ETV Bharat / city

ज्यूपिटर रुग्णालयात ऑपरेशनवेळी महिलेच्या पोटात राहिला कापडी मॉप; सर्जन, सहाय्यक सर्जन, भूलतज्ञासह नर्सवर गुन्हा

author img

By

Published : Mar 29, 2022, 10:09 PM IST

Updated : Mar 31, 2022, 9:00 PM IST

jupiter hospital
ज्यूपिटर रुग्णालय

प्रसूतीसाठी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या गरोदर महिलेचे सिझरिंग ऑपरेशन (Ccesarean delivery Operation) करण्यात आले. यावेळी डॉक्टरांच्या चुकीने पोटात कापडी मॉप राहिल्याने महिलेवर गंभीर परिणाम झाले. याप्रकरणी सर्जन, सहाय्यक सर्जन, भूलतज्ञासह नर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील ज्यूपिटर रुग्णालयात (Jupiter Hospital thane) हा प्रकार घडला आहे.

ठाणे - प्रसूतीसाठी ठाण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या गरोदर महिलेचे सिझरिंग ऑपरेशन (Ccesarean delivery Operation) करण्यात आले. यावेळी डॉक्टरांच्या चुकीने पोटात कापडी मॉप राहिल्याने महिलेवर गंभीर परिणाम झाले. शस्त्रक्रिया केल्यानंतर सदरचा प्रकार समोर आला. अखेर ज्यूपिटर रुग्णालयाचे (Jupiter Hospital Thane) सर्जन डॉ. अशुतोष आजगावकर, डॉ. सुप्रिया महाजन, डॉ. चिन्मयी गडकरी आणि नर्स यांच्यावर सोमवारी हलगर्जीपणा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्तकनगर पोलीस (Vartak Nagar Police Thane) अधिक तपास करत आहेत. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

डॉक्टर मृण्मयी दिवेकर

तक्रारदार मृण्मयी अजिंक्य दिवेकर ( वय. ३१ रा. प्लॉटन, ११, दिवेकर हॉस्पीटल, पवार कॉलनी, शाहुपुरी, सातारा) यांना प्रसूतीकरिता ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्युपिटर रुग्णालयात तक्रारदार मृण्मयी यांची प्रसूती ही सिझरिंगद्वारे करण्यात आली. सदर सिझरिंग हे सर्जन डॉ. अशुतोश आजगावकर, सहाय्यक सर्जन डॉ. सुप्रिया महाजन, भूलतज्ञ चिन्मयी गडकरी आणि नर्स यांनी केले. ऑपरेशनच्या दरम्यान सिझरिंग झाल्यानंतर डॉक्टर टीमने केलेल्या हलगर्जीपणामुळे रुग्णाच्या पोटात चुकीने कापडी मॉप राहिला. सिझरिंगनंतर तक्रारदार मृण्मयी अजिंक्य दिवेकर यांच्या पोटात दुखू लागले.

चार जणांवर गुन्हा दाखल : याबाबत डॉ. आशुतोष आजगावकर याना सांगितल्यानंतरही त्यांनी रुग्णाच्या उपचार आणि तक्रारींकडे दुर्लक्ष केले. परिणामी तक्रारदारला मोठ्या गंभीर शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. या प्रकरणी मंगळवारी २८ मार्च रोजी तक्रारदार मृण्मयी अजिंक्य दिवेकर यांनी सिझरिंग करणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात शस्त्रक्रियेत हेळसांड आणि शस्त्रक्रियेनंतर होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी सर्जन, सहाय्यक सर्जन यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा तक्रारीनंतरही दुर्लक्ष, उपचारास विलंब : प्रसूतीची सिझरिंग करण्यासाठी ऑपरेशन कक्षात उपस्थित डॉक्टरांच्या टीमने ऑपरेशन केले. मात्र, ऑपरेशन दरम्यान वापरण्यात येणारे कापडी मॉप हा पोटात राहिला. दरम्यान, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया पूर्ण करून कापड मॉप काढण्याऐवजी थेट टाके मारून ऑपरेशन संपविले. मात्र, काही काळातच रुग्ण महिला मृण्मयी अजिंक्य दिवेकर यांना त्रास जाणवू लागला. त्यांनी तक्रार केल्यानंतर ज्यूपिटरचे डॉक्टर आशुतोष आजगावकर यांनी पोटाचा स्कॅन किंवा अन्य तपासणी करण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्रास वाढल्याने तपासणीनंतर पोटात शास्त्रक्रिये दरम्यान कापडी मॉप राहिल्याचे समोर आले. नंतर पुन्हा महिलेवर गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आली.

उजव्या अंडाशयाची नळी काढून टाकण्याची वेळ आली : सिझरिंगच्या शस्त्रक्रियेमुळे पोटात राहिलेल्या कापडी मॉपने महिलेला गंभीर स्वरूपाच्या परिणामाला सामोरे जावे लागले. जेव्हा कापडी मॉप राहिल्याचे निदान झाल्यानंतर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यास घेतली असता, कापडी मॉपमुळे पोटामधील आतडी तसेच अंडाशय व अंडाशयाची उजवी नळी यांना चिकटून त्या ठिकाणी पु होवुन गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याचे तपासणीत समोर आले. त्यानंतर त्यावर उपचार करण्याकामी डॉक्टरांना मोठी शस्त्रक्रिया आणि रुग्णाची उजव्या बाजूची अंडाशयाची नळी काढून टाकण्याची नामुष्की ओढावली.

शस्त्रक्रिया टीमचा निष्काळजीपणा : रुग्ण महिलेला झालेल्या त्रासाबाबत केलेल्या तपासणी अहवालात समोर आलेल्या वैद्यकीय बाबींचा तपासून ऑपरेशन करणाऱ्या टीमचा निष्काळजीपणा असल्याचा ठपका ठेवण्यात आला. यासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे वैद्यकीय अभिप्राय घेण्यात आला. दरम्यान, शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा झाल्याचा ठपकाही जिल्हा शल्यचिकित्सक यांनी अहवालात ठेवला.

ज्यूपिटरच्या सर्जनवर गुन्हा दाखल : ज्युपिटर रुग्णालयात झालेल्या शस्त्रक्रियेमुळे निर्माण झालेल्या गोंधळात आणि डॉक्टरांच्या दुर्लक्षितपणामुळे रुग्णाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली. महिलेची उजव्या अंडाशयाची नळीच काढून टाकावी लागली. तशा प्रकारचा अभिप्राय ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी अहवालात दिल्यानंतर रुग्ण मृण्मयी अजिंक्य दिवेकर यांच्या तक्रारीवरून ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यात निष्काळजी प्रकरणी ज्यूपिटरचे डॉक्टर आशुतोष आजगावकर, सहाय्यक सर्जन डॉ. सुप्रिया महाजन, भूलतज्ञ चिन्मयी गडकरी आणि नर्स यांच्यावर भादंवि ३०८, ३४प्रमाणे गुन्हा दाखल केला. वर्तकनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Last Updated :Mar 31, 2022, 9:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.