ETV Bharat / city

Nagpur Police Transfer : नागपुरात तीन तासात साडे आठशे पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या.. आवडत्या ठिकाणी मिळाली नियुक्ती

author img

By

Published : Apr 5, 2022, 8:48 PM IST

नागपूरमध्ये तीन तासांमध्ये साडे आठशे पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या ( Nagpur Police Transfer ) आहेत. कर्मचाऱ्यांना आवडते पोलीस स्टेशन विचारून बदल्या करण्यात आल्याने कर्मचारीही खुश झाले आहेत. कर्मचाऱ्यांना मनाप्रमाणे पोलीस ठाणे मिळाल्यास तो नक्कीच चांगले काम करू शकतो, अशी प्रतिक्रिया पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली ( CP Amitesh Kumar ) आहे.

नागपुरात तीन तासात साडे आठशे पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या.. आवडत्या ठिकाणी नियुक्ती
नागपुरात तीन तासात साडे आठशे पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या.. आवडत्या ठिकाणी नियुक्ती

नागपूर : पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीवनातील तणाव कमी करण्याच्या उद्देशाने आणि हेल्दी पोलिसिंग व्हावी यासाठी नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार ( CP Amitesh Kumar ) यांनी अनोखी संकल्पना आणली आहे. कर्मचाऱ्यांच्या प्रति सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन ज्या कर्मचाऱ्याला ज्या विभागात, ज्या पोलीस ठाण्यात नियुक्ती हवी असेल त्या ठिकाणी त्यांची बदली केली जात आहे. आवडत्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाल्यास त्याचा चांगला परिणाम हा त्यांच्या कामात दिसून येतो, अशी धारणा या संकल्पनेमागे आहे. अवघ्या तीन तासात साडे आठशे पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या समोरासमोर, कोणत्याही शिफारशी शिवाय आणि अर्थपूर्ण व्यवहार न होता झाल्याने पोलीस कर्मचारी वर्ग आनंदी झाला ( Nagpur Police Transfer ) आहे. पोलिस दलातील बदल्यांमध्ये आता एक छोटा मात्र अत्यंत सकारात्मक बदल पाहायला मिळतो आहे. कारण नागपुरात पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता आली आहे.

बदल्यांसाठी अनोखी संकल्पना : केंद्रीय कर्मचारी असो की राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये कार्यरत नोकरदार वर्ग, प्रत्येकाला आवडत्या ठिकाणीचं बदली पाहिजे असते. मात्र, बदलीवरून नेहमीचं होणारे भ्रष्ट्राचाराचे आरोप हे काही नवीन नाहीत. मधल्या काळात तर पोलिसांच्या बदल्यांवरून राज्याचे राजकारण सुद्धा ढवळून निघाले होते. आवडत्या ठिकाणी बदली न मिळाल्यास तो कर्मचारी मानसिक तणावात रहातो. ज्यामुळे त्या कर्मचाऱ्यांच्या कामावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. ही बाब हेरून नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात नवी संकल्पना अस्तित्वात आणली आहे. एका बाजूला सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पोलिसांच्या बदल्यांवरून सुरु झालेले वादंग थांबायची चिन्हे नसताना नागपुरात पोलिसांच्या बदल्यांसाठी राबवलेला पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवण्याची गरज निर्माण झाली आहे.

नागपुरात तीन तासात साडे आठशे पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या.. आवडत्या ठिकाणी नियुक्ती


कशी आहे बदल्यांची संकल्पना : नागपूर शहर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी राबवलेल्या बदल्यांसंदर्भातल्या योजनेनुसार एकाच जागेवर (पदावर) पाच वर्षे पूर्ण झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या 3 जागा विचारण्यात आल्या. सर्व पात्र कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पसंतीच्या 3 जागा सुचवल्यानंतर सर्वाना एकाच वेळी एका हॉलमध्ये बोलावून सर्व पोलीस स्टेशन्स आणि पोलिसांच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध असलेल्या जागांची माहिती देण्यात आली. त्यापैकी रिक्त असलेल्या सर्व जागा हॉलमध्ये दर्शनी भागावरील बोर्डावर दाखवल्या गेल्या. त्यानंतर प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्या पसंतीच्या जागा विचारत उपलब्ध जागेप्रमाणे बदल्या देण्यात आल्या. ज्यांच्या पहिल्या तीन पसंतीप्रमाणे जागा शिल्लक नाही राहिल्या, त्यांना उपलब्ध जागेप्रमाणे तिथेच नव्या पसंती विचारून बदल्या देण्यात आल्या. आजपर्यंत पोलीस दलात अशा पारदर्शक बदल्या पाहिल्या नव्हत्या. अशा सोप्या पद्धतीने होणाऱ्या बदल्यांमुळे आमचा उत्साह आणि वरिष्ठांवरचा विश्वास वाढत असल्याची पोलीस कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया आहे. इच्छेप्रमाणे आणि पारदर्शक पद्धतीने बदल्या केल्यावर पुढील तीन ते पाच वर्ष संबंधित कर्मचारी उत्साहाने काम करून जास्त चांगले रिझल्ट देतो, असा अनुभव असल्याची प्रतिक्रिया पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.


ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.