कराची - पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) अष्टपैलू क्रिकेटपटू शोएब मलिकला इंग्लंड दौऱ्यापूर्वी कुटुंबासमवेत वेळ घालवण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानंतर, तो 24 जुलैला पाकिस्तान संघात दाखल होईल. शोएब आपली पत्नी भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि एक वर्षाचा मुलगा इझहान यांना पाच महिन्यांपासून भेटू शकला नव्हता. सानिया आणि इझहान हे दोघेही सियालकोट येथे त्यांच्या घरात राहत आहेत.
पाकिस्तानी क्रिकेट संघ तीन कसोटी आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी 28 जूनला इंग्लंडला रवाना होईल. ''कोरोनाव्हायरसमुळे घातलेल्या अटींप्रमाणे पाक संघ 14 दिवस डर्बशायरमध्ये क्वारंटाईन असेल. परंतु या दरम्यान संघाला सराव करण्याची परवानगी दिली जाईल'', असे पीसीबीने सांगितले.
खेळाडूंची होणार कोरोना चाचणी -
या दौर्यासाठी निवड समितीने 29 खेळाडूंचा संघ निवडला आहे. जेणेकरुन एखादा खेळाडू आजारी पडल्यास ताबडतोब त्याच्या जागी दुसरा खेळाडू हजर असेल. 17 मार्चपासून पाकिस्तानी क्रिकेटपटू कोणतेही स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाहीत. 28 जूनला इंग्लंडला भेट देणार्या पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि सहाय्यक कर्मचार्यांची तीन दिवसात दोनदा कोरोनाव्हायरसची चाचणी घेण्यात येईल. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली चाचणी सोमवारी 22 जून, दुसरी चाचणी बुधवारी 24 जूनला होईल.