ETV Bharat / state

Cyberchondria Social Problem: समाजात वाढतो आहे 'सायबरकॉन्ड्रिया'; डॉक्टर म्हणतात सजग होण्याची गरज

author img

By

Published : Jul 9, 2023, 9:24 PM IST

Updated : Jul 11, 2023, 5:17 PM IST

Cyberchondria Social Problem
सायबरकॉन्ड्रिया

लहान-सहान गोष्टींसोबतच व्यक्तींना कुठल्याही कारणाने बरं वाटत नसेल तर त्यावर कुठले औषध घ्यावे, याची माहिती देखील इंटरनेटवरून घेऊन ते औषध खरेदी करून घेण्याचे प्रकार वाढले आहे. हा प्रकार मोठ्या समस्येला कारणीभूत ठरू शकणार हा समाजात वाढत असणारा आजार आहे. या आजाराला 'सायबरकॉन्ड्रिया' असे म्हणतात. या आजाराबाबत समाजात जागृती निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. या संदर्भात स्त्रीरोगतज्ज्ञ आणि रोटरी क्लब ऑफ अमरावतीच्या अध्यक्ष डॉ. मोनाली ढोले यांनी 'ईटीव्ही भारतशी बोलताना आवाहन केले.

'सायबरकॉन्ड्रिया' या आजाराविषयी माहिती देताना डॉ. मोनाली ढोले

अमरावती: अलीकडे सामान्य लोक आपल्याला काय होतंय किंवा आपल्याला आजाराची काही लक्षणे असतील, शारीरिक दृष्ट्या काही समस्या असतील त्याची माहिती लगेच इंटरनेटवर सर्च करतात. आपल्याला असलेली लक्षणे नेमक्या कोणत्या आजाराची आहेत आणि त्यावर काय उपाय आहेत याचा शोध घेतात. मात्र, अशा आजारांबद्दल इंटरनेटवर माहिती घेऊन स्वतःच स्वतःवर उपचार करण्याचा प्रयत्न हा खऱ्या अर्थाने आजारी पडण्याचा अधिक धोका निर्माण करणारा आहे. यामुळे एखादी साधी निष्काळजी एखाद्या व्यक्तीला मोठ्या समस्येपर्यंत घेऊन जाऊ शकते. याच संपूर्ण प्रकाराला 'सायबरकॉन्ड्रिया' असे म्हटले जाते, असे डॉ. मोनाली ढोले म्हणाल्या. कुठलाही आजारा संदर्भात इंटरनेटवर असणारी माहिती ही वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी तसेच डॉक्टर यांच्यासाठी आहे. या माहितीमुळे डॉक्टरांना रुग्णांवर योग्य उपचार करण्याच्या दिशेने मदत मिळते. मात्र, घरी बसल्यास इंटरनेटवर सर्वसामान्य व्यक्ती अशी माहिती वाचून स्वतःवर उपचार करून घेण्याचा जो काही प्रकार करतात तो अतिशय घातक असल्याचे देखील डॉ. मोनाली ढोले यांनी स्पष्ट केले.

गुगल डॉक्टर धोकादायक: खरंतर आपण आपल्या स्वतःबद्दल अनावश्यक काळजी करणे सोडून देणे हा 'सायबरकॉन्ड्रिया' पासून स्वतःचा बचाव करण्याचा सर्वांत उत्तम उपाय आहे. आजची तरुण पिढी आणि मध्यमवर्गीय महिला 'सायबरकॉन्ड्रिया'मुळे सर्वाधिक प्रमाणात ग्रासले आहेत. मी माझ्या रुग्णालयात गुगल डॉक्टर धोकादायक असल्या संदर्भातील फलक लावून 'सायबरकॉन्ड्रिया' पासून सुरक्षित राहण्यासंदर्भात संपूर्ण माहिती रुग्णांसाठी उपलब्ध करून दिली असल्याचे डॉ. मोनाली ढोले म्हणाल्या. इंटरनेटवर काही माहिती मिळाल्यास ती अंतिम सत्य नसते, हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. कारण इंटरनेटवर अनेकदा चुकीची माहिती देखील असते. याबाबतीत केवळ तज्ज्ञांच्या मतांचा आधार घ्यायला हवा तसेच कुठल्याही आजारा संदर्भातील लक्षणे एखाद्या व्यक्तीमध्ये असतील तर त्यांनी थेट डॉक्टरांकडे जावे. डॉक्टरांवर विश्वास ठेवावा आणि त्यांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नयेत असे देखील डॉ. मोनाली ढोले यांनी स्पष्ट केले.

सायबरकॉन्ड्रियामुळे डिप्रेशनची भीती: आजकाल एखाद्या आजारावर नेमका कुठला उपचार करायचा कुठल्या औषधी घ्यायचा याबाबत रुग्णांना सर्व माहिती असल्याचे जाणवते. इतकेच नव्हे तर औषध घेऊन स्वतःवरच उपचार करणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढली असल्याचे दिसते आहे. वास्तविक इंटरनेटवर जाहिराती फ्लॅश करण्यासाठी कुठल्या आजारा संदर्भात कुठला उपचार याबाबतची माहिती अतिशयोक्ती करून दिली जाते. यामुळे ती माहिती किती खरी आणि खोटी हे सर्वसामान्य व्यक्ती समजू शकत नाहीत. मात्र, इंटरनेटवर असणारी माहिती वाचून अनेकदा आपल्याला एखादा आजार जडला असल्याची भावना, भीती अनेकांमध्ये रुजली जाते. यामुळे अनेकांमध्ये सध्या डिप्रेशनमध्ये जाण्याची भीती वाढली आहे. इंटरनेटवरील माहिती प्रत्येकाने जाणून घेण्यास हरकत नाही; मात्र आपल्या आरोग्य संदर्भात स्वतः चुकीचे निदान करणे हे घातक आहे. बरं वाटत नसलं किंवा कुठल्या आजाराबाबत शंका असेल तर प्रत्येक व्यक्तीने डॉक्टरांजवळ जाऊनच उपचार घ्यावा. आपल्या शंकांचे निरसन करावे असा सल्ला डॉ. मोनाली ढोले यांनी दिला.

Last Updated :Jul 11, 2023, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.