ETV Bharat / city

अंधत्वावर मात; दृष्टीहीन जयंत मंकलेचे UPSC परीक्षेत यश

author img

By

Published : Aug 4, 2020, 7:56 PM IST

jayant mankale
जयंत मंकले

जयंत मूळचा बीडचा आहे. त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण बीडमध्ये झाले. त्यानंतर संगमनेरच्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग महाविद्यालयातून त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर त्याने पुण्यात दोन वर्ष नोकरी केली.

पुणे - वयाच्या तेवीसाव्या वर्षी दृष्टी गेल्यानंतर विपरीत परिस्थितीवर मात करत पुण्याच्या जयंत मंकले या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत देशात 143 वा क्रमांक मिळवत यश प्राप्त केले आहे. पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना 'पुना ब्लाइंड असोसिएशन' या अंध व्यक्तींसाठी काम करणाऱ्या संस्थेची खूप मदत झाल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे आगामी काळात दिव्यांग व्यक्तींसाठीच्या कार्यात सहभागी होण्यास मला आवडेल, असेही जयंत मंकले याने सांगितले.

जयंत मंकले

जयंत मूळचा बीडचा आहे. त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण बीडमध्ये झाले. त्यानंतर संगमनेरच्या अमृतवाहिनी इंजिनिअरिंग महाविद्यालयातून त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर त्याने पुण्यात दोन वर्ष नोकरी केली. ही नोकरी करत असतानाच त्याला डोळ्याचा आजार जडला. हा आजार पुढे इतका बळावला की त्याची दोन्ही डोळ्यांची दृष्टी कायमची गेली.

वयाच्या तेवीसाव्या वर्षी त्याला अचानक अंधत्व आले आणि त्यामुळे नोकरीही गेली. अचानक घडलेल्या या सर्व घटनांमुळे त्याच्या आयुष्यात खूप बदल झाला. नोकरी नसल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना त्याला करावा लागत होता. यामुळे जयंतने पुढे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्धार केला. यासाठी त्याला 'पुना ब्लाइंड असोसिएशन' या अंध व्यक्तींसाठी काम करणाऱ्या संस्थेने मदत केली.

जयंत सांगतो, माझी डोळ्यांची बघण्याची दृष्टी जरी गेली असली तरी आयुष्याकडे बघण्याची दृष्टी नाही गेली. त्यामुळे जराही न डगमगता मी अभ्यास करत राहिलो आणि हे यश मिळाले. जयंत पुढे म्हणाला, मागील दोन-तीन दिवसांपासून आतुरतेने या निकालाची मी वाट पाहत होतो. परीक्षेपूर्वी मी चांगला अभ्यास केला होता. त्यामुळे निकालही चांगलाच येईल याची खात्री होती. अपेक्षेप्रमाणे 143 वी रँकही मला मिळाली आहे. मागील तीन वर्षापासून मी या परीक्षेची तयारी करत होतो. नवीन तंत्रज्ञानाचा मला अभ्यासादरम्यान खूप फायदा झाला. ऑडिओ बुक्सचाही मला फायदा झाला. कोरोनाच्या काळात तुम्हाला नैराश्य येईल, पण मला असं वाटतं की शांततेच्या काळात जास्त कष्ट केले तर पुढील काळात त्याचा जास्त फायदा होईल. त्यामुळे नैराश्य न येऊ देता जिद्दीने अभ्यासाला लागा, यश नक्की मिळेल, असे तो म्हणाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.