IPL 2021: कोलकात्याचा सात गडी राखत मुंबई इंडियन्सवर विजय

author img

By

Published : Sep 23, 2021, 11:26 PM IST

Updated : Sep 24, 2021, 12:08 AM IST

v

कोलकाता नाइट रायडर्सने सात गडी राखत मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला आहे. मुंबईने कोलकात्यासमोर विजयासाठी 156 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, हे आव्हान केकेआरने केवळ तीन गडी गमावत 16 व्या षटकात पूर्ण केले.

अबुधाबी - कोलकाता नाइट रायडर्सने सात गडी राखत मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला आहे. मुंबईने कोलकात्यासमोर विजयासाठी 156 धावांचे आव्हान दिले होते. मात्र, हे आव्हान केकेआरने केवळ तीन गडी गमावत 16 व्या षटकात पूर्ण केले. राहुल त्रिपाठी (74 धावा) आणि व्यंकटेश अय्यर (53 धावा) यांच्या तुफानी खेळीमुळे हा विजय सोपा झाला. कोलकाताचे तिन्ही गडी जसप्रीत बुमराहने बाद केले. व्यंकटेश अय्यर याने आपल्या आयपीएलमधल्या कारकीर्दीतील पहिले अर्धशतक ठोकलं आहे.

केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तेव्हा रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी आश्वासक सुरूवात केली. जम बसल्यानंतर दोघांनी फटकेबाजी केली. पॉवर प्लेमध्ये या जोडीने बिनबाद 56 धावा धावफलकावर लावल्या. सुनिल नरेनने ही धोकादायक होत असलेली जोडी फोडली. त्याने 10व्या षटकात रोहित शर्माला शुबमन गिलकडे झेल देण्यास भाग पाडले. रोहित शर्माने 30 चेंडूत 4 चौकारासह 33 धावांचे योगदान दिले.

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याच्याकडून मोठ्या खेळीची आशा होती. परंतु त्याला प्रसिद्ध कृष्णाने बाद करत मुंबईला दुसरा धक्का दिला. कृष्णाने 13व्या षटकात सूर्यकुमार यादवला (5) दिनेश कार्तिककडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर प्रसिद्ध कृष्णाने सेट फलंदाज क्विटन डी कॉकला बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला. डी कॉकने 42 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारासह 55 धावांची खेळी साकारली. यानंतर आलेल्या इशान किशनने 13 चेंडूत 1 षटकारासह 14 धावा केल्या. त्याची विकेट लॉकी फर्ग्यूसन याने घेतली.

इशान किशन बाद झाल्यानंतर केरॉन पोलार्ड मैदानात आला. त्याने मोठे फटके मारण्यास सुरूवात केली. पण अखेरच्या षटकात तो धावबाद झाला. त्याने 15 चेंडूत 21 धावांचे योगदान दिले. यानंतर कृणाल पांड्या (12) फर्ग्यूसनचा शिकार ठरला. तेव्हा सौरभ तिवारीने अखेरच्या चेंडूवर चौकार मारत मुंबईला 155 धावांपर्यंत मजल मारून दिली. केकेआरकडून प्रसिद्ध कृष्णा आणि लॉकी फर्ग्यूसन यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. तर नरेन याने एक गडी टिपला. वरुण चक्रवर्तीने टिच्चून मारा केला. पण त्याला गडी बाद करण्यात यश आले नाही.

प्रत्युत्तरात 156 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या केकेआरच्या सलामी जोडीतील शुबमन गील केवळ 13 धावा काढत स्वस्तात तंबूत परतला. त्यानंतर अय्यर व त्रिपाठी यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. अय्यर 30 चेंडूत 3 षटकार व 4 चौकाराच्या मदतीने 53 धावांवर बुमराहच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या मॉर्गनने 8 चेंडूत सामना करत एका षटकाराच्या जोरावर केवळ सात धावा काढत बाद झाला. राहूल त्रिपाठी हा झंझावत फलंदाजी करत 42 चेंडूत 3 षटकार व 8 चौकारांच्या मदतीने 74 धावांवर नाबाद राहिला तर नितिश राणा पाच धावांवर नाबाद राहिला. अशा प्रकारे केकेआरच्या संघाने केवळ तीन गडी गमावून अवघ्या सोळाव्या षटकांत 159 धावा काढत सामना जिंकला.

हेही वाचा - आयसीसीने T20 विश्वकरंड स्पर्धेसाठी लाँच केलं थीम साँग

Last Updated :Sep 24, 2021, 12:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.