ETV Bharat / state

गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर साईभक्तांनी घेतले कळसाचे दर्शन; लेझर शो यंदाच्या उत्सवाचे आकर्षण

author img

By

Published : Jul 23, 2021, 10:07 PM IST

Updated : Jul 23, 2021, 10:21 PM IST

Laser show
लेझर शो

गुरूवारी पहाटे द्वारकामाईत सुरू करण्यात आलेल्या अखंड साईसच्चरित्र पारायण सोहळ्याची आज पहाटे काकड आरतीनंतर सांगता झाली.

शिर्डी - कोरोनाचे संकट कायमचे टळू दे व लवकर मंदिर उघडून तुझ्या चरणांचे दर्शन होवू दे, असे साकडे घालत गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर शेकडो भाविकांनी साई मंदिर कळसाच्या दर्शनावर समाधान मानले. तसेच स्थानिक तरुण कारागिरांनी निर्माण केलेला लेझर शो यंदाच्या उत्सवाचे आकर्षण ठरला.

स्थानिक तरुणांनी तयार केलेला लेझर शो

गुरूवारी पहाटे द्वारकामाईत सुरू करण्यात आलेल्या अखंड साईसच्चरित्र पारायण सोहळ्याची आज पहाटे काकड आरतीनंतर सांगता झाली. या निमित्ताने साईप्रतिमा व ग्रंथाची द्वारकामाई मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश तथा संस्थानचे तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर वें.यर्लगड्डा यांनी पोथी, सीईओ कान्हूराज बगाटे यांनी विणा तर डेप्युटी सीईओ रविंद्र ठाकरे व प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांनी साईंची प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी मालदीया यर्लगड्डा, संगिता बगाटे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, सरंक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी आदी उपस्थित होते. तदर्थ समितीचे अध्यक्ष सुधाकर वें.यर्लगड्डा व मालदीया यर्लगड्डा यांच्या हस्ते सकाळी साईंची पाद्यपुजा करण्यात आली. तसेच समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचे विधीवत पुजन करुन ध्वज बदलण्यात आला.

स्थानिकांचा लेझर शो यंदाचे आकर्षण -

स्थानिक तरुण कारागिरांनी निर्माण केलेला लेझर शो यंदाच्या उत्सवाचे आकर्षण ठरला. विशेष म्हणजे साई संस्थानसाठी विनामुल्य हा शो निर्माण करण्यात आला. परमनंट लेझर शो निर्मितीसाठी साई संस्थानमध्ये गेल्या एक तपापासून प्रस्तावित आहे. येथील समर्थ इलेक्ट्रीकचे सुनील बारहाते यांनी महाद्वार चार समोर एक पारदर्शी पडदा लावून त्यावर लेझर शोची निर्मिती केली आहे. यात निलेश बारहाते, योगेश बारहाते, रोहित गायकवाड, प्रविण गवांदे, अशोक गाडेकर, संतोष दुधाट, शंकर खरात, भिमराज खंडीझोड, आकाश पाळंदे, दिनदयाळ वर्मा, प्रसाद वर्पे, साईनाथ शिंदे, सनी तुरकणे, नितीकेश थेटे, रामेश्वर मोरे, निलेश आहिरे व जगदीश साळवे या तरुणांनी परिश्रम घेतले.

या पडद्यावर साकारणारी साईंच्या विविध प्रतिमा, आकाशात उसळणारे विविध रंगी कारंजे, तेथून काही अंतरावर सेवाधाम इमारतीवर पडणारी या लेझर शोची प्रतिछाया लक्षवेधी ठरत आहेत. अमेरिका येथील महिला साईभक्त शुभा पाई यांच्या देणगीतून साईमंदिर व परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.

Last Updated :Jul 23, 2021, 10:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.