ETV Bharat / city

Maharashtra Ministry : देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील 'हे' आमदार आहेत मंत्रीपदाच्या शर्यतीत

author img

By

Published : Jul 2, 2022, 2:11 PM IST

Maharashtra Ministry
चंद्रशेखर बावनकुळे

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पदभार स्विकारला आहे. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानले आहे. आता राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यासाठी अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छूक आहेत. नागपुरातील अनेक आमदारांनी आतापासूनच लॉबिंग सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नागपूर - शिवसेनेतील बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले आहे. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात नागपुरातून कोणाची वर्णी लागणार याची चर्चा जोरात सुरु असतानाच उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही अनपेक्षितपणे शपथविधी झाला. त्यामुळे आता कोणत्या नेत्याच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडेल आणि कुणाकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात येईल, या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नव्या सरकारला विश्वासमाताची परीक्षा पास करायची आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे सर्वच आमदार मुंबईमध्ये ठाण मांडून बसले असून ते मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी लॉबिंग करत आहेत.

कोणाच्या गळ्यात पडणार पालकमंत्री पदाची माळ - राज्यात महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे सरकार शिवसेनेतील बंडखोरीमुळे कोसळले. उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. राज्यात नवे सरकारचे गठन होत असताना नवे मंत्रिमंडळ कशाप्रकारचे असेल याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. नागपुरातून मंत्री आणि नंतर पालकमंत्री कोण होणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. फडणवीस हे मुख्यमंत्री होणार अशी अपेक्षा असल्याने सुरवातीला नागपुरातील भाजप समर्थकांचे पालकमंत्री पदासाठी आपापले दावे होते. मात्र, आता परिस्थिती बदलल्यानंतर पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार या चर्चांना उधाण आले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे प्रबळ दावेदार - भारतीय जनता पक्षाचा नागपुरातील आक्रमक चेहरा म्हणून माजी ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची ओळख आहे. ते विधान परिषद सदस्य आहेत. भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून देखील बावनकुळे यांच्याकडे बघितले जाते. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी दोन्ही नेत्यांच्या गुडबुकमध्ये त्यांचा समावेश आहे. त्यांनी यापूर्वी पालकमंत्री म्हणून उत्तम कारभार केला आहे. प्रशासनावर त्यांची चांगली पकड असल्याने ते मंत्रीपदासह पालकमंत्री पदाच्या शर्यतीत सर्वात पुढे असल्याचे दिसत आहे.

कृष्णा खोपडेची मंत्रिमंडळात वर्णी लागणार का - कृष्णा खोपडे यांचे नाव देखील मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या नेत्याच्या भाऊगर्दीत घेतले जात आहे. कृष्णा खोपडे हे भारतीय जनता पक्षाचे सर्वमान्य नेते आहेत. ते पूर्व नागपूर मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. गेल्या वेळी मंत्रिपद हुकल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र यावेळी मंत्रिपद नक्की मिळेल, अशी त्यांना अपेक्षा आहे. कृष्णा खोपडे हे गडकरींच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

समीर मेघे यांनाही मंत्रिपदाची अपेक्षा - समीर मेघे हे नागपूर जिल्ह्यातील हिंगणा या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. हिंगणा हा मतदार संघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. ते २०१४ आणि २०१९ मध्ये हिंगण्यातून निवडून आले आहेत. समीर मेघे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असले, तरी मेघे कुटुंबाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कौटुंबिक संबंध आहेत. ग्रामीण भागातील तरुण चेहरा म्हणून देखील समीर मेघे यांच्याकडे पाहिले जाते. हिंगणा तालुक्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीवर त्यांनी भाजपची सत्ता आणल्याने मंत्रिमंडळात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत त्यांचा दावा नाकारता येणार नाही.

नागपूरातील विधानसभा निहाय चित्र - नागपूर जिल्ह्यात १२ विधानसभा मतदार संघ आहेत. १२ मतदार संघापैकी ६ मतदार संघात भाजपचे आमदार आहेत, तर नागपुरातून भाजपचे ३ सदस्य विधान परिषदेवर आहेत. चंद्रशेखर बावनकुळे, कृष्णा खोपडे आणि समीर मेघे यांच्यापैकी एकाची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

फडणवीस पालकत्व स्वीकारतील का - उपमुख्यमंत्रीपद फडणवीस यांचेकडे आल्याने ते जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारतील का याकडे लक्ष लागले आहे. त्यानंतर ज्येष्ठतेनुसार चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव आघाडीवर असले, तरी विधान परिषद सदस्य हा त्यांच्या मार्गात अडथळा ठरू शकतो.

जातीय गणित समजून घ्या - माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कृष्णा खोपडे हे तेली समाजातून येतात. दोन्ही नेते एकाच समाजाचे असल्याने बावनकुळे यांच्या तुलनेत कृष्णा खोपडे हे मंत्रिपदाच्या शर्यतीत काहीसे मागे पडले आहेत. याशिवाय ग्रामीण भागातील भाजपचा तरुण चेहरा जिल्ह्यातील कुणबी मतदारांना आकर्षित करण्यासाठी समीर मेघे यांचेही नाव ऐनवेळी पुढे येऊ शकते. मात्र, अलीकडे भाजपने अनपेक्षित राजकीय धक्के दिले आहेत. त्यामुळे कोण होणार मंत्री हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.