ETV Bharat / city

मंगळसूत्र गहाण ठेवून पतीच्या हत्येची सुपारी देणाऱ्या पत्नीसह चौघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

author img

By

Published : Aug 5, 2021, 6:48 PM IST

Updated : Aug 5, 2021, 7:02 PM IST

प्रभाकर पांडू गंजी असे हत्या झालेल्या कार चालकाचे नाव असून या गुन्ह्यात पत्नी श्रुती प्रभाकर गंजी (वय 32, रा. कणेरी), प्रियकर नितेश गोवर्धन वाला (वय 28, रा. भादवड), मैत्रीण प्रिया सुहास निकम (32, रा. वेताळपाडा) या आरोपींना कालच अटक केली होती. तर संतोष गुरु रेड्डी (वय 26, रा. गायत्रीनगर, भिवंडी) असे सुपारी घेऊन हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावरील मानकोली नाका येथील पुलाखाली ओला कार चालकाची गळा आवळून हत्या केल्याची घटना १ ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांच्या तपासात बायकोनेच स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेवून नवऱ्याची हत्या करण्यासाठी सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नारपोली पोलिसांनी कालच पत्नीसह तिचा प्रियकर व मैत्रिणाला अटक केली असून त्यापाठोपाठ भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने सुपारी घेऊन हत्या करणाऱ्या मुख्य आरोपीला गजाआड केले. प्रभाकर पांडू गंजी असे हत्या झालेल्या कार चालकाचे नाव असून या गुन्ह्यात पत्नी श्रुती प्रभाकर गंजी (वय 32, रा. कणेरी), प्रियकर नितेश गोवर्धन वाला (वय 28, रा. भादवड), मैत्रीण प्रिया सुहास निकम (32, रा. वेताळपाडा) या आरोपींना कालच अटक केली होती. तर संतोष गुरु रेड्डी (वय 26, रा. गायत्रीनगर, भिवंडी) असे सुपारी घेऊन हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

चार लाखात पतीच्या हत्येचा सौदा

श्रुती हिने प्रियकर नितेश वालासोबत विवाह करण्यासाठी आपल्या पतीकडे घटस्फोटासाठी तगादा लावला होता. मात्र पती प्रभाकर घटस्फोट देत नसल्याची माहिती तिने आपली मैत्रीण प्रिया निकमला दिली. तिने पतीची हत्या करून काटा काढण्याचा सल्ला दिला. तसेच आपल्या ओळखीचा सुपारी घेऊन हत्या करणारा गुन्हेगार संतोष रेड्डी असल्याचे सांगितले. त्यानंतर ४ लाख रुपयांत पती प्रभाकरच्या हत्येचा सौदा केला. त्यासाठी आरोपी पत्नी श्रुतीने स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेवून एक लाख रुपये अॅडव्हान्स हत्या करणाऱ्या संतोषला दिले होते.

'यामुळे' हत्येचा कट केला होता रद्द

हत्येची सुपारी घेणाऱ्या आरोपीने २७ जुलै २०२१ रोजी प्रभाकरच्या हत्येचा कट रचला होता. त्यासाठी त्याने प्रभाकरची ओला कार वाडा जाण्यासाठी बुक केली होती. ठरल्याप्रमाणे प्रभाकर भाडे घेऊन भिवंडीहून वाडामार्गे जात होता. त्याच सुमाराला मुख्य आरोपी संतोषला प्रभाकरच्या पत्नीचा मोबाइलवर कॉल आला. या कॉलमुळे प्रभाकरच्या हत्येप्रकरणी आपण पडकले जाऊ, या भीतीने त्यादिवशी हत्येचा कट रद्द केला. मात्र हत्येसाठी १ लाख रुपये अॅडव्हान्स दिल्याने प्रभाकरच्या पत्नीने सुपारीबाज मुख्य आरोपी संतोषकडे हत्येसाठी तगादा लावला होता.

दुसऱ्यांदा रचला हत्येचा कट

आरोपी पत्नी श्रुती, प्रियकर नितेश, मैत्रीण प्रिया यांनी दुसऱ्यांदा कट रचून हत्या करणाऱ्यांनी ३१ ऑगस्टच्या रात्री मुंबई येथे जाण्यासाठी प्रभाकर यास मोबाइल करून रात्री दहा वाजता त्याची ओला कार बुक केली व त्यानंतर प्रवासात मुख्य आरोपी संतोष रेड्डी , त्याचे साथीदार रोहित बचुटे, काशिनाथ धोत्रे हे तिघे निघाले होते. त्याच सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावरील मानकोली पुलाखाली कार येताच सुपारीबाजाच्या त्रिकूटाने प्रभाकरची गळा आवळून हत्या करून मृतदेह कारच्या चालक सीटवरच ठेवून पसार झाले होते. तसेच हत्येनंतरचे ३ लाख घेण्यासाठी संपर्क करीत होते. मात्र त्या आधीच पोलिसांनी हत्येचा उलगडा करीत आतापर्यंत ४ आरोपींना अटक केली आहे. तर रोहित बचुटे, काशिनाथ धोत्रे हे २ आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Last Updated :Aug 5, 2021, 7:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.