ETV Bharat / city

सोलापूर जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांचे मोबाईल वापसी आंदोलन

author img

By

Published : Aug 28, 2021, 10:01 PM IST

Updated : Aug 28, 2021, 10:18 PM IST

agitation
अंगणवाडी सेविकांचे मोबाईल वापसी आंदोलन

उत्तर सोलापूर यासह अनेक तालुक्यात अंगणवाडी सेविकांचा मोबाईल वापसी आंदोलनाने जोर धरला आहे. मोहोळ येथील 300 अंगणवाडी सेविकांनी शासनाकडे मोबाईल परत केले आहेत.

सोलापूर - अंगणवाडीचे कामकाज अधिक जलद व सुखकर व्हावे यासाठी मागील सरकारने अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिले होते. मात्र, काही वर्षानंतर या मोबाईलच्या संदर्भात अंगणवाडी सेविकांच्या तक्रारी खूपच वाढल्या आहेत. सध्या जिल्ह्यात ठिकठिकाणी मोबाईल वापसी आंदोलने सुरू आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, मंगळवेढा, उत्तर सोलापूर यासह अनेक तालुक्यात अंगणवाडी सेविकांचा मोबाईल वापसी आंदोलनाने जोर धरला आहे. मोहोळ येथील 300 अंगणवाडी सेविकांनी शासनाकडे मोबाईल परत केले आहेत.

माहिती देताना सूर्यमणी गायकवाड
  • मोबाईल दुरुस्तीसाठी येतोय ३ ते ४ हजार खर्च-

अंगणवाडी कामकाजासाठी शासनाने दिलेले मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. तसेच मोबाईल जुने झाल्यामुळे सतत त्यामध्ये बिघाड होत आहेत. त्यामुळे दुरुस्तीसाठी 3 ते 4 हजार रुपयांचा खर्च अंगणवाडी सेविकांचा होत आहे. शासनाने दिलेले सर्व जुने मोबाईल परत घ्यावेत. नवीन व चांगल्या दर्जाच्या क्षमतेचे आधुनिक मोबाईल सेविकांना देण्यात यावेत. मोबाईलमधील इंग्रजी अॅप बंद करून मराठीतून करण्यात यावे. यासह व इतर मागण्यांसाठी मोहोळ येथे अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने मोहोळ पंचायत समितीसमोर मोबाईल वापसी आंदोलन केले.

  • मोबाईल जमा करून घेतले-

एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी किरण सूर्यवंशी यांनी सांगितले की, हे मोबाईल जमा करून घेतले आहेत. त्या बाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यात येणार आहे. तसेच येत्या २ सप्टेंबर रोजी अंगणवाडी कर्मचारी संघ व इतर संघटनांची बैठक होणार आहे. त्यामध्ये यावर काहीतरी तोडगा निश्चित निघेल, असे त्यांनी सांगितले.

  • आंदोलनाला 300 सेविका उपस्थित-

हे आंदोलन महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य कार्याध्यक्ष सुर्यमणी गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात सुमारे 300 अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या. यानंतर शिष्टमंडळाच्यावतीने एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात बालविकास अधिकारी किरण सूर्यवंशी यांच्याकडे जमा केलेले मोबाईल व निवेदन देण्यात आले.

  • पोषण ट्रॅकर अँप मराठीतून करण्याची मागणी-

यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्यावतीने विविध मागण्या करण्यात आल्या. त्यामध्ये राजभाषा मराठी असताना इंग्रजीमध्ये माहिती भरण्याची जबरदस्ती करणे योग्य नाही. त्यामुळे हे ॲप संपूर्णपणे मराठी करून त्यातील सर्व त्रुटी दूर करावे अन्यथा ते अॅप रद्द करण्यात यावे, मोबाइलवर काम करण्यासाठी सेविका व मदतनिसांना देण्यात येणारा प्रोत्साहन भत्ता मिळण्यामध्ये अनियमितता आहे. सेविका काम करत असूनही त्यांना योग्य मोबदला मिळत नाही. मोबाईलचे वाढलेले काम पाहता भत्त्यात वाढ करण्यात यावी, यासह मोबाइलवरील अतिरिक्त जबाबदारी सांभाळणे सेविकांना अशक्य झाले आहे.

Last Updated :Aug 28, 2021, 10:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.