ETV Bharat / sports

यंदाच्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होणार?

author img

By

Published : Feb 26, 2020, 2:35 PM IST

या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहेत. चीनमधील बॉक्सिंग आणि बॅडमिंटनमधील ऑलिम्पिक पात्रता सामने कोरोना विषाणू संसर्गामुळे यापूर्वीच रद्द करण्यात आले आहेत.

Corona virus not controlled till May, Tokyo Olympics 2020 can be canceled
यंदाच्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होणार?

नवी दिल्ली - आगामी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अधिक तीव्र झाले आहे. त्यामुळे 'मे महिन्याच्या अखेरीस कोरोना संक्रमण नियंत्रित न केल्यास ऑलिम्पिक खेळ रद्द होऊ शकतात', असे ऑलिम्पिक समितीच्या एका ज्येष्ठ सदस्याने म्हटले आहे. 'अशा परिस्थितीत ऑलिम्पिक खेळाचे वेळापत्रक बदलले जाणार नाही किंवा पुढेही ढकलण्यात येणार नाही, परंतु खेळ रद्द केले जातील', असेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे.

हेही वाचा - हिटमॅन रोहित शर्माची चहलला मारहाण!..व्हिडिओ व्हायरल

या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहेत. चीनमधील बॉक्सिंग आणि बॅडमिंटनमधील ऑलिम्पिक पात्रता सामने कोरोना व्हायरसमुळे यापूर्वीच रद्द करण्यात आले आहेत.

'चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यामुळे टोकियो ऑलिम्पिक रद्द करण्याच्या जोखमीविषयी अनुमान काढणे फार घाईचे होईल, परंतु चीनने या संकटावर अद्याप मात केलेली नाही', असे जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वी सांगितले होते. जपानमध्येही या विषाणूमुळे २८ लोक संसर्गित झाले असून त्यातील एकाचा मृत्यूही झाला आहे.

चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे आत्तापर्यंत २ हजार ३४६ जणांचा बळी गेला आहे. एकट्या हुबेई प्रांतात कोरोना विषाणूची लागण ६४ हजार जणांना झाली आहे. मात्र, आता कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे.

चीनबरोबरच इतर २६ देशांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाली आहे. एकट्या दक्षिण कोरियामध्ये ५५६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. १५ हजार २९९ नागरिक पूर्णत: बरे झाले आहेत. मागील २४ तासात नव्याने ६३० रुग्ण आढळून आले आहेत. तर ९६ जणांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.