ETV Bharat / city

जरंडेश्वर साखर कारखान्यावरील ईडीच्या कारवाईनंतर अजित पवारांनी अखेर मौन सोडले, म्हणाले..

author img

By

Published : Jul 2, 2021, 4:21 PM IST

r
r

ईडीने साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर कारवाई केल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचा असल्याने एक प्रकारे अजित पवारांनाच हा धक्का मानला जातोय. दरम्यान या प्रकरणी आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुणे - सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर कारवाई केल्यानंतर संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचा असल्याने एक प्रकारे अजित पवारांनाच हा धक्का मानला जातोय. दरम्यान या प्रकरणी आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले जरंडेश्वर साखर कारखाना संचालक मंडळाने विकला नाही, तर उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विक्री करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

याविषयी अधिक स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले, 2007 मध्ये मुंबईतील सुंदरबाग सोसायटीने उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यानंतर हायकोर्टाने या साखर कारखान्यांना एक वर्षासाठी मुदतवाढ देण्याचे आदेश दिले होते. तसेच एका वर्षात या कारखान्याने थकलेले पैसे दिले नाही तर ते विक्रीला काढा, अशी सूचना देखील मुंबई हायकोर्टाने दिली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच टेंडर प्रक्रिया राबवून या कारखान्याची विक्री करण्यात आली. हा कारखाना विकत घेण्यासाठी बारा ते पंधरा कंपन्यांनी टेंडर भरले होते. परंतु 'गुरू कमोडिटी' या कंपनीने सर्वात जास्त किमतीचे टेंडर भरले होते. त्यानुसार त्यांच्या कंपनीला 65 कोटी 75 लाख रुपयांमध्ये हा कारखाना विकला गेला.

हे ही वाचा - शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणात ईडीने पवार कुटुंबीयांची चौकशी करावी - किरीट सोमय्या

अजित पवार म्हणाले, गुरू कमोडिटीने विकत घेतलेला हा कारखान बीव्हीजी ग्रुपचे प्रमुख हनुमंत गायकवाड आणि माने यांनी चालवण्यासाठी घेतला होता. परंतु वर्षभरातच त्यांना हा कारखाना चालत असताना तोटा झाला होता. त्यांनी सुरू केलेली जरंडेश्वर शुगर मिल कंपनीनंतर माझे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांनी चालवायला घेतली. हा कारखाना पुन्हा नव्याने उभा करण्यासाठी त्यांनी तीनशे ते चारशे कोटी रुपयांचे कर्ज काढले होते.

हे ही वाचा - इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तावर ड्रोनच्या घिरट्या; भारताने केला निषेध

परंतु आता अचानक ईडीने या कारखान्यावर टाच आणली आहे. ईडीकडे गुरू कमोडिटीच्या नावाने कुठलीतरी चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यांनी ही टाच आणल्याची माहिती आहे. परंतु कारखाना जरी गुरु कमोडिटीच्या नावाने असला तरी जरंडेश्वर शुगर मिल चालवत आहे. या कंपनीशी माझा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे मी याविषयी अधिक माहिती देखील घेतलेली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.