ETV Bharat / state

Aurangabad Crime: मोत्यांची शेती करण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची कोट्यावधींची फसवणूक; आरोपी मोकाट

author img

By

Published : Feb 17, 2023, 5:09 PM IST

Aurangabad Crime
शेतीतून उत्पादित शिंपले

शेतकऱ्यांना लुटण्याचा एक धक्कादायक प्रकार राज्यात समोर आला आहे. एका खासगी कंपनीने मोती उगवून पैसे कमवायचे आमीष दाखवत शेतकऱ्यांना कोट्यावधींचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत पोलिसात तक्रार देऊनही अद्याप आरोपी अरुण अंभोरे मात्र मोकाट असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

फसवणुकीविषयी सांगताना शेतकरी

औरंगाबाद: मराठवाड्यातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे नेहमीच त्रस्त झालेला पाहायला मिळाला. होत असलेले नुकसान पाहता सरकारी योजनांचा फायदा देखील त्यांना मिळत नाही. त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय करावा याकडे त्यांचा कल वाढला आहे. मात्र त्यातही त्यांची फसवणूक होत आहे. करमाड तालुक्यात शिंपल्यांची शेती करून आर्थिक उत्पन्न वाढवण्याचे आमीष इंडो पर्ल कंपनीचे मालक अरुण अंभोरे यांनी दाखवले. 13 महिन्यांचा करार करून शेतात आलेले मोती विकत घेऊन, त्याचा मोबदला देण्यात येईल असे सांगण्यात आले. त्यावरून शेतकऱ्यांनी कर्ज काढून गुंतवणूक केली. करार संपायच्या आधी कंपनीच्या लोकांनी आलेले शिंपले काढून घेतले. त्यात खराब झालेले शिंपले तिथेच टाकून चांगले शिंपले आपल्या ताब्यात घेतले. त्यावेळी पैसे कधी मिळणार अशी शेतकऱ्यांनी विचारणा केली असता, तयार मोती हैदराबादला पाठवले जातील. त्यानंतर तुमचा मोबदला तुमच्या खात्यात जमा होईल, असे सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात मोबदला आलाच नाही. त्यामुळे मोतीही गेले आणि पैसेही अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली.


शेतकऱ्यांची पोलिसात धाव: शेतकऱ्यांची करार करताना चांगले मोती 180 रुपये दराने घेतले जातील असे सांगण्यात आले. तसेच खराब झालेले मोती 81 रुपये प्रति याप्रमाणे दर निश्चित करण्यात आला. खराब झालेल्या मालाबाबत आपण विमा काढला आहे, त्यामुळे नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार नाही असे कंपनीकडून सांगण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांनी डोळे झाकून आर्थिक उत्पन्न वाढावे याकरिता गुंतवणूक केली. मात्र प्रत्यक्षात मोबदला मिळालाच नाही. इतकेच नाही तर कंपनीच्यावतीने देण्यात आलेले धनादेश देखील खात्यात वटले नाही. त्यामुळे आर्थिक फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी करमाड पोलिसात धाव घेतली. अनेक चकरा मारल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र आरोपी अरुण अंभोरे याला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश मिळाले नाही.


कोट्यावधींचा घोटाळ्याची शक्यता: करमाड तालुक्यात भगवान पवार या शेतकऱ्याने सर्वांत पहिले आपली तक्रार नोंदवली. ती तक्रार मागे घेण्यासाठी कंपनीचे मालक अरुण अंभोरे यांनी त्यांच्यावर धमकी देत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायासाठी त्यांनी आपली तक्रार मागे घेतली नाही. अटकपूर्व जामीन मिळावा याकरिता अंभोरे यांनी न्यायालयात धाव घेतली. सरकारी वकील योग्य बाजू मांडत नसल्याने तक्रारदार भगवान पवार यांनी पदरचे पैसे टाकून खासगी वकिलामार्फत न्यायालयात आपली बाजू मांडली. न्यायालयाने अंभोरे याचा जामीन अर्ज फेटाळला. तक्रारदाराला नुकसान भरपाई देणार नाही, तोपर्यंत जामीन मंजूर केला जाणार नाही असे न्यायालयाने सांगितले. तरीदेखील आरोपी न्यायालयाला जुमानण्यास तयार नाही. इतकच नाही जामीन फेटाळला गेला असला तरी आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर शेतकऱ्यांनी शंका व्यक्त केली आहे.

आर्थिक फसवणूक 4 कोटींच्या घरात: औरंगाबाद पोलीस अधीक्षक कार्यालयात आतापर्यंत 89 शेतकऱ्यांनी आपली तक्रार दिली. याप्रकरणी चार कोटींपर्यंतची फसवणूक झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तर मिळालेल्या दिलेल्या माहितीनुसार तक्रार न देणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यातच 25 कोटीहून अधिकचा घोटाळा तर राज्याच्या पातळीवर 200 कोटींच्या घरात हा घोटाळा असू शकतो असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये अरुण अंभोरे याच्या विरोधात तक्रार नोंद असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत पोलिसांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आरोपी मोबाईलचा वापर करत नसल्याने त्याला ट्रॅक करणे शक्य होत नसल्याचे उत्तर त्यांनी दिले.


धनाड्य शेतकरी लक्ष्य: औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी विकास कामांसाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करण्यात आली. त्यासाठी त्यांना चांगला मोबदला देखील देण्यात आला. अशाच शेतकऱ्यांना लक्ष्य करून फसवल्याचे समोर आले आहे. आरोपी अरुण अंभोरे यांनी आपले जाळे सर्वत्र पसरवले होते. गेल्या काही वर्षांत मोत्यांची शेती करून पैसे कमवा अशी जाहिरात त्यांना केली. सुरुवातीला शेतकऱ्यांसोबत करार करून त्यांना चांगला मोबदला दिला. मात्र गुंतवणूक वाढल्यानंतर त्याने परतावा न देताच शेतकऱ्यांची फसवणूक केली. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये सेवानिवृत्त अधिकारी, शिक्षक यांचा देखील समावेश आहे.


हेही वाचा: Wardha Crime: जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह अन्य एकाला वीस हजारांची लाच घेताना अटक; नागपूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.