मंत्री अनिल परब ठोकणार सोमैयांच्या विरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा, पाठवली नोटीस

author img

By

Published : Sep 15, 2021, 7:22 AM IST

अनिल परब

भाजपा नेते किरीट सोमैया हे महाविकास आघाडीतील नेत्यांवर सातत्याने आऱोप करत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून किरीट सोमैया यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या पूर्वी हसन मुश्रीफ यांनी देखील सोमैया यांच्या विरोधात 100 कोटीचा दावा ठोकणार असल्याचे जाहीर केले आहे.

मुंबई - माजी खासदार आणि भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोमैया यांच्याकडून वारंवार होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून अनिल परब आता सोमैया यांच्यावरती 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत. या प्रकरणी परब यांचे वकील सुषमा सिंग यांनी सोमैय्यांना एक बिनशर्त माफी मागण्याची नोटीस पाठवली आहे. त्यानुसार आता सोमैय्या यांना 72 तासात उत्तर देण्यास सांगतिले आहे. सोमैया यांनी परब यांच्यावर कोकणात दापोली येथे बेकायदा हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. या बरोबर त्यांच्या खात्याअंतर्गत परिवहन विभागात बदल्याचे रॅकेट परब यांनी चालवल्याचा जाहीर आरोपही सोमैय्या यांनी केला होता.

बिनशर्त जाहीर माफी मागावी.. अन्यथा-

किरीट सोमैया गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गैरव्यवहारप्रकरणी सोमैया यांनी अनेकदा शिवसेना नेत अनिल परब यांचे नाव घेतले होते. अनिल देशमुख नंतर अनिल परब आत जाणार, असा दावा अनेकदा सोमैया यांनी केला होता. परब यांच्या विरोधात त्यांनी काही पुरावेही ईडीला दिले होते. मात्र काही दिवस बॅकफुटला असणारे परब हे सोमैया विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी सोमैया यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तीन दिवसांत बिनशर्त जाहीर माफी मागावी तसेच बदनामीकारक व बिनबुडाचे आरोप करणे न थांबविल्यास 100 कोटींचा दावा दाखल करण्याचा इशाराही परब यांनी दिला आहे.


सोमैया यांनी मे २०२१ पासून प्रसिद्धिमाध्यमांमधून सातत्याने अनिल परब यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ व ५०० चा भंग होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी तीन दिवसांमध्ये समाजमाध्यमांमध्ये प्रसारित केलेला मजकूर काढून टाकावा, त्यांचे आरोप मागे घ्यावेत आणि वृत्तपत्रांमधून जाहीर माफी मागावी, अशी नोटीस परब यांच्या वतीने अँड. सुषमा सिंग यांनी बजावली आहे.

खरमाटे आणि माझा काही सबंध नाही-

सोमैया यांनी बजरंग खरमाटे यांच्या सांगली व पुणे मालमत्तांना भेटी देण्याबाबत ट्वीट केले होते. खरमाटे हे परब यांचे सचिव असल्याचा उल्लेख करून त्यांच्याशी संबंध जोडला. वास्तविक खरमाटे हे परिवहन विभागातील अधिकारी असून माझा त्यांच्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण मंत्री अनिल परब यांनी दिले आहे.

राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफही ठोकणार 100 कोटींचा दावा-

भाजप नेते किरीट सोमैया यांनी पत्रकार परिषद घेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. तसेच मुश्रीफ यांचा मनी लॉन्ड्रिंग आणि बेनामी व्यवहारांमध्ये सहभागी असल्याचाही आरोप आरोप सोमैया यांनी केला. या आरोपानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनीही पत्रकार परिषद घेत किरीट सोमैया यांनी केलेले माझ्यावरील आरोप चुकीचे असून त्यांच्यावर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - किरीट सोमैयांनी 'ईडी'कडे सुपूर्द केले 2 हजार 700 पानांचे पुरावे, मुश्रीफांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

हेही वाचा - मुश्रीफ कुटुंबांकडून 127 कोटींचा घोटाळा?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.