ETV Bharat / sports

Gautam Gambhir on KL Rahul : गौतम गंभीरचा खराब कामगिरी करणाऱ्या राहुलला पाठिंबा, म्हणाला..

author img

By

Published : Feb 24, 2023, 6:40 AM IST

Updated : Feb 24, 2023, 7:08 AM IST

भारताचा सलामीवीर के एल राहुलच्या खराब फॉर्मवर सध्या बरीच टीका होते आहे. मात्र आता भारताचा माजी खेळाडू गौतम गंभीरने के एल राहुलचे समर्थन केले आहे. प्रत्येकजण वाईट काळातून जातो, केवळ एकाच खेळाडूला लक्ष्य करू नये, असे गंभीरचे मत आहे.

Gautam Gambhir on KL Rahul
गौतम गंभीर के एल राहुल

नवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरच्या मते, प्रत्येक खेळाडू त्याच्या कारकिर्दीत वाईट टप्प्यातून जात असल्याने केवळ के एल राहुलवर टीका करणे थोडेसे अयोग्य ठरेल. गेल्या 10 कसोटी डावांमध्ये राहुलची सरासरी केवळ 12.5 आहे. या दरम्यान तो एकदाही 25 धावांचा आकडा गाठू शकला नाही. गेल्या 10 डावांमध्ये त्याने 08, 10, 12, 22, 23, 10, 02, 20, 17 आणि 01 धावा केल्या आहेत, ज्यामुळे त्याच्या प्लेइंग इलेव्हनमधील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

एकाच खेळाडूला लक्ष्य करू नये : लखनौ सुपर जायंट्सने आयोजित केलेल्या आयपीएल प्री-सीझन शिबिरात गंभीर म्हटला की, लोकेश राहुलला भारतीय संघातून वगळू नये. तसेच चाहत्यांनी केवळ एकाच खेळाडूला लक्ष्य करू नये. प्रत्येकजण वाईट काळातून जातो. गंभीर हा लखनौ संघाचा मार्गदर्शक असून राहुल या संघाचा कर्णधार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याची मागणी होत आहे.

रोहित शर्माही सुरुवातीला अपयशी : गंभीरने भारताचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माचे उदाहरण दिले की, त्याला कसोटी क्रिकेटमध्ये यश मिळावे यासाठी मागील संघ व्यवस्थापनाने त्याला कसे समर्थन दिले. रोहितने डावाची सुरुवात केली तेव्हा त्याला या पारंपरिक फॉर्मेटमध्ये यश मिळू लागले. तो म्हणाला की, ज्या खेळाडूंमध्ये प्रतिभा आहे त्यांना तुम्ही पाठिंबा द्यावा. रोहित शर्माकडे बघा. तोही वाईट टप्प्यातून गेला. त्याने आपल्या करिअरची सुरुवात कशी केली ते पहा. त्याला उशिरा यश मिळाले. त्याच्या पूर्वीच्या कामगिरीची त्याच्या सध्याच्या कामगिरीशी तुलना करा. प्रत्येकाने त्याची प्रतिभा पाहून त्याला पाठिंबा दिला. आता परिणाम पहा. तो चमकदार कामगिरी करत आहे. राहुल हेच करू शकतो.

विजयी कॉम्बिनेशनमध्ये छेडछाड करू नये : गंभीरला असे वाटते की, जर संघ सहज सामने जिंकत असेल तर विजयी कॉम्बिनेशनमध्ये छेडछाड करण्यात आणि कोणत्याही एका खेळाडूला लक्ष्य करण्यात काही अर्थ नाही. तो म्हणाला, भारत 0-2 ने मागे नसून 2-0 ने पुढे आहे. त्यामुळे कोणालाही बाहेर काढू नका आणि संघाच्या कामगिरीचे कौतुक करा. मला वाटते की लोकेश राहुलला पाठीशी घालून भारतीय संघ व्यवस्थापन योग्य काम करत आहे. तो एक उत्तम खेळाडू आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भरपूर धावा केल्या आहेत.

हेही वाचा : Sunrisers Hyderabad New Captain : सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदी एडन मार्करामची निवड; जाणून घ्या तडफदार फलंदाजाविषयी

Last Updated :Feb 24, 2023, 7:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.