ETV Bharat / sports

Virat Kohli On Babar Azam : बाबर आझमबाबत विराट कोहलीचे मोठे वक्तव्य, म्हणाला..

author img

By

Published : Aug 13, 2023, 7:46 PM IST

विराट कोहलीने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हटले आहे. तसेच, 'मला बाबरला खेळताना पाहणे नेहमीच आवडते', असेही कोहली म्हणाला.

Virat Kohli On Babar Azam
बाबर आझमवर विराट कोहली

नवी दिल्ली : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्यात नेहमीच तुलना केली जाते. अनेक क्रिकेट पंडित बाबर आझमला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज मानतात. तर कोहलीचे रेकॉर्ड मोडण्याची क्षमता केवळ बाबर आझममध्येच आहे, असेही अनेक जणांचे मत आहे. आता याला खुद्द विराट कोहलीनेच पावती दिली आहे.

बाबरला खेळताना पाहणे नेहमीच आवडते : स्टार स्पोर्ट्ससोबतच्या एका संभाषणात विराट कोहलीने बाबर आझमला सर्व फॉरमॅटमधील जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हटले आहे. या सोबतच कोहलीने बाबरच्या फलंदाजीचेही तोंडभरून कौतुक केले. 'बाबर आझम सर्व फॉरमॅटमध्ये जगातील अव्वल फलंदाज आहे यात शंका नाही. तो सातत्यपूर्ण कामगिरी करतो आहे. मला त्याला खेळताना पाहणे नेहमीच आवडते', असे विराट कोहली म्हणाला.

बाबरसोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला : या सोबतच विराटने बाबरसोबत झालेल्या पहिल्या भेटीचाही किस्सा सांगितला. एका मुलाखतीचा संदर्भ देताना कोहली म्हणाला की, 'बाबरसोबत माझे पहिले संभाषण 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान मँचेस्टरमधील मॅचनंतर झाले. मी इमाद वसीमला अंडर-19 विश्वचषकापासून ओळखतो. तो म्हणाला की बाबरला माझ्याशी बोलायचे आहे. त्यानंतर आम्ही बसून क्रिकेटबद्दल बोललो. पहिल्या दिवसापासून मला त्याच्यामध्ये माझ्याबद्दल खूप आदर दिसला. आजपर्यंत यात कोणताही बदल झालेला नाही', असे विराटने सांगितले.

बाबर एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी आहे : बाबर सध्या पुरुषांच्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत 886 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. तर कोहली 705 रेटिंग गुणांसह नवव्या स्थानावर आहे. बाबर आझम टी-20 आणि कसोटी क्रमवारीतही पहिल्या पाचमध्ये आहे. विशेष म्हणजे, सर्व फॉरमॅटमध्ये पहिल्या पाच फलंदाजांमध्ये स्थान मिळवणारा तो एकमेव खेळाडू आहे.

भारत आणि पाकिस्तान आमनेसामने : भारत आणि पाकिस्तान 2 सप्टेंबर रोजी कॅंडी येथे आशिया चषक स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमध्ये आमनेसामने येणार आहेत. पहिल्या फेरीतील त्यांच्या कामगिरीच्या आधारे, ते पुढे गेल्यास, ते सुपर 4 टप्प्यातही आमनेसामने येऊ शकतात. याशिवाय 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकात या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होणार आहे.

हेही वाचा :

  1. Asian Champions Trophy : भारताने मलेशियाला ४-३ ने चारली धूळ; विक्रमी चौथ्यांदा विजेतेपदावर कब्जा
  2. Virat Kohli : 'मी एवढाही श्रीमंत नाही', जाणून घ्या कमाईच्या वृत्तांबद्दल काय म्हणाला विराट कोहली
  3. India Vs Pakistan : मोठी बातमी! विश्वचषकात रंगणार भारत-पाकिस्तान सामन्याचा थरार, सरकारकडून ग्रीन सिग्नल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.