ETV Bharat / state

साईबाबांच्या काकड आरतीने शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात

author img

By

Published : Jul 22, 2021, 6:01 PM IST

Updated : Jul 22, 2021, 10:12 PM IST

Gurupournima festival
शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात

गुरूपोर्णिमा उत्सवाला साईनगरीत भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. आज सकाळच्या काकड आरतीनंतर साई मंदिरापासून साईंची प्रतिमा, वीणा आणि साईसच्चरीत्र ग्रंथांची मिरवणूक साईंच्या द्वारकामाईपर्यंत नेण्यात आली.

शिर्डी - गुरूपोर्णिमा उत्सवाला साईनगरीत भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. आज सकाळच्या काकड आरतीनंतर साई मंदिरापासून साईंची प्रतिमा, वीणा आणि साईसच्चरीत्र ग्रंथांची मिरवणूक साईंच्या द्वारकामाईपर्यंत नेण्यात आली. द्वारकामाईत अखंड पारायणाचे वाचन करुन गुरुपोर्णिमा उत्सवाला सुरुवात झाली आहे. उत्सवानिमित्त साई मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शिर्डीत गुरुपोर्णिमा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो.

शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात

काकड आरतीने उत्सवाला सुरुवात -

आज पहाटे काकड आरतीनंतर साईंच्या मूर्तीस आणि समाधीस मंगल स्नान घालण्यात आले आहे. त्यानंतर उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे 5 वाजता साईंच्या प्रतिमेची व श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी विणा, उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी पोथी, तर मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे व प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांनी साईंची प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी, संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी व मंदिर पुजारी उपस्थित होते. मिरवणूक द्वारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्री साईसच्चरित्र या पवित्र ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी प्रथम अध्याय, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी द्वितीय अध्याय, मुख्‍य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांनी तृतीय अध्याय, कार्यकारी अभियंता संजय जोरी यांनी चौथा अध्याय व संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी यांनी पाचवा अध्याय वाचन करुन केला.

उत्सवाच्या निमित्ताने सकाळी 6 वाजता संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे व त्‍यांची पत्‍नी संगिता बगाटे यांनी समाधी मंदिरात साईंची पाद्यपूजा केली. दुपारी 12.30 वाजता माध्यान्ह आरती झाली. सायंकाळी 4 ते 6 यावेळेत मंदिर कर्मचारी संभाजी तुरकणे यांचे कीर्तन झाले. सायंकाळी 7 वाजता साईंची धुपारती व रात्रौ 10.30 वाजता शेजारती करण्‍यात आली. तसेच श्री साईसच्चरित्र पारायणासाठी द्वारकामाई मंदिर आतील बाजुने रात्रभर खुले ठेवण्‍यात आले.

यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने अमेरिका येथील दानशूर साईभक्त शुभा पाई यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व सुनिल बाराहाते, साई समर्थ इलेक्‍ट्रीकल, शिर्डी यांनी मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली होती.

कोरोनाचे सावट कायम -

साईबाबांच्या शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भक्त येत असतात. तसेच पुणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणच्या शेकडो पालख्या शिर्डीत दाखल होत असतात. मात्र, गेल्या वर्षभरापासून देशावर आलेल्या कोरोना संकटामुळे साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षीही भाविकांना विना गुरुपौर्णिमा उत्सव साजरा होत आहे. जिल्ह्याअंतर्गत प्रवासास बंदी नसल्याने काही प्रमाणात भाविक शिर्डीत येत साईबाबांच्या कळसाचे दर्शन घेत आहेत.

Last Updated :Jul 22, 2021, 10:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.