ETV Bharat / entertainment

''नुसत्या स्टार्सच्या नावावर चित्रपट चालण्याचे दिवस गेले'' - करीना कपूर

author img

By

Published : Aug 10, 2022, 12:46 PM IST

लाल सिंग चड्ढा रिलीजच्या निमित्ताने करीना कपूर खानची खास मुलाखत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीन घेतली आहे. या चित्रपटासाठी तिला स्क्रिन टेस्टही द्यावी लागली होती. हा चित्रपट तिच्यासाठी एक खास परीक्षा होती. यासह सध्या साऊथच्या चित्रपटांनी देशभर लोकप्रियता मिळवली आहे, याविषयी करीनाने अनेक खुलासे या मुलाखती दरम्यान केले आहेत.

करीना कपूर
करीना कपूर

मुंबई - फिल्म इंडस्ट्रीमधील पहिले नामांकित आणि प्रतिष्ठीत कुटुंब म्हणजे कपूर खानदान. या कपूर खानदानातील एक महत्वाचं नाव म्हणजे करीना कपूर आणि सैफ अली खानशी लग्न झाल्यापासून करीना कपूर खान. असो. तर करीनाने आता चाळीशी गाठली आहे आणि तिचा अभिनय खूप परिपक्व झाला आहे. तैमूर आणि जेह ची आई असणारी करीना आता मोजकेच चित्रपट करते. त्यातीलच एक म्हणजे आमिर खान निर्मित आणि अभिनित लाल सिंग चड्ढा.

करीना कपूर
करीना कपूर

“मी आता मोजकेच चित्रपट करते. मला जे रोल्स भावतात आणि ज्या कामातून मला समाधान मिळते आणि आनंद मिळतो तेच काम करण्यास मी पसंती देते. करियरच्या या टप्प्यावर माझी फक्त माझ्याशीच स्पर्धा आहे. किंबहुना लाल सिंग चड्ढा देखील त्यातीलच एक. आमिर खानने मला याची कथा ऐकविली तेव्हा मला ही भूमिका खूपच भावली. यात अनेक कंगोरे आहेत. मला तर असे वाटते की लाल सिंग पेक्षाही माझ्या भूमिकेला जास्त पदर आहेत आणि म्हणूनच ही भूमिका साकारताना मला आत्मिक समाधान मिळालं. अर्थात दिग्दर्शक अद्वैत चंदन आणि सहकलाकार आमिर खान यांच्यामुळे ही अवघड भूमिका साकारणे सोप्प गेलं. आमिर मुळातच गोड व्यक्ती आहे. हा चित्रपट बनताना अनेक अडचणी आल्या. मुख्यत्वेकरून कोरोना मुळे लादलेला लॉकडाऊन आणि त्याच सुमारास माझे गर्भारपण. परंतु आमिरने समजूतदारपणे सर्व परिस्थिती उत्तमरीत्या हाताळली. मी गरोदर असल्यामुळे शूटिंग दरम्यान त्याने तर माझी खूपच काळजी घेतली. आणि हो, माझ्या गरोदरपणामुळे आम्ही संहितेत अजिबात बदल केलेला नाहीये. आमिर आपल्या स्क्रिप्ट पासून तसूभरही हलत नाही”, करीना कपूर खानने आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांच्यासोबत संवाद साधताना सांगितले .

करीना कपूर
करीना कपूर

या भूमिकेसाठी करीनाला स्क्रीन टेस्ट द्यावी लागली. त्याबद्दल बोलताना करीना म्हणाली की, “मी इतके चित्रपट केले परंतु याआधी मी कधीही स्क्रीन टेस्ट दिलेली नाहीये. लाल सिंग चड्ढा साठी मात्र मला स्क्रीन टेस्ट द्यावी लागली. अर्थात त्याचे कारणही महत्वाचे आहे. माझी आणि आमिरची कॅरेक्टर्स तरुण वयापासून ते मध्यमवयीन वयापर्यंत प्रवास करतात. तरुण वयातील रूपा मी चांगल्या तऱ्हेने करू शकेन याचा आमिरला विश्वास होता. त्याला मी वयस्क रूपा कशी साकारू शकते हे त्याला बघायचं होतं, म्हणजे अभिनय नाही तर लूक्स-वाईस. तसेच मी ‘डी-एजिंग’ मध्ये कशी दिसते हेदेखील त्याला जाणून घ्यायचं होतं. मला इथे नमूद करायचे आहे की मला संहिता ऐकविताना त्याने या चित्रपटात तो भूमिका करतोय असे अजिबात उघड केले नव्हते. त्याला माझा निर्णय त्यावर ठरणारा नको होता. तब्बल चार तास नरेशन चालले. मी स्क्रिप्ट ऐकल्यावर त्याच्या प्रेमातच पडले. आणि जेव्हा आमिर प्रमुख भूमिका करतोय हे समजल्यावर अजूनच छान वाटले. महत्वाचं म्हणजे हा एक कौटुंबिक चित्रपट आहे. प्रेक्षकांनाही मोठ्या पडद्यावर फॅमिली फिल्म्स बघायला आवडतात.”

करीना कपूर
करीना कपूर

नजीकच्या काळात दाक्षिणात्य चित्रपटांनी भारताच्या उत्तर, मध्य आणि पश्चिम प्रांतात मुसंडी मारली आहे. त्यावर भाष्य करताना करीना म्हणाली, “आताच्या काळात प्रेक्षकांना चित्रपटांत आशय हवा आहे आणि कदाचित तो बाहुबली, पुष्पा, आर आर आर सारख्या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांना दिसला असावा. हल्लीचा प्रेक्षक शहाणा झाला आहे. एका क्लिकवर त्यांना जगातील कोणतीही कलाकृती बघता येते. त्यांना कन्टेन्ट हवा आहे आणि कदाचित प्रदर्शित झालेल्या, काही अपवाद वगळता, हिंदी चित्रपटांमध्ये तो आढळला नसावा. फक्त हिरो, हिरॉईन, व्हिलन, नाच गाणी हे त्यांना आता नकोय. त्यांना चांगली कथानकं हवीत. नुसत्या स्टार्स च्या नावावर चित्रपट चालण्याचे दिवस गेले आता. कोविड काळात प्रेक्षकांच्या अभिरुचीत अनेक बदल झालेत. लोकांना आता चांगल्या कथा हव्यात. त्यातच वेब सिरीज मधून तगड्या कथा आणि ताकतीचे सादरीकरण होऊ लागले आहे त्यामुळे त्यांना फॉर्म्युला फिल्म्स तकलादू वाटत असाव्यात.”

करीना कपूर
करीना कपूर

करीना सध्या उत्तम भूमिकांच्या शोधात आहे. नवनवीन दिग्दर्शक आणि नव्या दमाच्या कलाकारांसोबत काम करायला ती प्राधान्य देतेय. त्याच अनुषंगाने करीना आता वेब विश्वातही उतरली आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित सस्पेक्ट एक्स मध्ये ती मध्यवर्ती भूमिका साकारतेय. त्याबद्दल सांगताना ती म्हणाली की, “सुजॉय (घोष) बरोबर काम करताना वेगळा अनुभव मिळाला. सस्पेक्ट एक्समध्ये माझ्यासोबत विजय वर्मा आणि जयदीप अहलावत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या नव्या दमाच्या कलाकारांसोबत काम करताना वेगळी ऊर्जा मिळाली. आता तुम्ही चांगला अभिनय करू शकता की नाही हे प्रेक्षक अगदी जवळून बघतात. प्रत्येकाची औकात दिसून येते. कारण स्क्रीन त्यांच्या हातात आलाय. त्यामुळे या माध्यमात फक्त आणि फक्त उत्तम अभिनयच तुम्हाला तारू शकतो. अश्या प्रोजेक्ट्समध्ये तुमची कसोटी लागते. त्यामुळे रियल ऍक्टिंग करीत प्रेक्षकांना गुंतविणे जास्त महत्वाचे आहे. यावेळेस वास्तविक अभिनय हे कलाकाराचे अस्त्र कामी येतेय.”

हेही वाचा - आमिर खानची सुवर्ण मंदिराला भेट, 'लाल सिंग चड्ढा'चे प्रमोशन अंतिम टप्प्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.