ETV Bharat / state

राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर, कोपरगावात भाजप महिला आघाडीचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन

author img

By

Published : Oct 12, 2020, 3:30 PM IST

महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे महाराष्ट्रात सातत्याने महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. कोरोना उपचार केंद्रातही महिलांवर अत्याचार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. हे सरकार महिलांचे रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे म्हणत भाजप महिला आघाडीच्या वतीने कोपरगाव येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

अहमदनगर - महाविकास आघाडी सरकारच्या काळात अवघ्या महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चाललेला आहे. राज्यात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरू आहे. त्यातच कोरोनासारख्या अतिसंवेदनशील काळातही कोविड सेंटर व हाॅस्पिटलमध्ये महिलांवरील अत्याचार आणि विनयभंग सुरुच आहे. यासाठी राज्य सरकारने महिला सुरक्षिततेसंदर्भात कडक कायदे करावेत, या मागणीसाठी भाजप महिला आघाडीच्या वतीने आज(सोमवार) कोपरगाव येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

भाजापच्या प्रदेश सचिव स्नेहलता बिपीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार मनिषा कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश, भाजप, महिला मोर्चाने राज्यातील प्रत्येक घटनेचे गांभीर्य ओळखून सदर घटनांचा पाठपुरावा केलेला आहे. पीडित महिलांच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस ठाण्याला भेट देउन वेळोवेळी कारवाईची मागणीही केलेली आहे. परंतु सदर घटनासंदर्भात सरकारला गांभीर्य नसल्याचे दिसून आले. यावरुन या महाविकास आघाडी सरकारची महिला सुरक्षितेबाबतची असंवेदनशीलता आणि निष्क्रियता दिसून येते. या सरकारचा प्रशासनावर देखील अंकुश नसल्यामुळे प्रशासनदेखील महिलांच्या अत्याचारांच्या घटनांना गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे महाराष्ट्रात सातत्याने महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. कोरोना उपचार केंद्रातही महिलांवर अत्याचार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेली आहे. हे सरकार महिलांचे रक्षण करण्यात पुर्णपणे अपयशी ठरले असून या आघाडी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत असे आंदोलनकर्त्या म्हणाल्या. या सरकारने महिलांविषयी बेफिकीरीचा दृष्टीकोन सोडून महिला सुरक्षिततेबाबत त्वरीत कडक कायदे बनविण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या आंदोलनाप्रसंगी तालुकाध्यक्ष योगिता होन, शहराध्यक्ष शिल्पा रोहमारे, माजी उपसभापती वैशाली साळुंके, आदीसह भाजपचे जिल्ह्या व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - बोधेगावसह शेवगाव तालुक्यात जोरदार पाऊस; शेती पाण्याखाली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.