Melghat School Issue : अकोल्याच्या संस्थेची मेळघाटात आगळीवेगळी 'सेवा'; 14 शाळांचे स्वीकारले पालकत्व

author img

By

Published : Jul 20, 2022, 3:44 PM IST

Updated : Jul 20, 2022, 4:21 PM IST

Melghat School Issue
Melghat School Issue ()

अकोला येथील सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या ( Bahuuddeshiya Seva Sanstha ) वतीने विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. मेळघाटातील एकूण 14 शाळांचे पालकत्व ( Guardianship of 14 schools in Melghat ) या संस्थेने स्वीकारले असून 14 शाळांमधील एकूण 211 गरीब हुशार होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले आहे.

अमरावती - सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या जिल्ह्यातील मेळघाट या आदिवासी भागात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी तसेच पालकांमध्ये देखील शिक्षणाचे महत्त्व रुजावे यासाठी अकोला येथील सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या ( Bahuuddeshiya Seva Sanstha ) वतीने विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. मेळघाटातील एकूण 14 शाळांचे पालकत्व ( Guardianship of 14 schools in malghat ) या संस्थेने स्वीकारले असून 14 शाळांमधील एकूण 211 गरीब हुशार होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने देखील या संस्थेकडून आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या होणारा लाभ स्वीकारला आहे.

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

असा आहे सेवा बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम : सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मेळघाटातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानुसार एकूण 14 शाळांना पहिल्या टप्प्यात मदत करण्यासाठी निवडण्यात आले. चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या बोलोरी, लवादा, कोहणा, हत्ती घाट, जैतादेवी, ढोमणी पाटा, भांदरी सलोना, बेला, मसुंडी, जामलीवन, भवई, घटांग आणि बिहारी या गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांची निवड करण्यात आली. यापैकी घटांग आणि बिहारी वगळता इतर सर्व बारा गाव ही मुख्यमार्गापासून बऱ्याच आतमध्ये जंगलात वसले आहेत. या सर्व चौदा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विविध खेळांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी आवश्यक असणारी क्रीडा साहित्य सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वितरित करण्यात आले आहे. यासोबतच या चौदा शाळेतील 207 होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक रित्या दत्तक घेऊन त्यांना वर्षभर लागणारे शैक्षणिक साहित्य संस्थेच्या वतीने पुरविली जाणार आहे.


'स्नेहसंमेलन आणि क्रीडा स्पर्धाही घेणार' : मेळघाटातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी नियमित यावे शिकावे खेळावे आणि आपल्या कलागुणांना विकसित करावे, या दृष्टीने हवे तसे प्रयत्न होत नाही. याबाबत अनेकदा शिक्षकांकडून प्रयत्न केले तरी पालकांकडून प्रतिसाद मिळत नाही. मात्र सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने या शाळांचे पालकत्व स्वीकारले जात असताना या शाळांमध्ये दर महिन्याला संस्थेचे प्रतिनिधी भेट देणार असून पालकांमध्ये आपल्या पाल्यांना नियमित शाळेत पाठविण्याबाबत त्यांच्याशी चर्चा करून त्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये देखील शिक्षणाबाबत आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांच्यात दडलेल्या कलागुणांना विकसित करण्यावर देखील भर दिला जाणार असल्याची माहिती सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वैभव वानखडे यांनी ईटीव्ही भारतची बोलताना दिली. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाणार असून क्रीडा स्पर्धा देखील सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने घेतल्या जाणार असल्याचे वैभव वानखडे म्हणाले.



'मदतीची संपूर्ण माहिती राहणार अपडेट' : सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मेळघाटातील 14 शाळांमध्ये केली जाणारी मदत तसेच 211 होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दिले जाणारे शैक्षणिक साहित्य यासाठी एक हात मदतीचा अशी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून दहा रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत मदत मिळाली. ज्या व्यक्तींनी मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मदत केली आहे. त्या प्रत्येक व्यक्तीला आपण दिलेली मदत कोणत्या शाळेला किंवा कोणत्या विद्यार्थ्याला मिळाली याबाबतची संपूर्ण माहिती सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अपडेट केली जाणार आहे. मदत करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने आम्ही दिलेल्या रकमेचे काय झाले याची माहिती त्यांना अगदी क्षणभरातच उपलब्ध केली जाणार आहे. आमच्या सेवा बहुउद्देशीय संस्थेचा एकमेव हेतू हा मेळ्घाटातील चिमुकल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हाच असून यासाठी आम्ही आमच्या वतीने हवे ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे वैभव वानखडे म्हणाले.


'शाळांची करणार रंगरंगोटी' : सेवा बहुउद्देशीय संस्थेने ज्या 14 शाळांचे पालकत्व स्वीकारले आहे, त्यापैकी दहा ते बारा शाळा या अतिशय दुर्गम भागात असून या शाळांच्या इमारतींची डागडुजी करणे अत्यंत गरजेचे आहे. शाळांच्या इमारती मजबूत करणे ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी अख्खी इमारतच बांधून देणे तसेच शहरात शाळेच्या भिंतीवर विद्यार्थ्यांना आकर्षित करणारी ज्याप्रमाणे रंगरंगोटी केली जाते. तशीच रंगरंगोटी मेघाटातील या चौदा शाळांमध्ये सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने केली जाणार आहे. संस्थेच्या या कामाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अविशांत पंडा यांनी परवानगी दिली आहे.


सेवा बहुउद्देशीय संस्थेची अशी झाली मेळघाटात एन्ट्री : अकोला येथील सेवा बहुउद्देशीय संस्था ही 2012 पासून कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने अकोला शहर आणि जिल्ह्यात विविध लहान-मोठे उपक्रम आजवर घेण्यात आले. गतवर्षी दिवाळीमध्ये गरिबांना फराळ वाटप आणि कपडे वाटप करावे यासाठी अकोला शहरासह थेट मुंबईतील झोपडपट्टी परिसरात पोहोचावे अशी तयारी सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आली. मात्र मुंबईला जाण्यापेक्षा मेळघाटातील आदिवासींना अशा मदतीची गरज असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. केवळ पर्यटनासाठी मेघाटातील चिखलदरा येथेच भेट देणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच मेळघाटातील सर्वात दुर्गम भागात वसलेल्या माळी झडप या गावात पोहोचून त्या ठिकाणी दिवाळीच्या फराळाचे वाटप केले तसेच आदिवासी बांधवांना नवीन कपडे देखील वितरित केले. यानंतर भूलोरी आणि लवादा या गावात देखील संस्थेच्या वतीने कपड्यांचे वाटप केले जात असताना भूलोरी येथील शाळेची अवस्था पाहता या भागात कपडे किंवा फराळ वाटप करण्यापेक्षा थेट शैक्षणिक कार्यातच आपण सहभागी व्हावे, असा विचार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनात आला आणि ग्लोरीसहलगतच्या दोन-चार गावांमधील शाळांमध्ये आपण कशी मदत करू शकतो याबाबत नियोजन आखण्यात आले. या संदर्भात संस्थेच्या वतीने सर्वेक्षण केले असता लगतच्या परिसरात डोंगरकपारीत वसलेल्या एकूण 14 गावातील शाळांमध्ये आपली सेवा देता येईल, असे निश्चित करून अकोल्याची सेवा बहुउद्देशीय संस्था मेळघाटात सेवा कार्यासाठी दाखल झाली. संस्थेच्या या कार्यात घटांग येथील माजी वनपाल हर्षाली रिठे. बोलोरीचे सरपंच साबुलाल बेठे, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे क्रीडा विभाग .संचालक डॉ. अविनाश असनारे, बाल मानसशास्त्र अभ्यासक प्रदीप अवचार यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले.


14 शाळांना झाले साहित्य वाटप : सेवा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने निवडण्यात आलेल्या मेळघाटातील सर्व चौदा ही शाळांना उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात शैक्षणिक तसेच क्रीडा साहित्य 17 जुलै रोजी वितरित करण्यात आले. घटांग येथील मोहाच्या गोदामात साहित्य वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या ठिकाणी 14 ही शाळांचे विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. जिजाऊ कमर्शियल बँकेचे अध्यक्ष अविनाश कोठाळे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. अविनाश असनारे, श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान विभाग प्रमुख प्रा. अनिल बंड, भुलोरी गट ग्रामपंचायतचे सरपंच साबुलाल बेठे या सोहळ्याला प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शैक्षणिक जागृती संदर्भात सादर केलेल्या छोट्याशा नाटीकेने उपस्थित विद्यार्थ्यांना खळखळून हसविले.

हेही वाचा - Aurangabad lawyer : जगण्यासाठी वकिलाची जिद्द! शरीर निकामी झालं असताना शोधला जगण्याचा मार्ग- उदय चव्हाण

Last Updated :Jul 20, 2022, 4:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.