ETV Bharat / city

ठाण्यातील शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशावर की महापौरांच्या विचारसरणीवर चालते?; आनंद परांजपेंचा पालकमंत्र्यांना खोचक सवाल

author img

By

Published : Mar 5, 2022, 6:08 PM IST

Updated : Mar 5, 2022, 8:06 PM IST

ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के (Thane Mayor Naresh Mhaske) यांनी भाजप शिवसेना युतीबाबत विधान केले होते. त्यामुळे ठाण्याची शिवसेना (Thane Shivsena) ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर की महापौर नरेश म्हस्के यांच्या विचारसरणीवर चालते? याचा खुलासा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी लगावला आहे.

Anand Paranjpe
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आनंद परांजपे

ठाणे - एकीकडे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) झालीच पाहिजे, असे म्हणत असतानाच ठाण्याचे विद्यमान महापौर नरेश म्हस्के (Thane Mayor Naresh Mhaske) हे शिवसेना-भाजप नैसर्गिक युतीचे (Shivsena BJP Alliance) दाखले देत आहेत. त्यामुळे ठाण्याची शिवसेना (Thane Shivsena) ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर की महापौर नरेश म्हस्के यांच्या विचारसरणीवर चालते? याचा खुलासा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते नरेश म्हस्के -

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे

माझ्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला येऊ शकत नसाल तर, मी तुमच्यासोबत कशाला राहू, असा इशारा महापौर म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिला. आपल्या कारकिर्दीतील शेवटच्या महासभेत शिवसेना आणि भाजपमध्ये नैसर्गिक युती असल्याचे म्हस्के यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाचा आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला.

आनंद परांजपे यांचा पालकमंत्र्यांना खोचक सवाल -

काल ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली शेवटची महासभा संपन्न झाली. त्यांच्या स्थायीभावाप्रमाणे त्यांच्यातील अहंपणा आणि अहंकार आजही त्यांच्यातून गेलेला नाही. खरंतर त्यांची महापौरपदाची अडीच वर्षांची कारकिर्द आज संपली आहे. कालदेखील महासभेमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटे काढीत असताना, शिवसेना आणि भाजप ही नैसर्गिक युती असल्याचे संभाषण करीत स्वबळाचा नारा दिला. आपणाला तर आश्चर्य वाटते की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे हे एकीकडे म्हणतात की 30 वर्षे आम्ही युतीमध्ये सडलो. सापाला आम्ही दूध पाजले आणि ठाण्याचे महापौर हे सेना-भाजपची नैसर्गिक युती आहे अन् हे दोघे पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशा प्रकारचे भाष्य करीत आहेत. याचा खुलासा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी करायला हवाय की, “ठाण्यातील शिवसेना ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर चालते की शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, विद्यमान महापौर नरेश म्हस्के यांच्या विचारसरणीवर चालते”!

गुरुवारी त्यांनी स्वबळाचा नारा दिला. आम्ही त्याचे स्वागतच करतो. किंबहुना, त्यांना शुभेच्छाच देतो. मात्र, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, जिथे शक्य आहे; तिथे महाविकास आघाडी झालीच पाहिजे’ असे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाला साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सातत्याने महाविकास आघाडी ठाण्यात गठीत झालीच पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. आमचादेखील तोच प्रयत्न आहे. उद्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला तर आम्ही त्याचे स्वागत करु. नशिबाने नरेश म्हस्के असे म्हणाले नाहीत की, 142 पैकी 142 नगरसेवक आमचेच निवडून येतील; कारण, त्यांचा चाणक्याचा कलियुगातील नारद कधी झाला, हे त्यांना समजलेलेच नाही, असा टोलाही परांजपे यांनी लगावला.

राष्ट्रवादी आणि सेना आघाडी अश्यक्य

मागील काही दिवसांपासून ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत कलह समोर आला आहे. विकासकामे भूमिपूजन आणि उदघाटन यामुळे हे वाद वाढतच आहेत. एकीकडे जितेंद्र आव्हाड आघाडीसाठी उत्सुक आहेत, तर शिवसेना एकला चलोच्या भूमिकेत आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत आघाडी ही जवळपास अशक्य झाली आहे.

Last Updated : Mar 5, 2022, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.