ETV Bharat / sports

IPL 2022 PBKS vs RCB: रोमांचक झालेल्या सामन्यात पंजाबचा बंगळुरुवर पाच विकेट्सने शानदार विजय

author img

By

Published : Mar 28, 2022, 3:07 PM IST

आयपीएलच्याल पंधराव्या हंगामातील तिसऱ्या सामन्यात पंजाब संघाने बंगळुरुवर पाच विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. या सामन्यात ओडियन स्मिथने ( Batsman Odean Smith ) पंजाबकडून वादळी खेळी करताना 8 चेंडूत 25 धावा कुटल्या. त्यामुळे पंजाबला 206 धावांचा यशस्वी पाठलाग करता आला.

PBKS
PBKS

मुूंबई: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील तिसरा सामना पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ( Punjab Kings vs Royal Challengers Bangalore ) संघात पार पडला. या सामन्यात पंजाब संघाने बंगळुरुवर पाच विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 205 धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना पंजाब संघाने हे लक्ष्य 19 षटकांत 5 गडी गमावून 208 धावा करत पूर्ण केली.

पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अग्रवालने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फाफ डु प्लेसिस ( Faf du Plessis ) आणि अनुज रावत यांनी आरसीबीला 50 धावांची चांगली सुरुवात करून दिली आणि पॉवरप्लेमध्ये दोघांनी 41 धावा जोडल्या. मात्र, सातव्या षटकात राहुल चहरने अनुज रावत (21) याला बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. यानंतर फाफ डू प्लेसिसने विराट कोहलीसोबत वेगवान भागीदारी करत 13व्या षटकात संघाला 100 च्या पुढे नेले.

फाफ डू प्लेसिसने संथ सुरुवातीनंतर वेग पकडला आणि 41 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 16व्या षटकात त्याने कोहलीसह संघाला 150 च्या पुढे नेले आणि दुसऱ्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारीही पूर्ण केली. फाफ डू प्लेसिसने 57 चेंडूत 88 धावांची धडाकेबाज खेळी केली आणि 18 व्या षटकात अर्शदीप सिंगने त्याला 168 धावांवर बाद केले. येथून दिनेश कार्तिकने 14 चेंडूत 32 धावांची धडाकेबाज खेळी करत संघाला 200 च्या पुढे नेले. विराट कोहली 29 चेंडूत 41 धावा करत नाबाद राहिला. पंजाब किंग्जकडून अर्शदीप सिंग आणि राहुल चहरने प्रत्येकी एक विकेट घेतली.

लक्ष्याला प्रत्युत्तर देताना पंजाब किंग्जची चांगली सुरुवात झाली आणि मयंक अग्रवाल (24 चेंडू 32) याने शिखर धवनसह पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. दोघांनी पॉवरप्लेच्या 6 षटकात 63 धावा जोडल्या होत्या. आठव्या षटकात मयंकला वानिंदू हसरंगाने ( Bowler Wanindu Hasaranga ) बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. येथून शिखर धवनने भानुका राजपक्षेसोबत वेगवान भागीदारी करत संघाला 11व्या षटकात 100 धावा पर्यंत नेले. मात्र, 12व्या षटकात 118 धावांवर हर्षल पटेलनेही शिखर धवनला (29 चेंडूत 43) झेल देत संघाला दुसरे यश मिळवून दिले. राजपक्षेने 22 चेंडूत 43 धावा केल्या, मात्र 14व्या षटकात तोही 139 धावांवर बाद झाला. यानंतर पुढच्याच चेंडूवर सिराजने राज अंगद बावालाही खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

15व्या षटकात पंजाब किंग्जने 150 चा टप्पा ओलांडला, पण त्याच षटकात लियाम लिव्हिंगस्टोन ( Bowler Liam Livingstone ) 156 धावसंख्येवर 19 धावा करुन बाद झाला. मात्र, इथून ओडियन स्मिथने (8 चेंडूत 25*) शाहरुख खानसह (20 चेंडूत 24*) 52 धावांची धडाकेबाज भागीदारी केली आणि 6 चेंडू राखून संघाला विजय मिळवून दिला. आरसीबीसाठी, मोहम्मद सिराजने दोन विकेट घेतल्या, परंतु त्याच्या चार षटकांमध्ये तो खूप महाग पडला आणि त्याने शेवटच्या षटकात 25 धावा दिल्याने सामन्याची दिशा बदलली.

हेही वाचा - IPL 2022 Updates : 'तस्कीन अहमदला आयपीएलमध्ये सहभागी न झाल्याबद्दल बक्षीस द्यावे'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.