ETV Bharat / state

Bullet News : गोंगाट करणाऱ्या बुलेटस्वारांकडून १६ लाखांचा दंड वसूल, पण...

author img

By

Published : Aug 18, 2023, 8:10 PM IST

Aurangabad News
Aurangabad News

पोलिसांनी औरंगाबादमध्ये गोंगाट करणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरात बुलेटस्वारांकडून 16 लाख 9 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिसांनी १ जानेवारी ते १५ ऑगस्ट दरम्यान केल्याची माहिती वाहतूक शाखा सहायक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांनी दिली आहे.

संपत शिंदे यांची प्रतिक्रिया

औरंगाबाद : महाविद्यालयीन विद्यार्थी, युवकांमध्ये बुलेट गाडीची क्रेझ पाहायला मिळत आहे. गाडी घेतल्यावर मोठ्या आवाजाचे सायलंसर टाकून बुलेटचा ध्वनी वाढवला जातो. काही गाड्यांमध्ये तर बंदुकीतून गोळी बाहेर येण्यासारखा आवाज काढण्यात येतो. फटाक्यांची लड फुटावी, किंवा एखादा बॉम्ब फुटावा असे आवाज बुलेट गाड्याचे येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना, रुग्णांना, वृध्दांना त्रास होत आहे. पोलिसांनी आठ महिन्यात १ हजार ६१० गाड्यांवर कारवाई केली, मात्र त्याचा धाक काही बुलेट धारकांना बसताना दिसत नाहीये.

पोलिसांनी केला दंड वसूल : रस्त्यावर वाहन चालवताना बुलेट स्वारांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मोठ्या आवाजातील सायलेंसर नागरिकांची डोके दुखी ठरत आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात तर मोठ्या आवाजाची बुलेट चालवणे तरुणाईंसाठी स्टेटस बनले आहे. शासाने दिलेले निर्देश आणि कंपनीने दिलेल्या निकषांना डावलून खाजगी मेकॅनिककडून मोठा आवाज करणारे सायलेंसर लावण्याचे प्रकार सर्रास वाढले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अशा दुचाकीस्वारांवर कारवाई करत १६ लाख ९ हजारांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई १ जानेवारी ते १५ ऑगस्ट दरम्यान करण्यात आली, अशी माहिती वाहतूक शाखा सहायक पोलीस आयुक्त संपत शिंदे यांनी दिली.

पोलिसांची होते पळापळ : बुलेटच्या आवाजामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेतच. त्याचबरोबर पोलिसांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. 16 ऑगस्टच्या दुपारी उस्मानपुरा हद्दीत गोपाल टी सेंटर परिसरात गोळीबार झाल्याची चर्चा सुरू होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच, पोलीस उपायुक्तांसह त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी जवळपास अर्धा तास सर्व परिसर पिंजून काढला. मात्र, कुठेही गोळी चालवल्याबाबत माहिती मिळाली नाही. काही वेळाने त्या ठिकाणी बुलेटच्या सायलेन्सरमधून आवाज आल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून, त्यानुसार दोन बुलेट स्वारांना ताब्यात घेतले. त्यांच्या वाहनांची तपासणी करून एका वाहनावर कारवाई केली.

व्यावसायिकांवर कारवाई का नाही? : शासनाने केलेल्या सूचनेनुसार वाहन तयार केले जातात. त्यात कुठलाही बदल करू नये, अशी ताकीद दुचाकी, चारचाकी कंपन्यांकडून दिली जाते. असं असलं तरी, बाहेर व्यावसायिक सर्रास गाड्यांना नियमबाह्य साहित्य लावून देतात. त्यात सायलेन्सरचा मोठा वाटा आहे. दुचाकी, चारचाकीतून किती ध्वनी प्रदूषण बाहेर पडावे याचे निकष देण्यात आलेले आहेत. तरी हौस म्हणून सायलेन्सरमध्ये अनधिकृत बदल केला जातो. त्यात वाहन चालकांवर कारवाई होते. मात्र, ज्या व्यवसायिकांनी ते साहित्य विकले, बसवून दिले त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. अशा व्यावसायीकांवर कारवाई केल्यास त्याचा निश्चित परिणाम होइल. त्यामुळे पोलिसांनी अशा व्यावसायीक, दुचाकी चालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.