ETV Bharat / state

Dasara Special Story : दसरा महोत्सवाच्या चित्त थरारक कवायतींसाठी शेकडो विद्यार्थ्यांचा सराव; 93 वर्षांपासूनची परंपरा कायम

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2023, 12:40 PM IST

Dasara Special Story : दरवर्षी दसरा महोत्सवाच्या निमित्तानं अमरावती शहरातील दसरा मैदानावर दसरा मेळाव्याचं आयोजन केलं जातं. तसंच मागील 93 वर्षांपासून श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीनं या दसरा मेळाव्यात युवक चित्त थरारक कवायती सादर करतात. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आपण या मंडळाच्या परंपरेविषयी जाणून घेऊया.

Dussehra Special Story
दसरा महोत्सवाच्या चित्त थरारक कवायतींसाठी शेकडो विद्यार्थ्यांचा सराव; 93 वर्षांपासूनची परंपरा कायम

दसरा महोत्सवाच्या चित्त थरारक कवायतींसाठी शेकडो विद्यार्थ्यांचा सराव; 93 वर्षांपासूनची परंपरा कायम

अमरावती Dasara Special Story : अमरावतीच्या ग्रामदैवत असणाऱ्या कुलस्‍वामिनी अंबादेवी आणि एकवीरा देवी यांच्या सीमोलंघनासाठी अमरावती शहरातील दसरा मैदान येथे दसरा मेळावा आयोजित केला जातो. दरम्यान, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीनं गत 93 वर्षांपासून या दसरा मेळाव्यात अतिशय शिस्तबद्धरीत्या युवक चित्त थरारक कवायती सादर करतात. या खास कवायतींचा सराव सध्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर सुरू आहे.



असा आहे इतिहास : अमरावतीच्या श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होणाऱ्या युवकांना सैनिकी प्रशिक्षण मिळावं यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इंडियन संरक्षण दलाची स्थापना केली. अमरावती शहरात श्री अंबादेवी आणि श्री एकविरा देवी यांच्या यात्रेनिमित्त मोठी गर्दी होत असल्यानं मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला असणाऱ्या हनुमान व्यायाम शाळेत नवरात्र उत्सवाच्या दिवसांमध्ये युवकांना सैनिकी प्रशिक्षण दिले जायचं. या सैनिकी प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून हनुमान व्यायाम शाळेच्या वतीनं 1930 मध्ये श्री अंबादेवी आणि श्री एकवीरा देवी या दसऱ्याच्या पर्वावर शहरातील सीमा ओलांडून परत मंदिराकडे वळतात, त्या ठिकाणी या प्रशिक्षित युवकांकडून कवायतींचे आयोजन करण्यास सुरुवात झाली. 1930 पासून सुरू झालेल्या ह्या कवायती आतापर्यंत सुरू असून अमरावती शहरातील दसरा महोत्सवाची खास ओळख या कवायतींनी निर्माण केली आहे.



असे होते सादरीकरण : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथील डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनचे तीन ते चार हजार विद्यार्थी विविध खेळांचे प्रात्यक्षिक दसरा मेळाव्यात सादर करतात. यामध्ये प्रामुख्यानं सामूहिक कराटे, मल्लखांब,मार्शल आर्ट, जिम्नॅस्टिक, लेझीम,एरोबिक्स, बॉडी बिल्डिंग, रशियन ड्रिल, ढाल, तलवार, दांडपट्टा, भाला, डंबेल्स, तायकांडो असे सुमारे 30 ते 35 थरारक कवायती दसरा महोत्सवात सादर केल्या जातात.



असा सुरू आहे सराव : या कॉलेजमध्ये देशातील 25 राज्यातील विद्यार्थी शिकत आहे. या विद्यार्थ्यांसह आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थी कवायती सादर करणार असून गत 15 ते 20 दिवसांपासून या चित्रपटांचा सराव मंडळाच्या मैदानावर सुरू आहे. श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य आणि मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी शेळके यांच्या मार्गदर्शनात हा सराव केला जातोय.



जिम्नॅस्टिकमध्ये एशियन स्पर्धेत यश : श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे खेळाडू कृष्णा भट्टड आणि हिमांशू जैन यांना नुकतेच एशियन जिम्नॅस्टिक स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल मिळालं असून हे दोन्ही खेळाडू दसऱ्याच्या पर्वावर अमरावतीत येत आहेत. दसरा मेळाव्यात या दोघांचाही सत्कार जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांच्या हस्ते केला जाणार असून या दोघांच्या यशामुळे यावर्षीच्या दसऱ्याचा आनंद आणखी द्विगुणीत झाला असल्याचे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी चेंडके यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हटले आहे.

हेही वाचा -

  1. अमरावतीत जिल्ह्यातील प्रत्येक मुलगी होणार 'स्वयंसिद्धा'
  2. अमरावतीत राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेची जोरदार सुरुवात; पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन
  3. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांची पाठ; राणा दाम्पत्य ठरले हिरो
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.