ETV Bharat / city

नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीचे मित्रांनीच केले अपहरण.. पोलिसांकडून तासाभरात तरुणीची सुखरुप सुटका, दोघांना अटक

author img

By

Published : Aug 7, 2021, 12:01 AM IST

नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीत एका १९ वर्षीय तरुणीचे अपहरण केल्यानंतर आरोपींनी मुलीच्या कुटुंबीयांकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या संदर्भात इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने अवघ्या तासाभरात मुलीची सुटका करून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

NAGPUR KUDNAPPING
NAGPUR KUDNAPPING

नागपूर - नागपूर शहरातील इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीत एका १९ वर्षीय तरुणीचे अपहरण केल्यानंतर आरोपींनी मुलीच्या कुटुंबीयांकडे २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या संदर्भात इमामवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने अवघ्या तासाभरात मुलीची सुटका करून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. महत्वाचे म्हणजे या प्रकरणातील आरोपी हा तरुणीचा अगदी जवळचा मित्र आहे. या प्रकरणात अपहरण झालेल्या तरुणीचा सहभाग आहे का, या संदर्भात पोलीस माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत.

माहिती देताना पोलीस अधिकारी

इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंदननगर परिसरात तरुणी कुटुंबासह राहते. तरुणीचे कुटुंब फार सधन आहे. आज सकाळी ती तरुणी घरातून अचानक बेपत्ता झाली. काही वेळातच तिच्या वडिलांच्या मोबाईलवर अपहरणकर्त्यांनी फोन करून तुमच्या मुलीचे अपहरण झाल्याची माहिती दिली. मुलगी सुखरूप हवी असेल तर २० लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी आरोपींनी दिल्यानंतर तरुणीच्या वडिलांनी थेट इमामवाडा पोलीस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. प्रकरण संवेदनशील असल्याने लगेचच गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाला सक्रिय करण्यात आले. ज्या मोबाईलवरून तरुणीच्या वडिलांना फोन करून खंडणी मागण्यात आली होती, त्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस करण्यात आले असता ते सक्कारदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाकाळकर सभागृहाजवळ दिसत होते. लगेचच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांचा एवढा मोठा फौजफाटा बघून तरुणीने वडिलांना फोन करून सुखरूप असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तरुणीच्या मित्रासह दोघांना ताब्यात घेतले आहे.

अपहरणाच्या कटात तरुणीचा सहभाग असल्याचा संशय ?

१९ वर्षीय तरुणीच्या अपहरणाच्या घटनेमुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर गेली होती. काही दिवसांपूर्वी शहरात तरुणीवर दोन वेळा सामूहिक बलात्काराची संतापजनक घटना घडल्याने पोलिसांनी यावेळी कोणतीही कुचराई केली नाही. काही मिनिटांमध्ये आरोपींचा प्लॅन उधळून लावत दोघांना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासादरम्यान या प्रकरणात तरुणीचा सहभाग आढळून आला की नाही या संदर्भात पोलिसांनी बोलायला नकार दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.