सोलापूर - विजापूर महामार्गावर कर्नाटक परिवहन सेवेतील बसने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली. तर दुचाकी चालवणारा तरुण गंभीर जखमी झाला असून तो अत्यवस्थ आहे. दुर्घटनेतील मृत महिला भाजी विक्रेती आहे.
ग्रामस्थांनी एसटी रोखून धरली
पद्मावती तुकाराम निंबर्गी (वय-45) असे मृत भाजी विक्रेत्या महिलेचे नाव आहे. तर संजय अमोगसिद्ध जोडमोटे(वय 35) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या अपघातानंतर सोरेगाव येथील ग्रामस्थांनी ही एसटी रोखून धरली होती. या गोंधळामुळे सोलापूर-विजापूर राष्ट्रीय महामार्गवर वाहतूक कोंडी झाली.
भाजी विक्रीचा व्यवसाय
अपघातातील दोन्ही व्यक्ती शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी करून सोलापूर शहरात विक्री करतात. आज सकाळी देखील दोघे भाजी खरेदी करून दुचाकी वाहनवरून निघाले होते. सोरेगाव येथील बनशंकरी नगरजवळ आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा वेग कमी केला. पण मागून येत असलेल्या कर्नाटक परिवहन सेवेतील बसने त्यांना धडक दिली. त्यामुळे पद्मावती निंबर्गी जागेवरच ठार झाल्या. तर संजय जोडमोटे गंभीर जखमी झाला. सोरेगाव येथील संतप्त ग्रामस्थांनी एसटी रोखून धरली आणि पुढे जाण्यास मज्जाव केला. यामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
अखेर वाहतूक सुरळीत
विजापूर नाका पोलीस ठाण्याला याची माहिती मिळताच पीएसआय सुरज मुलाणी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातात जखमी झालेल्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले. यानंतर काही काळाने वाहतूक सुरळीत करण्यात आली. संबंधित अपघाताची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे.