अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागात एक वाघ जखमी अवस्थेत दिसून आला आहे. त्यानंतर वनविभाग सतर्क झाला आहे. वेळीच उपचारासाठी त्या वाघाचा शोध सुरू करण्यात आला आहे. हा वाघ सापडल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात येतील. दोन वाघांच्या संघर्षामध्ये हा वाघ जखमी झाला असण्याची शक्यता आहे. किंवा शिकार करण्याच्या झटापटीमध्ये हा वाघ जखमी झाला असण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
वन मजुरांना दिसला जखमी वाघ - मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील डोंगराळ भागामुळे वनविभागाला या वाघाचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. काही वनमजुरांना गुगामल वन्यजीव विभागातील जंगलात एक वाघ लंगडत जाताना दिसला. लगेच त्यांनी याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या जखमी वाघाचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. अमरावतीतून वन्यजीव बचाव पथक चिखलदरा येथे रवाना झाले आहे. वाघाचा शोध रात्रीपण घेतला जाणार आहे.
झुंजीत जखमी झाल्याचा अंदाज - सुमारे एक महिन्यापूर्वी गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा अंतर्गत वैराटच्या जंगलामध्ये दोन वाघांच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला होता. तर दुसरा वाघ जखमी झाला होता. जंगलात वनमजुरांना दिसून आलेला वाघ हा या झुंजीतील आहे का, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र या झुंजीतीलच हा वाघ असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
आधीच घ्यायला हवा होता शोध - दुसरा जखमी वाघ आता मरणासन्न अवस्थेत दिसून आल्याचे कळते. ज्यावेळी या दोन वाघांची झुंज झाली, त्यावेळी जर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या जखमी वाघाचा शोध घेतला असता आणि त्याची योग्य सुश्रुषा केली असती तर ही परिस्थिती आली नसती. वनअधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दुसरा वाघ मरणाच्या दारात उभा आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. वाईल्ड लाईफ अवेयरनेस रेस्क्यू अँड रिसर्च सोसायटीचे अध्यक्ष निलेश कांचनपुरे यांनी ही मागणी केली आहे.