ETV Bharat / state

शिर्डी : 'असा' होणार साईबाबांचा 103 वा पुण्यतिथी उत्सव साजरा

author img

By

Published : Oct 13, 2021, 3:24 PM IST

साईबाबांची पुण्‍यतिथीला भिक्षाझोळीचा कार्यक्रम होत असतो. त्‍यानुसार उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी भिक्षाझोळीकरीता गांवकरी व साईभक्‍तांकडून भिक्षा स्विकारण्‍यात येईल.

शिर्डी
शिर्डी

शिर्डी - साईबाबा संस्थानाच्या वतीने सालाबादप्रमाणे या वर्षीही गुरुवार दिनांक १४ ऑक्‍टोबर ते रविवार दिनांक १७ ऑक्‍टोबर २०२१ या कालावधीत साईबाबांची १०३ वी पुण्‍यतिथी उत्सव साजरा करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाही उत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍यात येणार आहे. उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रुढी परंपरेनुसार प्रतिकात्‍मक भिक्षा झोळीसाठी गांवकरी/साईभक्‍तांकडून भिक्षा स्विकारण्‍याची मंदिर परीसरातच व्‍यवस्‍था करण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानाच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दिली.

यंदाही कोरोनाच्या संकटामुळे शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले होते. त्‍यानुसार दिनांक ५ एप्रिल २०२१ पासून साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आले होते. राज्‍य शासनाने दिनांक ७ ऑक्‍टोबर २०२१ पासून महाराष्‍ट्रातील सर्व धार्म‍िकस्‍थळे काही अटी शर्तीवर खुले करण्‍याचे आदेश दिले आहेत. त्‍यानुसार शासनाच्‍या नियमांनुसार श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांच्‍या दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले आहे. गुरुवार १४ ऑक्‍टोबर ते रविवार १७ ऑक्‍टोबर २०२१ या कालावधीत साजरा करण्‍यात येणारा पुण्‍यतिथी उत्‍सव साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍यात येईल.

भिक्षाझोळीच्या कार्यक्रमाची व्यवस्था

साईबाबांची पुण्‍यतिथीला भिक्षाझोळीचा कार्यक्रम होत असतो. त्‍यानुसार उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी भिक्षाझोळीकरीता गांवकरी व साईभक्‍तांकडून भिक्षा स्विकारण्‍यात येईल. त्यासाठी मंदिर परिसरातील गेट नंबर ०४, पिंपळवाडी रोड गेट नंबर ०२, चावडी समोर, नाट्यगृहा शेजारी तसेच साईनगर मैदान येथे काऊंटर्सची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. तरी गावकरी व साईभक्‍तांनी भिक्षाझोळीत दान भिक्षा देतांना मास्‍कचा वापर करावा. आणि कोरोना नियमांचे पालन करत भिक्षाझोळी काऊंटरवर दान भिक्षा जमा करावी. तसेच कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन संस्‍थानाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.

हेही वाचा - महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती - राजनाथ सिंह

काकडआरतीची वेळ
पुण्‍यतिथी उत्‍सवानिमित्‍त उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी गुरुवार दिनांक १४ ऑक्‍टोबर रोजी पहाटे ४.३० वाजता साईबाबांची काकड आरती, पहाटे ५ वाजता श्रीं च्‍या फोटोची व पोथीची मिरवणुक, पहाटे ०५.१५ वाजता व्‍दारकामाईत श्री साईसच्‍चरिताचे अखंड पारायण, पहाटे ०५.२० वाजता श्रींचे मंगलस्‍नान, सकाळी ०६.०० वाजता श्रीं ची पाद्यपूजा दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती, दुपारी ०४.०० ते ०६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिरातील स्‍टेजवर होईल. सायंकाळी ०६.१५ वाजता धुपारती होईल. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होणार आहे. त्‍यानंतर समाधी मंदिर बंद केले जाईल, परंतु श्री साईसच्‍चरित अखंड पारायण श्री द्वारकामाई मंदिरात रात्रभर चालू राहील.

श्रींची पुण्यतिथी
शुक्रवार, दिनांक १५ ऑक्‍टोबर हा श्रींचे पुण्‍यतिथी उत्‍सवाचा मुख्‍य दिवस आहे. या दिवशी पहाटे ०४.३० वाजता श्रीं ची काकड आरती, पहाटे ०५.०० वाजता अखंड पारायण समाप्‍ती, श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणूक, पहाटे ०५.१५ वाजता श्रींचे मंगल स्‍नान, सकाळी ०६.०० वाजता श्रीं ची पाद्यपूजा, सकाळी ०८.३० वाजता लेंडीबागेत शताब्‍दी ध्‍वजारोहण कार्यक्रम होईल. सकाळी ०९ ते ११.०० वाजता भिक्षा झोळी कार्यक्रम, सकाळी १०.०० वाजता कीर्तनाचा कार्यक्रम तसेच सकाळी १०.३० वाजता श्रींचे समाधी समोर आराधना विधीचा कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वाजता माध्‍यान्‍ह आरती तर सायंकाळी ०५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्‍लंघन कार्यक्रम, सायंकाळी ०६.१५ वाजता धुपारती होईल. तर रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल.

तिसरा दिवस
उत्‍सवाच्‍या तृतीय दिवशी शनिवार, दिनांक १६ ऑक्टोबर रोजी पहाटे ०४.३० वाजता काकड आरती, सकाळी ०५.०५ वाजता श्रींचे मंगल स्‍नान, सकाळी ०६.०० वाजता श्रींची पाद्यपूजा होईल. दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती , दुपारी ०४.०० ते ०६.०० यावेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिरातील स्‍टेजवर होणार आहे. सायंकाळी ०६.१५ वाजता श्रींची धुपारती होऊन रात्रौ १०.३० वाजता शेजारी होणार आहे.

उत्‍सवाच्‍या सांगता दिवशी रविवार, दिनांक १७ ऑक्टोबर रोजी पहाटे ०४.३० वाजता काकड आरती, सकाळी ०५.०५ वाजता श्रींचे मंगल स्‍नान, सकाळी ०६.०० वाजता श्रींची पाद्यपूजा, सकाळी ०६.३० वाजता गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होईल. सकाळी १०.०० वाजता गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार असून दुपारी १२.१० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती, सायंकाळी ०६.१५ वाजता श्रींची धुपारती होऊन रात्रौ १०.३० वाजता होईल.

हेही वाचा - लेफ्टनंट कर्नल रश्मी मिश्रा यांची गळफास घेऊन आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.