ETV Bharat / state

Ahmednagar News: रस्त्यावर बेवारस फिरणाऱ्या मनोरुग्णाचे केले पुनर्वसन; मानवसेवा प्रकल्पाने दिला आधार

author img

By

Published : May 12, 2023, 10:30 PM IST

Ahmednagar News
मानवसेवा प्रकल्पाने आधार

मानसिक संतुलन बिघडून भान विसरलेल्या कर्नाटक मधून शहरात आलेल्या दिक्षीतला, श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानवसेवा प्रकल्पाने आधार दिला आहे. तर त्याच्यावर उपचार करुन त्याचे कुटुंबामध्ये पुनर्वसन केले.

अहमदनगर: रस्त्यांवरून फिरणारे निराधार मनोरुग्णांसाठी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ गेली अनेक वर्षे काम करीत आहे. रस्त्याच्या कडेला पडलेली ही माणसे उचलून मानवसेवा प्रकल्पात आणायची, त्यांच्यावर मानसिक आणि शारीरिक उपचार करायचे, त्यांना बोलत करून त्यांच्या घरचे, गावचे पत्ते मिळवायचे आणि पुन्हा त्यांना त्यांच्या कुटुंबात नेऊन सोडायचे, असे कार्य या संस्थेच्या वतीने सुरु आहे.


समुपदेशक व पुनर्वसन केले: शहरातील पत्रकार चौकात रात्रीच्या वेळेत दाढी, केस वाढलेला युवक रस्त्यावर बेवारस फिरतांना तोफखाना पोलीसांना दिसला. दिक्षीत या युवकाच्या निवार्‍याचा प्रश्‍न पोलीस प्रशासनासमोर उभा राहिला. अशातच श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांनी या युवकाच्या निवारा, उपचार व पुनर्वसनाची संपूर्ण जबाबदारी मानवसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून स्विकारली. 22 जुलै 2022 रोजी दिक्षीतला प्रकल्पात दाखल करुन घेतले. दिक्षीतचे जीवन अतिशय वेदनादायक होते. आपण कोण आहोत आणि कोठे आहोत? याचे त्याला कुठलेही भान नव्हते. आपल्याच विश्‍वात तो हरवलेला होता. अशा अवस्थेत संस्थेचे मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर व वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी दिक्षीतवर उपचार केले. पुजा मुठे यांनी समुपदेशन केले.


कुटुंबात केले पुनर्वसन: उपचार व समुपदेशनानंतर दिक्षीतची मानसिक परिस्थिती बदलली. त्यात सुधारणा झाली. त्याने घरचा संपूर्ण पत्ता सांगितला. संस्थेचे स्वयंसेवक सोमनाथ बर्डे, राहुल साबळे, अजय दळवी, सिराज शेख, अंबादास गुंजाळ यांनी कुटुंबाची माहिती घेतली. दिक्षीत हा कर्नाटक राज्यातील सिमोगा या गावाचा असल्याचे समजले. अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायमूर्ती भाग्यश्री पाटील यांनी दिक्षीतच्या कुटुबियांशी संवाद साधला आणि कुटुंबियांचे भ्रमणध्वनीवरुन समुपदेशन केले. न्यायमुर्ती भाग्यश्री पाटील यांनी दिक्षीतच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेत आर्थिक योगदान दिले आणि पुष्पगुच्छ देऊन दिक्षितला शुभेच्छा दिल्या. दिक्षित उपचाराने बरा होऊन कुटुंबात जात असल्यामुळे संजय शिंगवी व शिंगवी परिवाराने त्याला पुढील आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि कुटुंबात पुनर्वसन करण्यासाठी आर्थिक योगदानही दिले.

मानवसेवा प्रकल्पाच्या कार्याचे कौतुक: तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या मानवसेवा प्रकल्पाच्या कार्याचे विशेष कौतुक केले. संस्थेचे मार्गदर्शक डॉ. अविनाश मोरे यांनी तोफखाना पोलीस स्टेशनला हजर राहून दिक्षीतचे मनोबल वाढवले. संस्थेचे स्वयंसेवक राहुल साबळे व अजय दळवी यांनी 9 मे रोजी कर्नाटक राज्यात जाऊन सिमोगा येथे दिक्षीतला कुटुंबियांच्या ताब्यात सुपुर्द केले. दिक्षीतच्या उपचार व पुनर्वसनासाठी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक अंबादास गुंजाळ, सिराज शेख, सोमनाथ बर्डे, राहुल साबळे, पुजा मुठे, अजय दळवी, मंगेश थोरात, रविंद्र मधे, शोभा मधे, प्रसाद माळी, मच्छिंद्र दुधवडे, विकास बर्डे, श्रीकांत शिरसाठ, सोनाली झरेकर, सागर विटकर, वर्षा सातदिवे यांनी विशेष परिश्रम घेतले.

हेही वाचा -

  1. Hivre Bazar आदर्श गाव हिवरे बाजार येथे सुवर्णमहोत्सवी महाश्रमदानाचे आयोजन पाहा व्हिडिओ
  2. Ancient Trading Market या ठिकाणी सापडली दोन हजार वर्षापूर्वीची पुरातन व्यापारी बाजारपेठ
  3. Shirdi Sai Temple लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.