ETV Bharat / city

पटेलांच्या रुपाने काँग्रेसने आपला 'चाणक्य' गमावला; मुख्यमंत्र्यांसह इतरांनी वाहिली श्रद्धांजली..

author img

By

Published : Nov 25, 2020, 10:50 AM IST

Updated : Nov 25, 2020, 11:33 AM IST

"अहमद पटेल यांच्या निधनाने कॉंग्रेसने आपला 'चाणक्य' गमावला आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांचीदेखील मोठी भूमिका होती" अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच, काँग्रेस पक्षाने समर्पित, अनुभवी, निष्ठावंत, कुशल संघटक आणि रणनितीकार गमावले आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Ahemad Patel passes away
पटेलांच्या रुपाने काँग्रेसने आपला 'चाणक्य' गमावला; मुख्यमंत्र्यांसह इतरांनी वाहिली श्रद्धांजली..

मुंबई - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे आज पहाटे निधन झाले. "अहमद पटेल यांच्या निधनाने कॉंग्रेसने आपला 'चाणक्य' गमावला आहे. राज्यात महाविकास आघाडी स्थापन करण्यात अहमद पटेल यांची देखील मोठी भूमिका होती" अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

अहमद पटेल हे कॉंग्रेस पक्षाचे चाणक्य समजले जात. पक्षाला प्रत्येक प्रसंगात त्यांचा आधार होता. केवळ राजकीय आघाडीवरच ते सक्रिय होते असे नव्हे तर अनेक सामाजिक कार्यांशी त्यांचा जवळून संबंध होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताना अहमद पटेल यांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा आम्हाला खूप उपयोग झाला, असेही मुख्यमंत्री म्हणाले. त्यांच्या निधनाने कॉंग्रेस तसेच महाविकास आघाडीने देखील आपला मार्गदर्शक गमावला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बाळासाहेब थोरातांनीही वाहिली श्रद्धांजली..

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून काँग्रेस पक्षाने समर्पित, अनुभवी, निष्ठावंत, कुशल संघटक आणि रणनितीकार गमावले आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ते म्हणाले, की वयाच्या २६ व्या वर्षी अहमद पटेल यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. राजकीय पेचप्रसंगावेळी कौशल्याने तोडगा काढणारे उत्तम रणनितीकार म्हणून त्यांची ओळख होती. ते तीन वेळा लोकसभा सदस्य व पाच वेळा राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून गेले. अनेकवेळा मंत्रीपदाची संधी असताना त्यांनी ती न स्वीकारता निरपेक्ष भावनेने पक्ष संघटनेत काम केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष अशा विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी काँग्रेस पक्ष संघटना मजबूतीसाठी मोठे योदगान दिले आहे.

निरपेक्ष सैनिकाच्या रुपात सज्ज..

कायम स्पष्ट राजकीय भूमिका घेण्यासाठी ते ओळखले जायचे. आपल्या भूमिकांशी ठाम राहणे, पक्षहित सर्वात प्रथम ठेवणे, देशभरातल्या नेत्यांशी सुसंवाद या त्यांच्या कामाच्या खास बाबी होत्या. काँग्रेससाठी अहमद पटेल हे कायम निरपेक्ष सैनिकाच्या रुपात सज्ज असायचे. महाराष्ट्रातही विद्यमान महाविकास आघाडीचे सरकार बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आणि मार्गदर्शन होते.

कधीही न भरून येणारी हानी..

गेल्या अनेक वर्षापासून पक्षाच्या कामानिमित्ताने पटेल यांच्याशी गाठीभेटी व चर्चा होत असत. माझे त्यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षाची व वैयक्तिक माझी कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. अहमद पटेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पटेल कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे थोरात म्हणाले.

पटेलांचं निधन धक्कादायक - संजय राऊत

अहमद पटेलांच निधन झाल्याचे वृत्त धक्कादायक होते. देशाच्या राजकारणात आज त्यांची खरी गरज होती. त्यांच्या जाण्याने काँग्रेसचा मुख्य स्तंभ कोसळला आहे, अशा शब्दांमध्ये शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हा काँग्रेसवर मोठा आघात - पृथ्वीराज चव्हाण
हा काँग्रेसवर मोठा आघात - पृथ्वीराज चव्हाण

पटेल यांचे निधन होणे हा काँग्रेस पक्षावर झालेला मोठा आघात आहे. त्यांनी गेली कित्येक वर्षे सोनिया गांधींचे सल्लागार म्हणून काम पाहिले. सोनिया गांधींचा उजवा हात समजले जाणाऱ्या पटेल यांचा काम करता करताच कोरोनाने दुःखद निधन झाले, अशा शब्दांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

अहमद पटेल यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत.

हेही वाचा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या राजकीय कारकिर्दीवर एक नजर

Last Updated : Nov 25, 2020, 11:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.