ETV Bharat / sports

Cricket World Cup 2023 : वर्ल्ड कप २०२३ पूर्वी पाकिस्तानचे फक्त २ खेळाडू भारतात आले होते, जाणून घ्या त्यांची नावं

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 6, 2023, 4:26 PM IST

Cricket World Cup 2023 : भारत आणि पाकिस्तानमध्ये राजकीय संबंध तणावाचे असल्यानं दोन देशांमध्ये द्विपक्षीय मालिका होत नाहीत. हे दोन्ही संघ फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्येच आमनेसामने येतात. २०१६ मध्ये शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघ टी २० वर्ल्ड कपसाठी भारतात आला होता.

Cricket World Cup 2023
Cricket World Cup 2023

मुंबई Cricket World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला गुरुवारपासून सुरुवात झाली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यानं विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १४ ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान तब्बल ७ वर्षांनंतर भारतात सामना खेळेल. त्यामुळे दोन्ही देशांचे कोट्यवधी चाहते या सामन्याची आतुरतेनं वाट पाहात आहेत.

दोन देशांमध्ये द्विपक्षीय मालिका होत नाहीत : भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध तणावाचे आहेत. त्यामुळे या दोन देशांमध्ये द्विपक्षीय मालिका खेळल्या जात नाहीत. भारत पाकिस्तानला भेट देत नाही, तर पाकिस्तानही भारतात सामने खेळण्यासाठी येत नाही. हे दोन संघ केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्येच आमनेसामने येतात. २०१६ मध्ये शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ शेवटचा टी २० विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आला होता.

पाकिस्तान ७ वर्षांनंतर भारतात खेळेल : आता पाकिस्तानचा संघ ७ वर्षांनंतर भारतात खेळताना दिसणार आहे. पाकिस्तान ६ ऑक्टोबरला हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममधून नेदरलँड्सविरुद्ध विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल. या सामन्यापूर्वी पाकिस्तान संघानं आपले दोन्ही सराव सामने गमावले आहेत. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा न्यूझीलंडनं ५ विकेटनं तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं १४ धावांनी पराभव केला. आता गुरुवारी नेदरलँड्ससारख्या कमकुवत संघाला हरवून विश्वचषकाची धमाकेदार सुरुवात करण्याची संधी पाकिस्तानकडे असेल.

हे दोन खेळाडू भारतात खेळलेत : पाकिस्तानच्या आताच्या १५ सदस्यीय विश्वचषक संघात असे दोनच खेळाडू आहेत, जे याआधी भारत दौऱ्यावर आले होते. यामध्ये मोहम्मद नवाज आणि सलमान अली आगा यांचा समावेश आहे. मोहम्मद नवाज २०१६ मध्ये टी २० विश्वचषकासाठी भारतात आला होता. शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाचा तो एक भाग होता. मात्र त्याला या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही. तर सलमान अली आगा २०१४ मध्ये चॅम्पियन्स लीग टी २० स्पर्धा खेळण्यासाठी भारतात आला होता. भारतात आलेल्या 'लाहोर लायन्स' संघाचा तो सदस्य होता. तो बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर डॉल्फिन्सविरुद्ध सामना खेळला होता.

विश्वचषक २०२३ साठी पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), इमाम-उल-हक, फखर जमान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, शादाब खान, हसन अली, हारिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन शाह आफ्रिदी, सौद शकील, सलमान अली आगा, उस्मान मीर, अब्दुल्ला शफीक.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup 2023 : तब्बल 27 वर्षानंतर पुण्यात 'क्रिकेट विश्वचषक'चे सामने; कशी आहे तयारी? जाणून घ्या रोहित पवारांकडून
  2. Cricket World Cup 2023 : हे आहे भारतातील सर्वात आधुनिक क्रिकेट स्टेडियम, कितीही पाऊस आला तरी मॅच होणार नाही रद्द!
  3. Cricket World Cup 2023 : 'भारत उपांत्य फेरीत नक्कीच प्रवेश करणार', किरण मोरेंची भविष्यवाणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.