ETV Bharat / city

Sharad Pawar in Pune : पंतप्रधान मोदी अर्धवट कामाच्या उद्घाटनासाठी पुण्यात येताहेत

author img

By

Published : Mar 5, 2022, 1:00 PM IST

Updated : Mar 5, 2022, 1:20 PM IST

Sharad Pawar
Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी पंतप्रधानांचा पुणे दौरा, नदी सुधार प्रकल्प आणि युक्रेनमधील परिस्थिती यावर भाष्य केले.

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या पुणे मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यांच्या येण्याला माझा आक्षेप नाही, पण मेट्रोचे काम पूर्ण नाही. अर्धवट कामाचे उद्घाटन करण्यासाठी मोदी पुण्यात येत आहेत, असे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार म्हणाले. पुण्यात पत्रकार परिषद पार पडली त्यावेळी ते बोलत होते. तसेच युक्रेनमधील परिस्थितीबद्दलही त्यांनी भाष्य केले.

नदी सुधार प्रकल्पाला राष्ट्रवादीचा आक्षेप -

पंतप्रधान मोंदीच्या हस्ते उद्या होणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाला राष्ट्रवादीचा आक्षेप आहे. याबाबत ते म्हणाले, मी काही इंजीनिअर नाही. पण मला माहिती आहे की, खडवासलाच्या वरती टेमघर आहे. त्याच्या वरती पानशेत आहे, त्याच्यावर गाव आहे. उद्या ढगफुटी झाली आणि मोठ्या प्रमाणात पाणी नदीत सोडण्याची वेळ आली तर वेगळी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे हा कार्यक्रम झाला की आम्ही जलसंपदा विभागातील तज्ज्ञांकडून माहिती घेणार आहोत. काही त्रुटी असल्यास राज्य सरकारकडे मागणी करणार आहोत आणि गरज पडल्यास महापालिकेलाही विनंती करणार आहोत. पंतप्रधानांचे आपण स्वागत करुया कारण ते देशाचे प्रमुख आहेत. पण उद्या काही अडचण आली तर ती आपल्यालाच निस्तरावी लागणार आहे, असे ते म्हणाले.

युक्रेनमधील विद्यार्थ्यांना तात्काळ आणावे -

युक्रेनमधे कमी फी मध्ये मेडिकलसाठी प्रवेश मिळतो. भारतात पंच्यान्नव टक्के मार्क पडून देखील प्रवेश मिळत नाही. तिथे साठ टक्क्यांना प्रवेश मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यी युक्रेनमध्ये जातात. आजही हजारो मुलं अडकली आगे. जीव मुठीत धरुन ती तिथं आहेत. रशिया आणि युक्रेनमधील संघर्षाचा परिणाम विद्यार्थ्यांवर होतोय. मी काही विद्यार्थ्यांशी बोललो आहे. केंद्र सरकारकडून या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत. या संकटात तुम्ही काय केलं, काय नाही केलं याची चर्चा करण्याची ही वेळ नाही. पण केंद्र सरकारने यात अधिक लक्ष घालण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. तसेच परराष्ट्र मंत्र्यांशी याबाबत संपर्क साधला असल्याची माहिती त्यांनी दिली. युक्रेनच्या सीमेबाहेर येण्यासाठी 6 तास चालत जावं लागतं त्यानंतर रशियाची सीमा येते, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. यात थंडी आहे आणि वरून गोळीबार सुरू असल्याची माहिती त्यांना दिली असल्याचे सांगितले.

Last Updated :Mar 5, 2022, 1:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.