ETV Bharat / state

Free Dinner To Patients Relatives: नानकर दांपत्याकडून रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण; जिल्हा सामान्य रुग्णालयात खास उपक्रम

author img

By

Published : Feb 27, 2023, 7:49 AM IST

समाजसेवेचा वारसा असणाऱ्या प्रकाश आमटे यांच्या कन्या आरती आणि त्यांच्यासोबतच समाजसेवेची कास धरणारे त्यांचे पती उदय नानकर हे अमरावती शहरात निराधारांना आधार देऊन त्यांना योग्य दिशा देण्याचे कार्य करीत आहेत. या निराधारांचा सांभाळ करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांनी खानावळ सुरू केली आहे. या खानावळीच्या माध्यमातून रुग्णालयात येणाऱ्या गरिबांना सुखाचे दोन घास मिळावे म्हणून रोज सायंकाळी 50 जणांना मोफत जेवणाची व्यवस्था देखील या दांपत्याने केली आहे.

Amravati News
नानकर दांपत्याचा जिल्हा सामान्य रुग्णालयात खास उपक्रम

नानकर दांपत्याचा जिल्हा सामान्य रुग्णालयात खास उपक्रम

अमरावती : स्वच्छ बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून आरती नानकर आणि उदय नानकर हे अमरावती शहरातील चैतन्य कॉलनी परिसरात ते राहत असलेल्या घरीच निराधार गरजवंतांना आश्रय देतात. गत तीन वर्षांपासून सुरू असणाऱ्या या उपक्रमा अंतर्गत त्यांच्याकडे आतापर्यंत 30 ते 40 जण येऊन गेले आहेत. अनेकजण कुठल्यातरी कारणामुळे घरातून कंटाळून निघाल्यावर अमरावतीत आले. नंतर त्यांची भेट आरती आणि उदय यांच्याशी झाली.



असा आहे उपक्रम : काही दिवस अशा व्यक्तींना आपल्या घरी ठेवल्यावर त्यांच्याशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून नानकर दांपत्याने अनेकांच्या घरातील वाद सोडवले. घर सोडून बाहेर पडलेल्या अनेक वृद्धांना आपल्या घरी पुन्हा सन्मानाने पाठवले. काही विधवा आणि परितक्त्या महिलांना या दांपत्याने आधार दिला. निराधारांना आधार देताना पैशांची गरज भासते. आमच्या जवळचे पैसे संपले आता आम्ही तुम्हाला जेवण देऊ शकत नाही, असे आम्ही सांगू शकत नाही. आम्ही सेवेचे जे व्रत घेतले ते आम्हाला कायम ठेवायचे आहे. त्यामुळे या निराधारांच्या सेवेसाठी आम्ही जिल्हा सामान्य रुग्णालयातील खानावळ चालवायला घेतली असल्याचे उदय नानकरी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.


रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण : आज या खानावळीच्या माध्यमातून जे काही पैसे मिळतात, त्याद्वारे आम्ही आमच्याकडे येणाऱ्या गरजवंतांची गरज भागवू शकतो. कुटुंबातून समाजातून भरकटलेल्या एखाद्या व्यक्तीला आपण मदत करतो आहे, याचा आनंदच आमच्यासाठी महत्त्वाचा असल्याचे उदय नानकर म्हणाले. जिल्हा सामान्य रुग्णालयात आम्ही खानावळ सुरू केली, तेव्हापासून रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या गरीब रुग्णांची परिस्थिती आम्ही पाहतो आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने रुग्णांना सकाळी दूध नाश्ता आणि जेवण दिले जाते.

सायंकाळच्या जेवणाची मोफत व्यवस्था : गरीब कुटुंबातील रुग्णांच्या नातेवाईकांना मात्र मोफत काही मिळत नाही. यामुळे आम्ही मुंबईच्या वीत आर्य संस्थेच्या 'दोन घास' या सामाजिक उपक्रमांतर्गत अमरावती शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल रुग्णांच्या 50 नातेवाईकांसाठी सायंकाळच्या जेवणाची मोफत व्यवस्था केली आहे. जेवणामध्ये साधारणतः दोन पोळ्या एक वाटी भाजी, वरण, भात, सलाद दिले जात आहे. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास उपहारगृहाजवळ पॅकिंग स्वरूपात हे जेवण आम्ही गरजवंतांना देत आहोत. सध्या हा उपक्रम 50 जणांसाठी असला तरी भविष्यात आणखी अधिक गरजूंना याचा लाभ मिळावा, यासाठी आमचे प्रयत्न असतील असे आरती नानकर आणि उदय नानकर म्हणाले.

हेही वाचा : Aaditya Thackeray: गद्दारी, ५० खोके, मिंधे गट.. आदित्य ठाकरेंनी सगळंच काढलं.. 'होम पीच' वरळीत जोरदार 'बॅटिंग'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.