ETV Bharat / city

Solapur News: सोलापूर जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या, वाचा एक क्लिकवर

author img

By

Published : Oct 13, 2022, 5:22 PM IST

Updated : Oct 13, 2022, 6:33 PM IST

Solapur News
Solapur News

सोलापूर जिल्ह्यात दिवसभरात वेगवेगळ्या अनेक घडामोडी घडल्या आहेत. जाणून घ्या सोलापूर जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरुपात (Solapur News in brief).

1. अकलूज येथे बनावट दारू बनवणाऱ्या कारखान्यावर धाड, 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

अकलूज: राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक संदीप कदम यांनी अकलूज शहरात एका गोडाऊनमध्ये छापा टाकून बनावट देशी दारू तयार करणारा कारखाना (fake liquor factory in akluj) उघडकीस आणला आहे. कदम यांच्या टीमने त्या ठिकाणाहून बनावट देशी दारू, बुचे, गोव्याची दारू, वाहन असा एकूण ११ लाख ५८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कदम यांनी अकलूज शहरातील राऊत नगर येथील गोडाऊन वर १२ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या पथकासह धाड टाकली. त्या ठिकाणी त्यांना बनावट देशी दारू तयार होत असल्याचे आढळून आले. तसेच तेथून बनावट देशी दारू तयार करण्यासाठी लागणारा स्पिरिट ब्लेंड, तयार बनावट देशी दारू, देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, स्वाद अर्क, सिलिंग मशीन, बनावट बुचे, बनावट लेबल, गोवा राज्य निर्मित १८० मिली क्षमतेचे सहा पेट्या विदेशी दारू इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदर गुन्ह्यात आरोपी प्रदीप रमेश माने, रा.बावडा ता. इंदापूर जि. पुणे व शंकर पंडित चुनाडे रा. अकलूज यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ च्या कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरु आहे

जप्त केलेल्या मालासह माळशिरस उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी
जप्त केलेल्या मालासह माळशिरस उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी

2. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाची सांगता

मंगळवेढा: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 18व्या युवा महोत्सवाचा (Solapur university yuva mahotsav) सांगता समारोप आज मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालयात संपन्न झाला. महोत्सवाच्या बक्षीस वितरण सोहळ्यास सैराट फेम सिने अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, कुलगुरू राजेश गादेवार, वित्त व लेखा अधिकारी श्रेणीक शहा, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड. सुजित कदम, कुलसचिव योगिनी घारे उपस्थित होते.

मागील तीन दिवसापासून मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालय येथे युवा महोत्सव सुरू होता. जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयाने यामध्ये सहभाग घेतला होता. बार्शीचे शिवाजी महाविद्यालया यंदाच्या युवा महोत्सवाचे मानकरी ठरले. सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक तर अकलूजच्या शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला. युवा महोत्सवाच्या निमित्ताने गोल्डन गर्ल व गोल्डन बॉयचा किताब सुद्धा देण्यात येतो. सांगोला महाविद्यालयाची विद्यार्थिनी तृप्ती बेंगलोरकर ही गोल्डन गर्ल तर बार्शीचा सुरेश काळे हा गोल्डन बॉय पुरस्काराचा मानकरी ठरला आहे.

युवा महोत्सवातील विद्यार्थ्यांचा सन्मान करताना अभिनेत्री रिंकू राजगुरू.
युवा महोत्सवातील विद्यार्थ्यांचा सन्मान करताना अभिनेत्री रिंकू राजगुरू.

3. सोलापूरात शिवसेनेच्या मशालीचे जोरदार स्वागत

सोलापूर: सोलापुरातील शिवसेना पक्षाच्या नेत्यांनी 'मशाल' या नव्या चिन्हाचे स्वागत जल्लोषात केले.(mashal symbol). शहरातील पद्मशाली चौकात शहरप्रमुख विष्णू कारमपुरी यांच्या कार्यालयासमोर ढोल-ताशे वाजवत नव्या चिन्हाचे स्वागत करण्यात आले.

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटातील पदाधिकऱ्यांनी भगवे फेटे बांधून ढोल- ताशांच्या गजरात जल्लोष केला. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी व पदाधिकऱ्यानी मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. 'जय भवानी जय शिवराय', 'मशाल पेटली महाराष्ट्रात घुसली', 'आली रे आली मशाल आली', 'या गद्दारांचं करायचं, काय खाली डोकं वर पाय' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यावेळी म्हणाले, भारतीय जनता पक्षाने शिवसेनेतील गद्दारांना हाताशी धरून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे चिन्हही गोठवण्यात आले. परंतु शिवसेनेला चिन्हामुळे फारसा फरक पडत नाही. आम्हाला मशालचिन्ह मिळाल्यामुळे राज्यातील तमाम शिवसैनिक आनंदी झाला आहे. हे चिन्ह आता आम्ही घराघरात पोहोचवणार आहोत. 2024 साली होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत मशाल चिन्हावर आम्ही भगवा फडकवू, असे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यावेळी म्हणाले.

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे

4. आमदार दत्ता भरणे यांनी घेतली शहरातील कार्यकर्त्यांची बेठक

सोलापूर: राज्यात सत्तांतर झाल्या पासून सोलापूरचे माजी पालकमंत्री व इंदापूर मतदार संघाचे आमदार दत्ता भरणे (Dattatray Bharne) सोलापूरला आलेच नव्हते. शुक्रवारी 7 ऑक्टोबर रोजी आमदार दत्ता भरणे यांच्या अध्यक्षतेखाली सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादीची बैठक संपन्न झाली. बैठकीत सोलापूर शहरातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे फक्त चारच नगरसेवक निवडून आले होते. या चार नगरसेवकांच्या जोरावर राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने आगामी महानगरपालिका निवडणूक लढविणार आहे असून महापौर राष्ट्रवादीचाच असेल असा विश्वास दत्ता भरणे यांनी व्यक्त केला. राज्यात सत्तांतर झाल्या पासून सोलापूर शहरात राष्ट्रवादी बॅकफूटवर गेल्याचे चित्र निर्माण झाले होते. पण दत्ता भरणे यांनी बैठक घेऊन कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्याचा प्रयत्न केला.

आमदार दत्ता भरणे
आमदार दत्ता भरणे

5. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अतिशय संवेदनशील - चंद्रकांत पाटील

सोलापूर: पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या बंदी (PFI ban) नंतर अनेक राजकीय नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील बंदी घालावी (ban RSS) अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) देखील अप्रत्यक्षरित्या अशाच प्रकारची मागणी केली होती. त्यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सोलापूरात प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. संघावर बंदी आणण्याचा अनेकांनी प्रयत्न केला होता. मात्र संघ त्यातून उजळून निघाला व वाढत गेला. त्यामुळे याची भीती संघाला कधीच नाही. जे करायचं ते घटनेच्या चौकटीत करा. कारण घटनेच्या चौकटीत संघावरील बंदी कधीच टिकली नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटील हे सोमवार 3 ऑक्टोबरला सोलापूर दौऱ्यावर आले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी यश संपादन केले. त्यांचा यथोचित सत्कार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ठेवण्यात आला होता.

मुख्यमंत्र्यांनी चांदणी चौकातील पूल पाडून चमत्कार केला असे चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात पुढे म्हटले. पुणे येथील नागरिकांच्या समस्येला जाणून मुख्यमंत्र्यांनी त्यांची वाहतूक कोंडीतुन सुटका केली. महाराष्ट्र राज्याला अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री लाभले आहेत. पुणे येथून जाताना एकनाथ शिंदे यांना चांदणी चौकातील वाहतूक कोंडी मधून प्रवास करावा लागला. त्यावेळी त्यांनी थांबून सविस्तर माहिती जाणून घेतली आणि अतिशय जूना असं ब्रिज पाडण्याचा आदेश दिला. हे ब्रिज पाडणे खूप अवघड होते, पण मुख्यमंत्र्यांनी चमत्कार करून दाखवला, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

आरोग्य उपसंचालकांची तीन जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांना नोटीस

सोलापूर: आरोग्य उपसंचालक डॉ संजोग कदम यांनी पुणे, सातारा व सोलापूर येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. दर शनिवारी, रविवारी किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आरोग्य खात्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी हे विना परवाना आपले मुख्यालय सोडून गावी जात होते. या अधिकाऱ्यांना आता हे चांगलेच महागात पडणार आहे. आरोग्य खात्यातील व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुट्टी असो किंवा नसो, मुख्यालयाच्या 9 किमी परिसरात राहणे बंधनकारक आहे.त्या बाहेर जावयाचे असल्यास त्यांना वरिष्ठांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. हे सर्व नियम बंधन धाब्यावर बसवून आरोग्य खात्यातील वरिष्ठ अधिकारी गावी जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य सेवा उपसंचालक डॉ संजोग कदम यांनी परिपत्रक काढून ही नोटीस बजावली आहे.

उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालय
उपसंचालक आरोग्य सेवा कार्यालय
Last Updated :Oct 13, 2022, 6:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.