ETV Bharat / state

BAMU : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन, वाचा सविस्तर

author img

By

Published : Jan 14, 2023, 12:18 PM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन सोहळ्याला मराठवाड्यात वेगळे महत्त्व आहे. आज शनिवार (दि. १४ जानेवारी)रोजी विद्यापीठाचा २९ वा नामविस्तार दिन आहे. नामविस्तार दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यापीठ प्रवेशद्वारावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच, यावेळी विद्यापिठ प्रवेशद्वारावर महाराष्ट्रभरातून आलेले लोक बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन करत आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 29 वा नामविस्तार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्यासाठी उभारलेल्या लढ्यात बलिदान देणाऱ्या आंदोलकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठाला डॉ. बाबासाहेबांचे नाव द्यावे, या मागणीसाठी त्यांच्या अनुयायांना तब्बल 17 वर्षे लढा उभारावा लागला. अनेकांना बलिदान द्यावे लागले. अखेर शरद पवार मुख्यमंत्री असताना 14 जानेवारी 1994 ला मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला.

बाबासाहेबांनी शिक्षणाची दारं केली खुली : 14 जानेवारीला मकरसंक्रातीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो. तसेच, मराठवाड्यासाठी हा दिवस मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार लढ्याचा विजयाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठात जावे लागत होते. मात्र, ते प्रत्येकाला शक्य नव्हते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर काही काळ औरंगाबादेत वास्तव्यास होते. त्यावेळी त्यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दार उघडण्याची सुरुवात या निमित्ताने येथे झाली आहे.

डॉ. बाबासाहेबांच्या संकल्पनेतून विद्यापीठ : मराठवाड्यात एक विद्यापीठ असावे, अशी अपेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केली, त्यासाठी प्रयत्न त्यांनी केले. (1953)मध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, अशी मागणी करण्यात आली. (1977 ते 1994) या काळात नामांतराचा लढा उभारला आणि (14 जानेवारी 1994)रोजी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले. अखेर एका वेगळ्या लढ्याचा विजय झाला. त्याच दिवसाची आठवण म्हणून आजचा नामविस्ताराचा दिवस साजरा केला जातो. इतकेच नाही तर या लढ्यात बलिदान देणाऱ्यांना अभिवादनही येथे करण्यात येते.

डॉ. बाबासाहेबांनी लावलेल्या रोपट्याचे झाले वटवृक्ष : मराठवाडा हा दुर्लक्षित भाग म्हणून ओळखला जातो. देश स्वतंत्र झाला त्यानंतर एक वर्ष एक महिना 2 दिवसांनी मराठवाडा स्वतंत्र झाला आणि महाराष्ट्रात समाविष्ट झाला. तरी देखील शिक्षणासाठी महाविद्यालय उपलब्ध नव्हती. त्यावेळी बाबासाहेबांच्या संकल्पनेतून विद्यापीठ सुरू करण्यात आले. त्यानंतर हळूहळू मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेण्यासाठी बाहेर जाण्याची गरज पडली नाही. आज औरंगाबाद सह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये उच्च शिक्षण उपलब्ध आहे. इतकच नाही तर बाहेर शहरातून, राज्यातून इतकंच काय तर बाहेर देशांमधून उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी मराठवाड्यात येत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लावलेल्या छोट्या रोपट्याचे मोठ वटवृक्ष झाल्याचे या निमित्ताने येथे पाहायला मिळते.

हेही वाचा - १७ वर्षांचा लढा, अनेकांनी गमावले प्राण, अन् झाला नामविस्तार 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.