ETV Bharat / sitara

काळी माती : बैल पोळयावर आधारित गाणं मराठी सिनेमात पहिल्यांदाच!

author img

By

Published : Sep 8, 2021, 3:58 PM IST

'सण आला बैल पोळ्याचा...' गाणे
'सण आला बैल पोळ्याचा...' गाणे

अलिकडेच बैल पोळा सण महाराष्ट्रभर साजरा झाला. आपल्या कृषी संस्कृतीत बैल पोळा सणाला खूप महत्त्व आहे. परंतु या सणावर आधारित गाणे आजवर मराठी सिनेमात पाहायला मिळाले नव्हते. काळी माती या आगामी चित्रपटात यावर एक सुरेल गाणे चित्रीत करण्यात आले आहे.

दिग्दर्शक हेमंतकुमार महाले यांनी ‘काळी माती’ या चित्रपटात ज्ञानेश्वर बोडके या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या प्रगतशील शेतकऱ्याची यशोगाथा सादर केली आहे. शेतकरी आणि बैलांचं नातं अतूट असतं. सुमधूर गीत-संगीतानं सजलेल्या सिनेमांतील कथा पहायला प्रेक्षकांना खूप आवडतात. हाच धागा पकडून हेमंतकुमार यांनी या चित्रपटात बैल पोळ्याचं गाणं सादर करण्यात आलं आहे. ३९९ पुरस्कार पटकावत विश्वविक्रम करणाऱ्या 'काळी माती' या आगामी मराठी चित्रपटात एका शेतकऱ्याची कथा पहायला मिळणार आहे.

गीतकार कल्याण उगळे यांनी 'सण आला बैल पोळ्याचा...' असे गाण्याचे बोल असलेले ‘बैल पोळा’ गीत लिहिलं असून, अविनाश-विश्वजीत या संगीतकार जोडीनं त्यावर स्वरसाज चढवला आहे. डॅा. गौरी कवी आणि प्रियांका मित्रा यांनी हे गाणं गायलं आहे. पुण्याजवळ असलेल्या खेडमध्ये हे गाणं शूट करण्यात आलं आहे. चित्रांकनात शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, लावणी आणि लेझीम यांची सांगड घालण्यात आली आहे. यासाठी मोठी रांगोळी काढण्यात आली होती आणि संपूर्ण परिसर पताकांनी सजवण्यात आला होता. कोरिओग्राफर लॉलीपॉप यांनी या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाची पटकथा मयूर आडकरनं लिहीली असून, संवाद अनिल राऊत आणि हेमंतकुमार महाले यांचे आहेत. डीओपी सुरेश सुवर्णा आणि राजा फडतरे यांनी आपल्या जाणकार नजरेतून या चित्रपटाचं छायालेखन केलं आहे. संकलन सुभीराज यांनी केलं आहे.

'सण आला बैल पोळ्याचा...' गाणे
'सण आला बैल पोळ्याचा...' गाणे

'काळी माती' या चित्रपटातील बैल पोळ्याच्या गाण्याच्या प्रसंगासोबतच एकूणच या गाण्याबाबत हेमंतकुमार म्हणाले की, या चित्रपटात बैल पोळ्याच्या सणाच्या निमित्तानं सर्व गावकरी एकत्र येतात आणि बैलांची पूजा केली जाते. बैलांना खाऊ-पिऊ घातलं जातं. त्यानंतर छान पारंपरीक नृत्य केलं जातं. लावणी नृत्यासारखाच हा प्रकार समूहनृत्याद्वारे सादर केला जातो. या गाण्यात बरेच गावकरी व बैलही आहेत. अशा पद्धतीचं बैल पोळा या सणावरील गाणं आजवर कोणत्याही चित्रपटात आलेलं नाही.

'सण आला बैल पोळ्याचा...' गाणे
'सण आला बैल पोळ्याचा...' गाणे

'काळी माती' या चित्रपटाचा विषय शेतकरी असून, बैल हा शेतकऱ्याचा खरा साथीदार आहे. शेतकरी आणि बैल हे दोन अविभाज्य घटक आहेत. बैल पोळा या एकाच सणाला बळीराजा बैलाची पूजा करतो. जो बैल पूर्ण वर्षभर सतत काम करतो, त्याला एक दिवस विश्रांती दिली जाते, त्याला सजवलं जातं, त्याचा सन्मान केला जातो, पूजा केली जाते. हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या चित्रपटाचा गाभा शेतकरी असल्यानं बैल पोळ्याचा प्रसंग डोळ्यांसमोर ठेवून हे गाणं तयार करण्यात आलं. या गाण्याचं चित्रीकरणही खूप छान पद्धतीनं करण्यात आलं आहे.

'सण आला बैल पोळ्याचा...' गाणे
'सण आला बैल पोळ्याचा...' गाणे

भारत, सिंगापूर, मलेशिया, फ्रान्स, युरोप, लंडन, अमेरिका आदी जगभरातील फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या 'काळी माती'च्या दिग्दर्शनासोबत निर्मितीची धुराही हेमंतकुमार यांनीच सांभाळली आहे. या चित्रपटामध्ये ओमप्रकाश शिंदे, एतशा संझगिरी, दीक्षा भोर, भगवान पाचोरे, पूनम पाटील, पी. के. वाघमारे आदींच्या भूमिका आहेत. यात ओमप्रकाशनं ज्ञानेश्वर बोडकेंची भूमिका साकारली आहे.

'काळी माती' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा - अक्षय कुमारला मातृशोक, वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.