ETV Bharat / sports

Indian Super League : ईस्ट बंगालचा मुंबई सिटी एफसीवर पहिला विजय

author img

By

Published : Feb 20, 2023, 9:48 AM IST

East Bengal FC Beat Mumbai city FC
ईस्ट बंगाल विरुद्ध मुंबई सिटी

ईस्ट बंगालकडून महेश सिंहने 52 व्या मिनिटाला सामन्यातील एकमेव गोल करत मुंबईविरुद्ध आयएसएल मधील त्यांचा पहिला विजय मिळवला. या विजयानंतर ईस्ट बंगाल एफसीने जमशेदपूर एफसीला मागे टाकत गुणतालिकेत नववे स्थान पटकावले आहे

मुंबई : मुंबईच्या फुटबॉल एरिना येथे झालेल्या इंडियन सुपर लीग (ISL) च्या लीग टप्प्यातील अंतिम सामन्यात ईस्ट बंगाल एफसीने मुंबई सिटी एफसीचा 1-0 असा पराभव केला. सामन्यानंतर मुंबई संघाला आयएसएल लीग शिल्ड सादर करण्यात आली.

मुंबईच्या संघात चार बदल : ईस्ट बंगालकडून महेश सिंहने 52 व्या मिनिटाला सामन्यातील एकमेव गोल करत मुंबईविरुद्ध आयएसएल मधील त्यांचा पहिला विजय मिळवला. मुंबई सिटी एफसीचे मुख्य प्रशिक्षक डेस बकिंगहॅम यांनी संघात चार बदल करून काही नवीन चेहऱ्यांना स्टार्टिंग लाइनअपमध्ये संधी दिली होती. या खेळाडूंपैकी एक आयुष छिकारा होता जो डाव्या बाजूने बिपिन सिंहच्या क्रॉसवरून गोल मारण्यापासून केवळ काही इंचच दूर होता.

बंगालचा चांगला बचाव : खेळपट्टीच्या दुसऱ्या टोकाला क्लीटन सिल्वा आणि जेक जर्व्हिस हे मुंबई सिटी एफसीच्या बचाव फळीत सातत्याने घुसण्याचा प्रयत्न करत होते. मुंबईला गोल करण्याची सुवर्ण संधी तेव्हा मिळाली जेव्हा उजव्या बाजूने सुहेर व्हीपीचा क्रॉसवर जर्विसने मारलेला हेडर क्रॉसबारवरून गेला. पहिल्या हाफच्या शेवटच्या मिनिटाला, रॉलिन बोर्जेसचा गोल करण्याचा एक प्रयत्न व्यर्थ गेला. मुंबईचा पहिल्या हापमध्ये गोल करण्याचा हा सर्वोत्तम चान्स होता.

दुसऱ्या हाफमध्ये गोल मारला : दुसरा हाफ सुरु झाल्यानंतर सात मिनिटांनी पाहुण्यांनी आघाडी घेतली. उजवीकडून आलेला सिल्वाचा चेंडू महेशने त्याच्या डाव्या पायावर घेऊन गोल पोस्टमध्ये टाकला. पाच मिनिटांनंतर, गोलकीपर लालचुंगनुंगाच्या एका शानदार डायव्हिंग ब्लॉकने छांगटे गोल करण्यापासून रोखले. अवघ्या सहा मिनिटांनंतर, मुंबई सिटी एफसीकडे आणखी एक संधी आली जेव्हा हॅलेन नॉन्ग्टडूची अ‍ॅक्रोबॅटिक व्हॉली गोलच्या दिशेने गेली, परंतु कमलजीतने त्याला रोखले.

बंगाल नवव्या स्थानावर : शेवटच्या 15 मिनिटांत सुहेरला एकापाठोपाठ एक दोन संधी मिळाल्या, पण तो त्याचा लाभ घेऊ शकला नाही. ईस्ट बंगालला शेवटच्या काही मिनिटांत मुंबईच्या जोरदार आक्रमणांचा सामना करावा लागला, परंतु सामना संपेपर्यंत त्यांनी आपली आघाडी कायम ठेवली. या मोसमात मुंबई सिटी एफसीला गोल करण्यात अपयश येण्याची ही पहिलीच वेळ आहे. या विजयानंतर ईस्ट बंगाल एफसीने जमशेदपूर एफसीला मागे टाकत गुणतालिकेत नववे स्थान पटकावले आहे. या विजयामुळे ईस्ट बंगालला 25 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या कोलकाता डर्बीपूर्वी मुमेंटम मिळाले आहे. मुंबईचे स्पर्धेतील सर्व सामने खेळून झाले असून आता ते 7 मार्चला उपांत्य फेरीच्या सामन्यात अ‍ॅक्शन मध्ये दिसतील.

हेही वाचा : Women T20 World Cup : भारतासमोर आयर्लंडचे आव्हान, सेमीफायनलसाठी पाकिस्तानवर अवलंबून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.