ETV Bharat / state

Morshi Murder Case : मोर्शी खून प्रकरणात धक्कादायक खुलासा, सलाईनमधून दिलं आई आणि लहान भावाला 'प्रतिबंधित औषध', कारण...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 4, 2023, 6:45 PM IST

अमरावतीतील मोर्शी शहरात एक सप्टेंबर रोजी आई आणि मुलाचा संशयास्पद मृतदेह आढळला होता. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलीय. या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येतेय, सविस्तर जाणून घेवू या. (Morshi Murder Case)

Morshi Murder Case
मोर्शी खून प्रकरण

पोलीस निरीक्षकांची प्रतिक्रिया

अमरावती : जिल्ह्यातील मोर्शी शहरात एक सप्टेंबरच्या रात्री नऊ वाजता शिवाजीनगर परिसरातील घरात आई आणि मुलाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बेडच्या बॉक्समध्ये आढळून आला होता. त्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सौरभ गणेश कापसे वय 24 याला हैदराबादमधून अटक केलीय. आईच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळं आईसह लहान भावाला सलाईनमधून प्रतिबंधित औषध देऊन ठार मारलंय, अशी कबुली त्यानं दिलीय.

'असं' आहे संपूर्ण प्रकरण : नीलिमा गणेश कापसे वय 45 आणि आयुष गणेश कापसे वय 22 या दोन्ही मायलेकांचा मृतदेह घरात बेडच्या बॉक्समध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेमुळं मोर्शीसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणात नीलिमा कापसे यांचा मोठा मुलगा सौरभ कापसे यानंच आई आणि लहान भावाची हत्या केल्याच समोर येतंय. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी धक्कादायक खुलासा केलाय.


आई आणि भावाला संपवून 'तो' पळाला : सौरभ कापसे यानं इलेक्ट्रॉनिक शाखेत पॉलीटेक्निक केलंय. तो अमरावतीच्या बांधकाम विभागातील वीज विभागात एक वर्षाचा कंत्राटी तत्वावर कामाला आहे. सौरभचे वडील आठ वर्षांपूर्वी दगावले. त्याची आई वनविभागात रोजंदारी तत्त्वावर कामाला आहे. आईच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळं सौरभनं आईसह त्याच्या लहान भावाची हत्या केली. तो मोर्शीहून आधी अमरावतीला आला, त्यानंतर त्यानं नागपूर गाठले. नागपूरवरून तो शिर्डीला गेला अन् शिर्डीवरून थेट हैदराबादला पळाला. यावेळी त्याने त्याच्या आईच्या बँक खात्यात असणारे सुमारे दीड लाख रुपये ऑनलाइन ट्रांझॅक्शनद्वारे काढले, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वाघमारे यांनी दिलीय. हैदराबादला तो आकाश रहाटे या नावाने एका हॉटेलमध्ये थांबला होता. मराठी माणूस हॉटेलमध्ये असल्याच्या माहितीच्या आधारे आम्ही त्याला ताब्यात घेतलंय, असं किरण वाघमारे म्हणाले. (Morshi son killed his mother and brother)


'असा' रचला हत्येचा कट : आईच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळं आईला ठार मारण्याचा विचार सौरभच्या डोक्यात सतत फिरत होता. वैद्यकीय क्षेत्रातील अनेकजण त्याचे मित्र होते. यामुळं मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध असणाऱ्या आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधितांशिवाय इतर कोणालाही न मिळणारे औषध आपल्याला कसं मिळेल, याचा तो सतत विचार करायचा. एक व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करायचा आहे, असं सांगून सौरभने औषधी व्यावसायिक असणाऱ्या मित्राचा मोबाईल काही वेळासाठी स्वतःकडे घेतला होता. त्या मोबाईलमध्ये असणारं मेडिकलचं लायसेन्स त्यानं स्वतःच्या फोनवर घेतलं. हे लायसेन्स त्याने औषधी बाजारात दाखवून आम्ही पार्टनर आहोत, असं सांगून चार महिन्यापूर्वी बेशुद्धीचं एक औषध खरेदी केलं होतं. यासह आणखी एक औषध त्यानं ॲमेझॉनवरून मागवलं होतं. हे औषध त्याने आईला आणि भावाला जेवणातून दिलं होतं. यामुळे आईची आणि भावाची तब्येत खराब झाली होती. त्या दोघांनाही त्याने त्यावेळी दवाखान्यात नेवून उपचार केला होता.

'असा' साधला डाव : कधीकाळी स्वतःच्या अंगात देव येत असल्याचं सौरभनं पोलिसांना सांगितलंय. त्याचं मानसिक संतुलन ठीक नाही. अशा अवस्थेत असणाऱ्या सौरभची अतिशय शांतपणे चौकशी केली असता त्याने आई आणि भावाची हत्या कशी केली, याबाबत आम्हाला माहिती दिल्याचं किरण वाघमारे यांनी सांगितलंय. चार महिन्यापूर्वी आई आणि भावाच्या हत्येचा कट फसला होता. त्यामुळं आता 23 ऑगस्टला सौरभनं धोत्र्याच्या बिया विकत घेतल्या. त्या आई आणि भावाला जेवणातून खाऊ घातल्या. यानंतर ते दोघेही आजारी पडल्याने त्याने त्यांना आधी दवाखान्यात नेलं. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी तुम्हाला सलाईन द्यायला सांगितलंय, असं म्हणत सौरभने स्वतः खरेदी करून आणलेलं सलाईन आपल्या मित्राच्या हातानं आई आणि भावाला लावलं. त्याने मित्राला घरी पाठवून मी सलाईन काढून घेईन, असं सांगितलं. यानंतर सौरभनं बाजारातून खरेदी केलेलं विषारी औषध दोघांच्याही सलाईनमध्ये टाकलं. सलाईनमधून आईच्या आणि भावाच्या शरीरात विषारी औषध गेल्यावर त्या दोघांचाही मृत्यू झाला. त्याचा मृत्यू झाल्याची खात्री त्याने केली. रात्रभर दोन्ही मृतदेह घरात पडून होते. दुसऱ्या दिवशी सकाळी सौरभने आई आणि भावाचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत पॅक करून बेडच्या बॉक्समध्ये ठेवले. त्यावर ब्लॅंकेट, उषा, चादरी ठेवून घराच्या मागील दाराला कुलूप लावून पळ काढला. (Murder Case)


खोटं आधार कार्ड : सौरभ कापसे हा अतिशय कूट बुद्धीचा आहे. मे महिन्यात त्याचं चांदूरबाजारमध्ये कुणाशी तरी भांडण झाले होतं. तेव्हा त्याला अमरावतीच्या पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. त्यानं त्या ठिकाणी त्याला दिल्या जाणाऱ्या औषधींचा अभ्यास केला होता. याच ठिकाणी त्यानं गुंगीचं औषध कोणतं, याची माहिती घेऊन ते औषध देखील मिळवलं होतं. आई आणि भावाची हत्या (Murder news) केल्यावर तो आकाश रहाटे या नावाने हैदराबादच्या एका हॉटेलमध्ये थांबला होता. विशेष म्हणजे त्यानं त्याच्या स्वतःच्या लॅपटॉपमधूनच आकाश रहाटे नावाचं त्याचं खोटं आधार कार्ड देखील बनवलं होतं. बाजारामध्ये केवळ डॉक्टर आणि औषधी व्यावसायिकांनाच उपलब्ध होणाऱ्या औषधी राजरोसपणे कशा सर्वसामान्यांना देखील मिळतात, हे मी तुम्हाला दाखवून देतो असं देखील सौरभनं पोलिसांना सांगितलंय.


सौरभ आत्महत्या करण्याच्या तयारीत : आई आणि भावाची हत्या केल्यावर सौरभ पूर्णतः खचला आहे. आपण नेमकं काय केलं, याबाबत त्याला कुठलंही भान नाही. या संपूर्ण प्रकारानंतर सौरभ देखील आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी हैदराबाद येथून त्याला ताब्यात घेतल्यावर अमरावतीला पोहोचेपर्यंत आई आणि भावाच्या हत्येसंदर्भात कुठलाच प्रश्न विचारला नव्हता. अमरावतीत आल्यावर पोलिसांनी अतिशय शिताफीनं सौरभकडून या हत्याकांडाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तो अडकला.

हेही वाचा :

  1. Morshi Murder Case: आई आणि भावाचा खून करून मुलगा झाला पसार; मोर्शी शहरात खळबळ
  2. Daughter Killed Mother in Law : सासू-सुनेचं भांडण टोकाला; सुनेनं केली वयोवृद्ध सासूची हत्या
  3. Crime News : एकाच कुटुंबातील ४ जणांची चाकू आणि विळ्यानं निर्घृण हत्या
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.