ETV Bharat / state

Hinglaj Mata Amravati : बलुचिस्तानमधून अमरावती जिल्ह्यात आली ज्वालामाता, हिंगलाजमाता म्हणून आहे प्रसिद्ध वाचा हा विशेष रिपोर्ट

author img

By

Published : Mar 8, 2023, 1:50 PM IST

Updated : Mar 14, 2023, 8:23 AM IST

पाकिस्तानमध्ये असणाऱ्या बलुचिस्तान प्रांतातून ज्वालामाता तेराव्या शतकात थेट अमरावती जिल्ह्यात आली असल्याची आख्यायिका आहे. विशेष म्हणजे ही ज्वालामाता आता हिंगलाजमाता म्हणून ओळखली जाते. या हिंगलाज मातेचे जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात तीन पर कोटाच्या आत भव्य मंदिर आहे. मंदिरालगत वसलेल्या गावाला मातेच्या नावावरून हिंगलाजपूर असे नाव देण्यात आले आहे. अधिक माहिती या विशेष रिपोर्टमधून जाणून घेवू या.

Hinglaj Mata Amravati
अमरावती जिल्ह्यातील ज्वालामाता

अमरावती जिल्ह्यात ज्वालामाता

अमरावती : श्री हिंगलाज देवीचे मूळ स्थान हे पाकिस्तानातील बलुचिस्तान येथे आहे. फार पूर्वी बलुचिस्तानमध्ये हिंगलाज मातेचा मोठा थाट होता. मात्र कालांतराने हिंगलाज देवीला त्या ठिकाणी चिंता वाटायला लागली. आपल्या खरा भक्ताच्या शोधात ती निघाली असताना ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून ती वऱ्हाडातील अकोली नगरीत आली. अकोली नगरीजवळ सत्य अरण्य या जंगलात हिंगलाज मातेला अमृतगीर महाराज ज्वालामुखी हिंगलाज देवीची तपस्या करीत असल्याचे त्यांना दिसले. अमृतगीर महाराजांच्या सहकार्याने त्यांनी चिंतामणजी भगत या देवीच्या भक्ताची कठीण परीक्षा घेतली. चिंतामणजी भगत हे अकोली येथे त्यांच्या बहिणीकडे गुरे चारण्याचे काम करीत होते.

नाव पडल्याची आख्यायिका : अतिशय आजारी असताना चिंतामणजी भगत यांना ज्वालामुखी हिंगलाज मातेने दृष्टांत दिला. या दृष्टांतानुसार त्यांनी अमृतगीर महाराजांच्या सहकार्याने हिंगलाज मातेची पालखी अकोली नगरीतून घनदाट अरण्यात नेली. मातीच्या दृष्टांतानुसार त्यांनी घनदाट जंगलात तीन भव्य परकोट उभारून परकोटाच्या मधात उंबराच्या झाडाखाली मंदिर उभारून या मंदिरात इ.सन 1303 मध्ये देवीची प्राणप्रतिष्ठा केली. तेव्हापासून मंदिर परिसरात असणाऱ्या परिसराला हिंगलाजपूर असे नाव पडल्याची आख्यायिका असल्याची माहिती या मंदिराचे सेवाधारी रामदास भगत यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.


नऊ पिढ्यांपासून करीत आहेत देवीची सेवा : या मंदिरामध्ये या मंदिराचे संस्थापक चिंतामणजी भगत यांची मूर्ती देखील स्थापन करण्यात आली आहे. त्यांचा जीवन कार्यकाळ 1250 ते 1357 असल्याचा उल्लेख देखील आहे. चिंतामणजी भगत यांच्यानंतर मंदिराचे सेवाधारी म्हणून 1358 ते 1453 दरम्यान फिरकुजी भगत हे ह्या मंदिराचे सेवाधारी होते. यानंतर 1654 ते 1544 दरम्यान कृष्णाजी भगत यांनी सेवाधारी म्हणून हे मंदिर सांभाळले. 1545 ते 1638 हा नागोजी भगत हे मंदिराचे सेवाधारी होते.

हिंगलाज देवी संस्थानची जबाबदारी : 1639 ते 1735 दरम्यान सटवाजी भगत यांनी सेवाधारी म्हणून हे मंदिर सांभाळले. 1736 ते 1830 दरम्यान आकाजी भगत हे मंदिराचे सेवाधारी होते. 1831 ते 1920 दरम्यान गणोजी भगत यांनी या मंदिराची सेवा केली. 1921 ते 1992 पर्यंत परशुरामजी भगत हे या मंदिराचे सेवाधारी होते. आता भगत कुटुंबातील नव्या पिढीतील रामदास भगत यांच्याकडे सेवाधारी म्हणून हिंगलाज देवी संस्थानची जबाबदारी आहे.


हनुमान जयंतीला यात्रा : हिंगलाज देवीच्या मंदिर परिसरात महादेवाचे तसेच हनुमानाचे मंदिर देखील आहे. या मंदिरात नवरात्र उत्सवात अष्टमीच्या दिवशी या मंदिरात होम पेटतो. नवरात्र उत्सवासोबतच हनुमान जयंतीचा उत्सव या मंदिरात मोठ्या उत्साह साजरा केला जातो. विशेष म्हणजे हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. या यात्रेच्या दिवशी लाकडाचे 11 गाडे ओढण्याची परंपरा आहे. हा गाडे ओढण्याचा सोहळा पाहण्यासाठी हिंगलाजपूर परिसरालगत असणाऱ्या अनेक गावांमधून हजारो लोक येतात. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे ही यात्रा भरते. दुपारी तीन वाजेपर्यंत हा संपूर्ण परिसर शांत झालेला असतो, अशी माहिती देखील रामदास भगत यांनी दिली.



पाकिस्तानातही आहे देवीचे मंदिर : अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्वर तालुक्यात असणारी हिंगलाजपूर येथील हिंगलाज देवी ही मूळची बलुचिस्तानमधील असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे सध्या पाकिस्तानात असणाऱ्या बलुचिस्तान प्रांतात आज देखील हिंगलाज नदीच्या काठावर हिंगलाज मातेचे मंदिर आहे. प्राचीन काळापासून या ठिकाणी असणाऱ्या हिंगलाज मातेच्या दर्शनासाठी पाकिस्तानातील अनेक हिंदू धर्मीय नियमित जातात, अशी माहिती हिंगलाजपूर येथील देवीच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.




हेही वाचा : International Womens Day 2023 : वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देसाईंचा संघर्षमय प्रवास

Last Updated :Mar 14, 2023, 8:23 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.