ETV Bharat / state

Manoj Jarange Patil : दिवाळीत नेत्यांच्या घरी फराळाला गेल्यावर त्यांना 'हे' विचारा, मनोज जरांगे यांचं आवाहन काय?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2023, 3:41 PM IST

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी मराठा आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गाव बंदी करण्याचं आवाहन केलं होतं. आता दिवाळीत देखील राजकीय नेत्यांबाबत त्यांनी एक नवीन आवाहन मराठा समाजाला केलं आहे.

मनोज जरांगे
मनोज जरांगे

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील

छत्रपती संभाजीनगर Manoj Jarange Patil : दिवाळीत राजकीय नेत्यांच्या घरी गेलात तर आरक्षणाबाबत काय भूमिका आहे, अधिवेशनात कायदा करणार का? हे नेत्यांना विचारा. तसंच कोणत्याही राजकीय पक्ष आणि नेत्यांपेक्षा समाजाला अधिक महत्त्व द्या, स्वतःचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आपल्या मुलांसाठी नेत्यांना प्रश्न विचारा असं आवाहन मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केलंय.

जेवणापेक्षा भविष्य महत्त्वाचे : दिवाळीत राजकीय नेते फराळाचं निमंत्रण देतील, ज्याला जायचं असेल त्यांनी नक्की जा. परंतु तिथं गेल्यावर आरक्षणाबाबत नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते विचारा. इतकंच नाही तर आपल्या परिसरातील मंत्र्यांनी फराळाला बोलावलं तर तिथं गेल्यावर तुम्ही अधिवेशनात कायदा करणार का? याबाबत जाब विचारा. आज जेवणापेक्षा भविष्य अधिक महत्त्वाचं आहे. आपल्या मुलांना जर न्याय द्यायचा असेल, तर आपल्याला या गोष्टी कराव्या लागतील. स्वतःचे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत, त्यामुळे पक्ष आणि नेत्यांपेक्षा स्वतःच्या जातीला महत्त्व द्या. आधी जात आणि मग नेता अशी भूमिका ठेवा, आपले प्रश्न मांडा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय.

मराठा युवकांनी आत्महत्या करू नका : मराठा युवकांनी आता आत्महत्या करू नये, आपल्याला मरायचं नाही तर लढायचं आहे. आरक्षणाची लढाई जिंकल्यानंतर आपल्याला तो उत्साह, तो जल्लोष साजरा करायचा आहे. त्यामुळं कोणीही आत्महत्या करू नका, आता प्रत्येक गावात जाऊन लोकांना जागरुक करा. 1 डिसेंबर पासून प्रत्येक गावात, खेड्यात साखळी उपोषण सुरु झालं पाहिजे, यासाठी तयारी करा. आपल्याला शांततेच्या मार्गानं आपली लढाई जिंकायची आहे. संयमानं आपलं आंदोलन करुन कुठलीही तोडफोड न करता पुढं जायच आहे. त्यामुळं आत्महत्या करू नका असंही आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा युवकांना केलंय.

जुन्या संस्थानिकांनी पुरावे द्यावे : राज्यात न्यायमूर्ती शिंदे समिती कुणबी समाजाच्या पुराव्यांचा शोध घेत आहे, असं असताना जी जुनी संस्थानं आहेत त्यांनी त्यांच्याकडे असलेले पुरावे समितीला द्यावेत. त्यांचे दप्तर खुले करून दिले तर गोरगरिबांचं कल्याण होईल. माझ्याकडे कोणाचे नंबर नाही आणि मी जर फोन लावला तरी ते उचलतील हे माहिती नाही, म्हणून प्रसिद्धी माध्यमांच्या मार्फत मी संस्थानिकांना हे आवाहन करतोय असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. त्याचबरोबर ओबीसी नेते आता अलटून पलटून बोलत आहेत. जे चांगलं करत नाहीत त्यांच्याबाबत मी बोलणार नाही. मात्र, आम्ही ओबीसी नेत्यांच्या विरोधात आहोत समाजाच्या नाही असं देखील त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं. अजित पवार दिल्लीला गेले होते, ते कशासाठी गेले हे अद्याप माहिती नाही. जर त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रश्न मांडले असतील तर, सगळ्यांना कुणबी समाजाचे पुरावे दिले पाहिजे असं त्यांनी मांडलं असेल तर चांगलं आहे. मात्र ते जर खासगी कामानिमित्त गेले असतील तर मात्र आपण त्यावर बोलू शकत नाही असं देखील जरांगे पाटील यांनी सांगितलंय.

हेही वाचा :

  1. Chhagan Bhujbal : 'जरांगे पाटील खूप काही बोलतात, त्यावर बोलायला मी...'
  2. Maratha Reservation : 'फडणवीसांना मुख्यमंत्री होऊ न देण्याच्या नादात उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाचा घात केला'
  3. Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.