ETV Bharat / city

पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांनी घेतला 'हा' मोठा निर्णय

author img

By

Published : Aug 4, 2020, 5:33 PM IST

पुणे कोरोना अपडेट
पुणे कोरोना अपडेट

पुण्यातील मानाच्या अष्टविनायक गणपती मंडळांनी कोविड मुक्ती केंद्र उभारून सेवा उत्सव करण्याचा निर्धार केला आहे.

पुणे - समाजावर आलेल्या कोरोना संकटाचे विघ्न दूर करण्यासाठी पुण्यातील मानाच्या अष्टविनायक गणपती मंडळांनी कोविड मुक्ती केंद्र उभारून सेवा उत्सव करण्याचा निर्धार केला आहे. या अष्टविनायक गणपती मंडळांनी एकत्रितपणे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील कोविड मुक्ती केंद्राची जबाबदारी घेतली असून एकाच वेळी सुमारे ४०० रुग्णांची सोय या केंद्रामध्ये केली जाणार आहे.

मानाचा पहिला श्री कसबा गणपती, मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती, मानाचा तिसरा श्री गुरुजी तालीम गणपती, मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती, मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती आणि प्रमुख गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ही पुण्यनगरीची मानाची अष्टविनायक गणपती मंडळे एकत्रित येऊन पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने कोविड केअर केंद्राची जबाबदारी घेणार आहेत.

याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, श्री कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, श्री गुरूजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, श्री तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, केसरीवाडा गणपतीचे अनिल सपकाळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, पुनीत बालन, नितीन पंडित, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

फर्ग्युसन महाविद्यालय वसतिगृहातील कोविड मुक्ती केंद्रामध्ये ४०० रुग्णांसाठी आवश्यक बेड व त्यामध्ये २० ऑक्सिजन बेडचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. अत्यंत आध्यात्मिक वातावरणात शरीराच्या प्रतिकारशक्ती बरोबरच मानसिक क्षमता वाढीवर येथे भर देण्यात येणार आहे. गणपती बाप्पा मोरया, कोरोनावर मात करुया...यांसारखे प्रोत्साहनपर फलक देखील केंद्रामध्ये लावण्यात येणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.