ETV Bharat / state

Congress On Sambhaji Bhide : संभाजी भिडेंच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक; गुन्हा दाखल करून अटकेची मागणी

author img

By

Published : Jul 28, 2023, 9:07 PM IST

Congress On Sambhaji Bhide
संभाजी भिडे

करमचंद गांधी नव्हे तर एक मुस्लिम जमीनदार राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खरा बाप आहे, असे धक्कादायक विधान संभाजी भिडे यांनी काल (गुरुवारी) आयोजित केलेल्या सभेत केले होते. याविरोधात आता कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देऊन केली आहे.

संभाजी भिडे विषयीची कॉंग्रेस पदाधिकाऱ्याची प्रतिक्रिया

अमरावती : शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांची गुरूवारी सायंकाळी शहरातील बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम् येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आणि त्यांचे वडील करमचंद गांधी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले. त्यावेळी भिडे म्हणाले की, मोहनदास हे चारित्र्य संपन्न व शिलवान करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते त्या जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले. त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला, असा दावा संभाजी भिडे यांनी केला होता.

जनमानसांच्या भावना दुखावल्या : यासंदर्भात तक्रार दाखल करताना महाराष्ट्र प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे यांनी सांगितले की, महात्मा गांधी यांच्याबद्दल भिडे यांच्या लाजिरवाण्या वक्तव्यामुळे सर्वसामान्य जनमानसांच्या भावना दुखावल्या आहेत. संभाजी भिडे यांच्यासंदर्भात आपल्याकडे काही पुरावा आहे का, असे उलट पोलिसांनी आम्हाला विचारले असल्याचे कुयटे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.


भिडेंच्या अटकेची काँग्रेसने केली मागणी : संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्याबद्दल त्यांना पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्वरित अटक करावी, अशी मागणी केली. बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सभा उधळण्याचा प्रयत्न : वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असलेले संभाजी भिडे यांची सभा उधळण्याचा प्रयत्न अमरावती येथील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी काल केला होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो महापुरुष शहीद झाले; मात्र हे भिडे स्वातंत्र्य दिनाला काळा दिवस म्हणून दुखवटा पाळण्याचे सांगतात. राष्ट्रीय ध्वज, संविधान, राष्ट्रगीत, महामानवांचा, महिलांचा वारंवार अपमान करून संपूर्ण भारतीयांच्या भावना दुखवतात. त्यामुळे समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करत काल आंबेडकरी संघटनांनी संभाजी भिडेंची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता.

तर राज्यभर आंदोलन करू : संभाजी भिडेंच्या अमरावतीच्या सभेतील खळबळजनक व्यक्तव्याचे अमरावतीत संतप्त पडसाद उमटले आहेत. संभाजी भिडे यांना अटक न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा काँग्रेसने इशारा दिला आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची पोलिसांकडे व्हिडिओ व ऑडिओ क्लिप उपलब्ध नाही. अमरावती पोलीस व गुप्तचर यंत्रणा का गप्प आहे, असा आरोप काँग्रेसचे नंदकिशोर कुयटे यांनी केला आहे.

हेही वाचा:

  1. Sambhaji Bhide Statement : संभाजी भिडेंची बुद्धी...; अटक करण्याची विरोधकांची मागणी
  2. Sambhaji Bhide : महात्‍मा गांधींचे खरे वडील मुस्लिम जमीनदार - संभाजी भिडेंचे खळबळजनक वक्‍तव्‍य
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.