टीटीपीला अफगाण भूमीचा वापर करू न देण्याचे तालिबानचे आश्वासन; पाकचा दावा

author img

By

Published : Aug 23, 2021, 5:19 PM IST

टीटीपीला अफगाण भूमीचा वापर करू न देण्याचे तालिबानचे आश्वासन; पाकचा दावा

तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजे टीटीपीच्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानच्या भूमीचा पाकिस्तानविरोधात वापर करू देणार नाही असे आश्वासन अफगाण तालिबानने पाकिस्तान सरकारला दिल्याचे पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी सोमवारी सांगितले. तालिबानने अफगाणिस्तावर ताबा मिळविल्यानंतर इथल्या तुरुंगात बंद असलेल्या टीटीपीच्या काही दहशतवाद्यांची सुटका झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी गृहमंत्र्यांनी हे विधान केले आहे हे विशेष.

इस्लामाबाद : तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजे टीटीपीच्या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानच्या भूमीचा पाकिस्तानविरोधात वापर करू देणार नाही असे आश्वासन अफगाण तालिबानने पाकिस्तान सरकारला दिल्याचे पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी सोमवारी सांगितले. तालिबानने अफगाणिस्तावर ताबा मिळविल्यानंतर इथल्या तुरुंगात बंद असलेल्या टीटीपीच्या काही दहशतवाद्यांची सुटका झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी गृहमंत्र्यांनी हे विधान केले आहे हे विशेष.

पत्रकार परिषदेतून दिली माहिती

अफगाण तालिबानने टीटीपीचा कमांडर मौलवी फकीर मोहम्मद याच्यासह या टीटीपीच्या काही दहशतवाद्यांना मुक्त केल्याच्या वृत्ताची सरकारने दखल घेतल्याचे पाकिस्तानचे गृहमंत्री शेख राशीद अहमद यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. या मुद्द्यावरून सरकार तालिबानच्या सातत्याने संपर्कात असल्याचेही ते म्हणाले. पाकिस्तानात दहशतवाद पसरविणाऱ्यांना नियंत्रणात ठेवा असे अफगाण तालिबानला सांगण्यात आले आहे. टीटीपीला कोणत्याही परिस्थितीत अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर केला जाऊ देणार नाही असे आश्वासन अफगाण तालिबानने दिल्याचे अहमद यावेळी म्हणाले.

पाकिस्तानने तालिबानला दिली टीटीपी दहशतवाद्यांची यादी

अफगाणिस्तानात सक्रीय असलेल्या टीटीपीशी संबंधित मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची एक यादी पाकिस्तानने अफगाण तालिबानला दिल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर अहमद यांनी हे विधान केले आहे हे विशेष. एक्सप्रेस ट्रिब्युनच्या वृत्तानुसार, तालिबानने काबुलवर नियंत्रण मिळविल्यानंतर त्यांना ही यादी सोपविण्यात आली. एका वरिष्ठ पाकिस्तानी अधिकाऱ्याचा हवाला देत ट्रिब्युनने हे वृत्त दिले होते. पाकिस्तानच्या टीटीपीसंदर्भातील तक्रारीची चौकशी करण्यासाठी अफगाण तालिबानचा प्रमुख हबिबतुल्लाह अखुंदझादा याने तीन सदस्यीय समिती नेमल्याचेही सूत्रांकडून समजते आहे.

टीटीपी प्रतिबंधित संघटना

तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान ही अफगाण-पाक सीमेनजिक तळ असणारी एक प्रतिबंधित दहशतवादी संघटना असून पाकिस्तानात अनेक दहशतवादी हल्ले या संघटनेने घडवून आणले आहेत. पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यांसाठी टीटीपीकडून अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर केला जातो असे सांगितले जाते.

टीटीपीकडे सहा हजार फायटर्स

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या जुलैमधील एका अहवालानुसार, टीटीपीकडे अफगाणच्या हद्दीत सुमारे सहा हजार प्रशिक्षित फायटर आहेत. टीटीपीने अफगाण तालिबानला अफगाण सरकारविरोधातील युद्धातही सहकार्य केलेले आहे.
हेही वाचा - अफगाणिस्तानात सत्तेवर येण्यासाठी तालिबानला पाकिस्तानची मदत, अमेरिकन खासदाराचा गंभीर आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.