहे. जायकवाडी धरण झाल्यामुळे धरणाच्या बॅक वॉटरचे पाणी नदीकाठी सर्वत्र पसरते. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि त्यांच्या मुलांना रोज धरणाच्या या पाण्यातून शाळेसाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. (Students Travel To School On Thermocol) गावातील वीस ते तीस विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिक्षणासाठी जातात. मात्र पाण्यामुळे रस्ता नसल्याने थर्माकोलच्या ताफ्यावर बसून एक किलोमिटर जीवघेणा प्रवास करत शाळा गाठत आहेत.

गंगापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा थर्माकोलवर बसून शाळेचा प्रवास

अनेकांना होतोय त्रास - शाळेत जात असताना वारे जास्त वाहत असल्यामुळे पालकांनी शिक्षकांना 'आज वारे जास्त वाहत असल्याने पाण्याच्या लाटा वाढत आहेत. त्यामुळे मुले शाळेत येऊ शकत नाहीत', असा मेसेज टाकतात. १६ सप्टेंबर रोजी म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या एक दिवस आधी असाच मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे या विद्यार्थ्यांची दयनीय अवस्था समोर आली आहे. गंगापूर तालुक्यातील २२ गावे जायकवाडी धरणाच्या पाण्यामुळे पुनर्वसित झाली आहेत. या धरणाला सुमारे अर्धशतक उलट आले तरीही शासनाने या धरणासाठी जमीन घेतलेल्या गावातील लोकांना मूलभूत सुविधा अद्याप दिलेल्या नाहीत.

शाळेत जायचे कसे ? - भिवधानोरा या गावातील काळे, चव्हाण, घोटकर, लवघळे कुटुंबासह अनेक शेतकऱ्यांची शेती शिवना नदीच्या पलिकडे आहे. अनेक शेतकरी अडचणीमुळे तेथेच वस्ती करून राहतात. आपण शिकलो नाही, परंतु आपली मुलं शिकली पाहिजेत, असे या शेतकऱ्यांना वाटते. म्हणून गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी आपल्या मुलांना शिकवण्यासाठी जीव धोक्यात घालून थर्माकोलच्या ताफ्यावर बसवून शाळेत पाठवत असल्याचे चित्र समोर आले आहे.

तहसीलदार येऊन गेले - या भागातील कोडापूर, मांगेगाव शिवारापलिकडून येण्या जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे मुलांना पाण्यातून शाळेत जावे लागत आहे. तालुक्यातील गोदावरी काठावरील पाणलोट क्षेत्रातील अनेक गावांतील मुलांना दररोज अशाच पद्धतीने शाळेमध्ये जावे लागते. रस्ता नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी थर्माकोलवर बसून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न ग्रामस्थांतून केला जात आहे. तर तहसीलदार येऊन पाहणी करून गेल्याच ग्रामस्थांनी सांगितल.

आमदार उत्तर देईनात - विद्यार्थ्यांना होणारी अडचण पाहता पालकांनी भाजपा आ. प्रशांत बंब यांना याबाबत माहिती दिली. मात्र त्यावेळी पर्याय शोधण्यापेक्षा तुमचे शिक्षक मुख्यालय राहतात का? आधी त्यांना मुख्यालयात राहायल सांगा आणि त्यानंतर आपण त्याबाबत चर्चा करू अस अजब उत्तर त्यांनी दिलं. यावर पालक संतप्त झाले असून, शिक्षक मुख्यालय राहण्याचा आणि विद्यार्थ्यांना जाण्यासाठी मार्ग नसण्याचा काही संबंध आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे.

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.