नवी दिल्ली - दहशतवाद्यांना काळा पैसा पुरवत असल्याचे म्हणत पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय कृती दलाने (एफटीए) करड्या यादीत ठेवले आहे. या यादीतून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे. नुकतेच पाकिस्तानने मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या अनेक दहशतवाद्यांची नावे जाहीर केली आहेत. मात्र, ही यादी पाहिल्यानंतर भारताने पाकिस्तावर टीका केली आहे. हल्ल्याच्या मुख्य सुत्रधारांची नावे या यादीत नसल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
हल्ल्यातील बळींना न्याय मिळाला नाही
मुंबई दहशतवादी हल्ल्यात कोणाकोणाचा सहभाग होता, याची पुराव्यासहीत इत्यंभूत माहिती पाकिस्तानकडे आहे. मात्र, पाकिस्तान या विषयला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. मुंबई हल्ल्यात भारतासह १५ देशांच्या १६६ नागरिकांचा बळी गेला, त्यांना न्याय मिळत नाही. पाकिस्तानच्या कृतीतून प्रमाणिकपणा दिसून येत नाही. पाकिस्तानच्या केंद्रीय तपास यंत्रणांनी हल्ल्यातील आरोपींबाबत अहवाल सादर केला आहे. ही माहिती माध्यमांतून आम्ही पाहिली. मात्र, त्यात मुख्य सुत्रधारांची नावे नाहीत, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पाकिस्तानकडून आंतरराष्ट्रीय नियमांना बगल
२६/११ चा दहशतवादी हल्ल्याचे नियोजन पाकिस्तानात करण्यात आले, तेथूनच या हल्ल्याची सर्व सुत्रे हलली, ही वस्तुस्थिती आहे. या यादीतून दिसून येते की पाकिस्तानकडे हल्लेखोरांची सर्व माहिती आहे. मात्र, पाकिस्तानने कठोर कारवाई केली नाही. मुंबई हल्ल्यातील दोषींवर कारवाई करण्याचे भारताने अनेकवेळा पाकिस्तानला बजावले आहे. मात्र, पाकिस्तानने कायमच आंतरराष्ट्रीय नियमांना बगल दिली आहे, असे श्रीवास्तव म्हणाले.