ETV Bharat / sports

शेफाली वर्माचे टी-20 आयसीसी फलंदाजी क्रमवारीत अव्वलस्थान कायम

author img

By

Published : Sep 7, 2021, 4:55 PM IST

आयसीसीने महिला टी-20 ची क्रमवारी जारी केली आहे. यात भारताची स्टार युवा खेळाडू शेफाली वर्माने फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान कायम राखलं आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत न्यूझीलंडची सोफी डिवाईन इंग्लंडच्या नताली स्केवरसोबत अव्वलस्थानी पोहोचली आहे.

Shafali verma retains no 1 spot in T20I batting rankings, Sophie Devine jumps to joint top among all-rounders
शेफाली वर्माचे टी-20 आयसीसी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान कायम

दुबई - भारताची युवा स्टार महिला क्रिकेटर शेफाली वर्माने आयसीसी टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थान कायम राखलं आहे. दुसरीकडे अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत न्यूझीलंडची सोफी डिवाईन इंग्लंडच्या नताली स्किवर सोबत संयुक्तपणे अव्वलस्थानी पोहोचली आहे.

आयसीसीने महिला टी-20 ची क्रमवारी जारी केली आहे. यात शेफाली वर्मा 759 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी 744 गुणांसह दुसऱ्या तर भारतीय संघाची स्टार सलामीवीर स्मृती मंधाना 716 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाची मेग लेनिंग 709 गुणांची कमाई करत चौथ्या स्थानी आहे. सोफी डिवाईनची क्रमवारी एका स्थानाने सुधारली आहे. ती 689 गुणांसह पाचव्या स्थानावर सरकली आहे.

सोफीने इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात चांगली कामगिरी केली होती. याचा तिला फायदा झाला आहे. इंग्लंडविरुद्ध तिने फलंदाजीत 50 धावा आणि गोलंदाजीत 2 गडी बाद करत अष्टपैलू कामगिरी नोंदवली होती. याच प्रदर्शनाच्या जोरावर तिने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत इंग्लंडच्या नताली स्किवरसोबत संयुक्तपणे अव्वलस्थानी पटकावलं आहे.

दीप्ती शर्माची क्रमवारी सुधारली

अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत भारताची दीप्ती शर्मा, ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी आणि वेस्ट इंडीजची हेली मॅथ्यूज यांना प्रत्येकी एका स्थानाचा फायदा झाला आहे. त्या अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत. वेस्ट इंडिजची स्टेफनी टेलरची तीन स्थानाने घसरण झाली असून ती सातव्या स्थानावर फेकली गेली आहे.

गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाची मेगन शूट दोन स्थानाच्या प्रगतीसह दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. ऑस्ट्रेलियाची जेस योनासेन एका स्थानाच्या फायद्यासह चौथ्या स्थानावर आहे. भारताची दीप्ती शर्मा सहाव्या तर पूनम यादव आठव्या स्थानावर कायम आहे.

हेही वाचा - India vs England : विराट कोहलीने केलं गोलंदाजांचे तोंडभरून कौतुक, म्हणाला...

हेही वाचा - Ind vs Eng : भारताचा चौथ्या कसोटी सामन्यात 157 धावांनी विजय, मालिकेत 2-1 ने आघाडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.