ETV Bharat / city

मराठ्यांना आरक्षण मिळावे या मताचे उद्धव ठाकरे कधीच नव्हते, नारायण राणेंचा प्रहार

author img

By

Published : May 31, 2021, 10:07 PM IST

गेली अनेक वर्षे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष सुरू असताना मी शिवसेनेत असल्यापासून मराठ्यांना आरक्षण मिळावे या मताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीच नव्हते, असा थेट प्रहार भाजपाचे नेते खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर केला आहे.

नारायण राणे
नारायण राणे

ठाणे - गेली अनेक वर्षे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष सुरू असताना मी शिवसेनेत असल्यापासून मराठ्यांना आरक्षण मिळावे या मताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीच नव्हते, असा थेट प्रहार भाजपाचे नेते खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर केला आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरले असल्याची टीकाही राणे यांनी ठाण्यात बोलताना केली.

मराठ्यांना आरक्षण मिळावे या मताचे उद्धव ठाकरे कधीच नव्हते, नारायण राणेंचा थेट प्रहार

'अनेक चुका महाविकासआघाडी सरकारने केल्या'

सरकारने खटला चालविण्यात टाळाटाळ करून तारखा मागितल्या, गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या परिशिष्टाचे इंग्रजीत भाषांतर करून दिले नाही व त्यामुळे आयोग एकतर्फी असल्याचा समज निर्माण झाला, अशा अनेक चुका महाविकासआघाडी सरकारने केल्या, असे राणे यांनी सांगितले. ठाण्यात भाजपाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी विरोधक आणि मराठा समाजाची पुढची भूमिका सांगितली. यावेळी भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, प्रदेश सचिव ॲड. संदीप लेले, गटनेते मनोहर डुंबरे उपस्थित होते.

'माविआने आता तरी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत'

शिवसेना–काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात गंभीर चुका केल्यामुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेले आहे. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी महाविकास आघाडीने आता तरी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकारने दिल्या होत्या तशा शिक्षण आणि रोजगारासाठीच्या सवलती मराठा समाजाला द्याव्यात व त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे, अशी मागणी देखील राणे यांनी केली.

'सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात माविआ सरकार अपयशी ठरले'

मराठा आरक्षणासाठी सुमारे तीस वर्षे लढा चालू होता. अखेरीस तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा महायुती सरकारने कायदा करून मराठा समाजाला आरक्षण दिले. भाजपा सरकारने मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकवले आणि हे सरकार असेपर्यंत आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती आली नाही. परंतु, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत अनेक चुका करण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात महाविकास आघाडी सरकार पूर्ण अपयशी ठरले असल्याचे राणे यांनी सांगितले.

'फक्त हात धुवा, अंतर ठेवा, माझी जबाबदारी आणि लॉकडाऊन'
राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित असून कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मुख्यमंत्री ठाकरे सकाळी उठतात आणि फक्त हात धुवा, अंतर ठेवा, माझी जबाबदारी आणि लॉकडाऊन या संदर्भातच बोलतात आणि नंतर पुन्हा पिंजऱ्यात जातात, अशी खरमरीत टीका नारायण राणे यांनी केली.

'आरक्षण देण्याच्या दृष्टीने पाऊले उचलावी अन्यथा..'
मराठा समाजाला आरक्षण लवकरात लवकर मिळावे यासाठी राज्य सरकारने प्रयन्त करून तशी पाऊले उचलावी, अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरला तर उद्रेक होईल आणि याची सर्व जबाबदारी राज्य सरकारची असेल, असा इशारा देखील यावेळी राणे यांनी दिला.

हेही वाचा - Maratha Reservation : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार ईडब्लूएसच्या 10 टक्के आरक्षणाचा लाभ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.