ETV Bharat / international

Israel Hamas War : युद्धाचा आठवा दिवस; गाझाच्या सर्वात मोठ्या हॉस्पिटलच्या आवारात जमले हजारो लोकं

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2023, 10:21 AM IST

Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धाच्या आठव्या दिवशी इस्रायली सैन्यानं गाझा शहरात राहणाऱ्या लाखो नागरिकांना संभाव्य हल्ल्याआधी गाझा रिकामा करण्याचे आदेश दिलेत. इस्रायली सैन्याचे अधिकारी गाझा सीमेजवळ अज्ञात ठिकाणी जमा झाले असून गाझा सीमेजवळ इस्त्रायली सैन्याचे मोठ्या प्रमाणात रणगाडेही दिसत आहेत.

Israel Hamas War
Israel Hamas War

इस्रायल-हमास युद्धाचा आठवा दिवस

जेरुसलेम Israel Hamas War : इस्रायल-हमास युद्धाच्या आठव्या दिवशी इस्रायली सैन्यानं गाझा शहरात राहणाऱ्या लाखो नागरिकांना संभाव्य हल्ल्याआधी गाझा रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. संयुक्त राष्ट्रानं इस्रायलला उत्तर गाझामध्ये राहणार्‍या 1.1 दशलक्ष लोकांना बाहेर काढण्याचा इशारा दिल्यानंतर हे निर्देश देण्यात आले आहेत. इस्रायल कालांतरानं गाझा लोकांना दक्षिणी सीमा ओलांडून इजिप्तमध्ये पळून जाण्यास भाग पाडेल अशी भीती पॅलेस्टाईन आणि काही इजिप्शियन अधिकार्‍यांना वाटते.

आश्रयासाठी नागरिक रुग्णालयात : रुग्णालयाच्या संकुलात 35,000 लोक आश्रय घेत असल्याचं गाझाच्या सर्वात मोठ्या रुग्णालयाच्या प्रमुखांनी सांगितलंय. तसंच अंदाजे 35,000 लोक गाझा शहराच्या मुख्य रुग्णालयाच्या मैदानावर जमल्याचं गाझा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगतलंय. संभाव्य इस्रायली ग्राउंड हल्ल्यापूर्वी नागरिक आश्रय शोधत आहेत. शिफा हॉस्पिटलचे महासंचालक मोहम्मद अबू सेलीम यांनी सांगितलंय की इमारतीमध्ये आणि बाहेरील अंगणात मोठा जमाव जमला होता. शिफा हे संपूर्ण गाझा पट्टीतील सर्वात मोठे रुग्णालय आहे. आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी डॉ. मेधात अब्बास म्हणाले की, लोकांना वाटतं की त्यांची घरं उद्ध्वस्त झाल्यानंतर आणि त्यांना पळून जाण्यासाठी रुग्णालय हे एकमेव सुरक्षित ठिकाण आहे. ते म्हणाले की, गाझा शहरात विनाशाचं भयानक दृश्य आहे. इस्त्रायली सैन्यानं भूदल पाठविण्याच्या तयारीत असताना गाझा शहरासह गाझामधील जवळपास अर्ध्या लोकसंख्येला स्थलांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायलनं गेल्या आठवड्यापासून गाझावर बॉम्बफेक केलीय. यात 2200 हून अधिक लोक मारले गेले आहेत. सीमेवर हमासच्या हल्ल्यांना इस्रायलकडून चोख प्रत्यूत्तर मिळतय.

आतापर्यंत काय झालं पाच मुद्द्यात वाचा :

  • इस्रायलनं गाझा पट्टीमध्ये संसाधनांचा प्रवाह थांबवल्यानंतर उत्तर गाझामध्ये राहणाऱ्या लोकांना पळून जाण्यास भाग पाडलं. सध्या त्यांना पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवत आहे.
  • इस्रायल जमिनीवर कधी हल्ला करणार याबाबत कोणतीही स्पष्ट घोषणा झालेली नाही. मात्र, इस्रायल गाझा सीमेवर सातत्यानं सैन्याची संख्या वाढवत आहे.
  • शुक्रवारी, दक्षिण लेबनॉनमधील सीमा संघर्षांचे वार्तांकन करणार्‍या आंतरराष्ट्रीय पत्रकारांवर इस्रायलनं तोफगोळे डागून हल्ला केला. यात एक ठार तर सहा जण जखमी झाले.
  • 7 ऑक्टोबरपासून हमासनं आक्रमण सुरू केल्यापासून या युद्धात किमान 3200 लोकांनी आपला जीव गमावलाय.
  • अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशी ग्वाही इस्रायलला दिली आहे.

उत्तर गाझामधून मोठ्या संख्येनं पळून जात आहेत लोकं, विध्वंसाची चित्रंही आली समोर : इस्रायली सैन्यानं शनिवारी उत्तर गाझामधील लोकांना दक्षिणेकडील भागात पळून जाण्याचा अल्टिमेटम दिलाय. त्यामुळं आता गाझामध्ये लोकं मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत आहेत. गाझामधून लोकांच्या पलायनानंतर इस्रायल हमासवर मोठ्या हल्ल्याची योजना आखत आहे. यानंतर गाझामधील लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. लोक स्वतःच्या वाहनानं स्थलांतर करत आहेत. गाझामध्ये बरेच विध्वंस झालंय, रॉकेट हल्ल्यात इमारती कोसळल्याची चित्रंही तिथून समोर आली आहेत.

गाझा पट्टीच्या सीमेवर इस्रायली रणगाड्यांची संख्या वाढली, जमिनीवर युद्ध लढण्याची इस्रायलची तयारी : इस्रायली सैन्यानं आता स्वत:च्या भूमीवरून युद्ध लढण्याची रणनीती अधिक तीव्र केलीय. गाझाला दिलेल्या अल्टिमेटमची अंतिम मुदत संपलीय, त्यानंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इस्रायली सैन्य अधिकारी गाझा सीमेजवळ अज्ञात ठिकाणी जमा झाले आहेत. इस्रायलनं जमिनीवर हल्ला करण्याची रणनीती आखण्यात आली होती, असं मानलं जातंय. यावेळी गाझा सीमेजवळ इस्रायली सैन्याचे मोठ्या प्रमाणात रणगाडेही दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. Israel Hamas War : इस्रायलच्या हल्ल्यात हमासच्या हवाई दलाचा प्रमुख ठार, पॅलेस्टिनी नागरिकांचं दक्षिण गाझाकडे स्थलांतर
  2. Palestinian Israeli Conflict : हमास-इस्रायल युद्धात रशियाची उडी; स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्याची व्लादिमीर पुतीन यांची मागणी
  3. US Secretary Visit Israel : युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री तीन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.